नागपुरात मानवी तस्करीस मदत करणाऱ्या वकिलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 10:53 PM2018-01-24T22:53:33+5:302018-01-24T22:54:45+5:30

मानवी तस्करीद्वारे स्थानिक युवकांना ब्रिटनला पाठविणाऱ्या टोळीसाठी बोगस दस्तावेज तयार करणाऱ्या वकिलाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. शिवकुमार राठोड (५९) रा. भूपेशनगर बोरगाव असे आरोपी वकिलाचे नाव आहे.

The lawyer who helped the human trafficking in Nagpur was arrested | नागपुरात मानवी तस्करीस मदत करणाऱ्या वकिलाला अटक

नागपुरात मानवी तस्करीस मदत करणाऱ्या वकिलाला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देगुप्तचर संस्था सक्रिय : आरोपी लपवीत आहे खरी माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी तस्करीद्वारे स्थानिक युवकांना ब्रिटनला पाठविणाऱ्या टोळीसाठी बोगस दस्तावेज तयार करणाऱ्या वकिलाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. शिवकुमार राठोड (५९) रा. भूपेशनगर बोरगाव असे आरोपी वकिलाचे नाव आहे.
या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी तपासात सहकार्य करीत नसल्याने, पोलिसांनाही खरी माहिती मिळण्यास अडचणी येत आहेत. या प्रकरणात पाचपावली पोलिसांनी १० दाम्पत्यांच्या विरुद्ध फसवणूक आणि पासपोर्ट अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. २३ जानेवारी रोजी बलबीरसिंह मुलतानी (६५), अजितसिंह मुलतानी (६२), मंजितसिंह गोत्रा (६०) आणि रुल्डासिंह गुज्जर (६१) यांना अटक केली आहे. रुल्डासिंह गुज्जर याने सर्वाधिक १९ युवकांना ब्रिटनला पाठविले होते. यात त्याच्या मुलाचाही समावेश आहे. रुल्डासिंहने पोलिसांना वकील राठोड याने बोगस दस्तावेज बनवून दिल्याचे सांगितले. या आधारावर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा राठोडला अटक केली.
सूत्रानुसार राठोडला सप्टेंबर २०१७ मध्येसुद्धा प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपात अटक केली होती. बोगस दस्तावेजाच्या माध्यमातून वाहन कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करणाऱ्याला राठोडनेच दस्तावेज बनवून दिले होते. त्यानी रुल्डासिंहलासुद्धा पाच वर्षांपूर्वी बोगस बोनाफाईड सर्टिफिकेट बनवून दिले होते. या माध्यमातूनच तो युवकांना ब्रिटनला पाठवीत होता. पोलिसांनी राठोडला अटक करून बुधवारी न्यायालयासमोर सादर करून, दोन दिवसाची पोलीस कोठडी घेतली आहे. रुल्डासिंहने सर्वाधिक युवकांना ब्रिटनमध्ये पाठविल्याने तो पोलिसांच्या मुख्य टार्गेटवर आहे. पैशाचे आमिष दाखवून युवकांना मजुरी करण्यासाठी ब्रिटनला पाठवत असल्याचे तो पोलिसांना सांगत आहे. इतर आरोपी मात्र समाधानकारक उत्तरे देत नाही. ते खरी माहिती लपवीत आहेत.
नागपूर पोलिसांनी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करताच पंजाब, हरियाणा आणि इतर दुसºया राज्यातील पोलिसही सक्रिय झाले आहेत. इतर राज्यातील युवकांनासुद्धा मानवी तस्करीच्या माध्यमातून ब्रिटन व युरोपीय देशांमध्ये पाठविण्यात आले आहे. मानवी तस्करी हे प्रकरण विदेशाशी जुळलेले आहे. त्यामुळे याची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्याची गरज आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा यासंदर्भात विचार करीत आहेत. गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा पोलिसांकडून याबाबतची माहिती मागविली आहे.

Web Title: The lawyer who helped the human trafficking in Nagpur was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.