नागपुरातील कालिदास महोत्सवाच्या जाहिरातीत भाषेचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 09:58 AM2017-11-18T09:58:30+5:302017-11-18T10:02:40+5:30

कालिदासाच्या नावाने नागपुरात दरवर्षी भव्य महोत्सव आयोजित करणाऱ्या आयोजन समितीने मात्र महोत्सवाच्या जाहिरातीत भाषेचा पार बट्ट्याबोळ केला आहे.

language confusion in The Kalidas Mahotsav advertisement in Nagpur | नागपुरातील कालिदास महोत्सवाच्या जाहिरातीत भाषेचा बट्ट्याबोळ

नागपुरातील कालिदास महोत्सवाच्या जाहिरातीत भाषेचा बट्ट्याबोळ

googlenewsNext
ठळक मुद्देना धड हिंदी, ना धड मराठी आयोजन समितीचे भाषाअज्ञान चव्हाट्यावरवाचा या भन्नाट चुका शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर सायंकाळी ५ बजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत एवं सितार जुगलबंदी शास्त्रीय एवं उपशास्त्रीय गायन महेश एलकुंचवार प्रख्यात साहित्यकार

शफी पठाण।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विरहाच्या वेदनेतून मेघदूत रचणारे कालिदास हे प्राचीन भारतातील प्रख्यात संस्कृत कवी होते. केवळ मेघदूतच नव्हे तर आपल्या विलक्षण शब्दसामर्थ्याने त्यांनी रघुवंशम्, कुमारसंभवम्, ऋतुसंहार आदी संस्कृत महाकाव्यांनाही जन्मास घातले. हे लिखाण करताना शुद्ध भाषेवर त्यांचा विशेष भर होता. कारण, पत्नीने लक्षात आणून दिलेल्या भाषाअज्ञानानेच त्यांना लिखाणाची प्रेरणा दिली होती. परंतु याच कालिदासाच्या नावाने नागपुरात दरवर्षी भव्य महोत्सव आयोजित करणाऱ्या आयोजन समितीने मात्र महोत्सवाच्या जाहिरातीत भाषेचा पार बट्ट्याबोळ केला आहे.
शुक्रवारी सर्व प्रमुख दैनिकात प्रसिद्ध झालेल्या व सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीतील कार्यक्रम विवरणाच्या रकान्यात प्रमुख शब्द मराठीत अनुवाद करून कंसातील माहिती हिंदीत जशीच्या तशी ठेवण्यात आली आहे. ही जाहिरात बघितली तर लक्षात येते की ही अनवधानाने झालेली चूक अजिबात नाही.
ज्यांच्याकडे या जाहिरातीच्या अनुवादाचे काम सोपविण्यात आले त्याला एक तर भाषेचे ज्ञान नाही वा त्याने पाट्या टाकण्याच्या सरकारी प्रवृत्तीतून या घोडचुका केल्या आहेत. बरं...या केवळ व्याकरणाच्या चुका असत्या तर दुर्लक्ष करताही आले असते. परंतु जाहिरातीचा मूळ अनुवादच चुकला आहे. एकाच ओळीतील दिवस व तारीख मराठीत तर वेळ हिंदीत लिहिली आहे. पालकमंत्र्यांचे आडनाव मराठीतही ‘बावनकुले’च आहे. स्थळच्या ठिकाणी ‘स्थल’ कायम ठेवण्यात आले आहे. प्रवेश नि:शुल्क असे जिथे लिहिले आहे त्याच्याच बाजूला मोठ्या अक्षरात ‘प्रवेशिकाची आवश्यकता नाही’असेही लिहिले आहे. कार्यक्रम विवरणाच्या रकान्यात तर आयोजन समितीतील विद्वानांच्या विद्वत्तेचे पार धिंडवडेच निघाले आहेत.


जबाबदारी नेमकी कुणाची?
या महोत्सवाचे आयोजन कालिदास समारोह आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळ व नागपूर महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. अशा स्थितीत या घोडचुकांची जबाबदारी नेमकी कुणाची हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्याला कुणाला या जाहिरातीच्या अनुवादाचे काम सोपवले त्याला किमान भाषाज्ञान आहे का हे बघितले गेले की नाही, जर ते बघूनच हे काम सोपवले तर मग इतक्या गंभीर चुका कशा झाल्या की आयोजन समिती अशा कलात्मक कार्यक्रमाकडे केवळ सरकारी सोपस्कार म्हणून पाहते, याचे उत्तर आयोजकांनी महोत्सव संपण्यापूर्वी द्यायला हवे, अशी अपेक्षा नागपूरकर रसिक व्यक्त करीत आहेत.
 

Web Title: language confusion in The Kalidas Mahotsav advertisement in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.