कीर्तनात ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालण्याची ताकद : डॉ. कुमार शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:49 PM2019-07-17T18:49:46+5:302019-07-17T18:56:03+5:30

कीर्तनकाराजवळ विद्वत्तेसह, संगीताची जाण आणि सोबतच अनेक पैलू असणे गरजेचे आहे. कीर्तनात ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालण्याची ताकद असल्याची भावना ज्येष्ठ विद्वान डॉ. कुमार शास्त्री यांनी व्यक्त केली.

Kirtan's ability to put 'the heart to heart': Dr. Kumar Shastri | कीर्तनात ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालण्याची ताकद : डॉ. कुमार शास्त्री

‘किर्तन कौस्तुभ’च्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करताना डॉ. कुमार शास्त्री, विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरूदास महाराज, श्रीराम जोशी, डॉ. म.रा. जोशी

Next
ठळक मुद्दे‘कीर्तन कौस्तुभ’च्या दुसऱ्या भागाचा प्रकाशन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कीर्तनकाराजवळ विद्वत्तेसह, संगीताची जाण आणि सोबतच अनेक पैलू असणे गरजेचे आहे. कीर्तनात ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालण्याची ताकद असल्याची भावना ज्येष्ठ विद्वान डॉ. कुमार शास्त्री यांनी व्यक्त केली.
दत्तोपंत ठेंगडी सभागृहात विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरुदास महाराज यांच्या सहा कीर्तनांचा संग्रह असलेल्या ‘कीर्तन कौस्तुभ’ भाग दोनचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी, ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सद्गुरुदास महाराज, हभप मुकुंदबुवा देवरस, भागवताचार्य श्रीराम जोशी व ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’प्राप्त डॉ. म.रा. जोशी उपस्थित होते.
श्रीराम जोशी यांनी बोलताना, कीर्तन कौस्तुभ म्हणजे श्रीकृष्णाने कंठात धारण केलेल्या मौल्यवान रत्नाप्रमाणे असल्याचे सांगितले. कीर्तन दराने करू नये, आदराने करावे, असा संदेश या पुस्तकातून नवोदितांना दिला गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी, ‘कीर्तन कौस्तुभ’मधील सद्गुरुदास महाराजांच्या स्वरचित पदांचे गायन अजय देवगावकर व देविका मार्डीकर यांनी केले. प्रकाशन सोहळ्याचे संचालन संजीवनी अगस्ती यांनी केले. प्रास्ताविक कौमुदी गोडबोले यांनी केले. तर प्रा. अमर देशपांडे यांनी आभार मानले.
डॉ. म.रा. जोशी यांचा सत्कार
महाराष्ट्र शासनाचा ‘ज्ञानोबा तुकाराम’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल यावेळी डॉ. म.रा. जोशी यांचा सत्कार करण्यात आला. माझ्या लेखनकार्याची प्रेरणाच सद्गुरुदास महाराज असल्याची भावना डॉ. म.रा. जोशी यांनी व्यक्त केली.

Web Title: Kirtan's ability to put 'the heart to heart': Dr. Kumar Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.