नागपुरात अपहरण करून तरुणीवर ऑटोचालकाचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 08:09 PM2019-08-23T20:09:30+5:302019-08-23T20:16:23+5:30

रागाच्या भरात घरून बाहेर पडलेल्या तरुणीचे (वय २९) अपहरण करून तिला मित्राच्या खोलीवर नेऊन डांबून ठेवत एका ऑटोचालकाने तिच्यावर रात्रभर बलात्कार केला. तो सकाळी निघून गेल्यानंतर त्याच्या मित्रानेही तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.

Kidnapping and raped by auto driver in Nagpur | नागपुरात अपहरण करून तरुणीवर ऑटोचालकाचा बलात्कार

नागपुरात अपहरण करून तरुणीवर ऑटोचालकाचा बलात्कार

googlenewsNext
ठळक मुद्देमित्राच्या खोलीवर डांबून ठेवले : मित्रानेही केला बलात्काराचा प्रयत्नधंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रागाच्या भरात घरून बाहेर पडलेल्या तरुणीचे (वय २९) अपहरण करून तिला मित्राच्या खोलीवर नेऊन डांबून ठेवत एका ऑटोचालकाने तिच्यावर रात्रभर बलात्कार केला. तो सकाळी निघून गेल्यानंतर त्याच्या मित्रानेही तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. राग शांत झाल्यानंतर घरी परतलेल्या तरुणीने आपल्या पालकांना आपबिती सांगितली. त्यानंतर धंतोली पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपी ऑटोचालकांना अटक केली. शहजाद शेख शब्बीर शेख (वय २६, रा. मारवाडी चौक, इतवारी) आणि मोहम्मद जावेद अन्सारी (वय २४) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पीडित तरुणी छत्रपती चौकाजवळ राहते. तिच्या परिवाराची स्थिती बेताची आहे. मध्ये मध्ये तिला वेडसरपणाचे झटके येतात. त्यामुळे पतीने तिला सोडून दिले. तिला सहा वर्षांची मुलगी असून, या मुलीसह पीडित तरुणी आपल्या आईवडिलांकडे राहते. मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घरच्यांनी रागावले म्हणून ती रागाच्या भरात घराबाहेर पडली. नरेंद्रनगर पुलाकडे जात असताना आरोपी शहजाद त्याच रस्त्याने ऑटो घेऊन जात होता. त्याने ऑटो थांबवून तिला आपल्या ऑटोत बसवले अन् सरळ तिला उप्पलवाडीतील मित्राच्या (आरोपी जावेदच्या) घरी नेले. जावेद विवाहित आहे. त्याची पत्नी आणि मुले यावेळी घरीच होते. ही आपली पत्नी आहे. घरच्यांसोबत आपला वाद झाला असे सांगून आरोपी शहजादने जावेदच्या घरी मुक्काम ठोकला. यावेळी त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून रात्रभर पीडित तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तो बुधवारी सकाळी तिला तेथेच ठेवून ऑटो घेऊन निघून गेला. दुपारी घरी कुणी नसल्याची संधी साधून जावेदनेही तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, तिने विरोध केल्याने तो गप्प बसला. त्यानंतर रात्री पुन्हा शहजाद आला. त्याने तिला सोबत इतवारी रेल्वेस्थानकावर नेले. तेथे रात्रभर त्यांनी मुक्काम केला. गुरुवारी सकाळी तिला सक्करदऱ्यात एका ठिकाणी सोडून निघून गेला. पीडित तरुणीने तेथून सरळ आपले घर गाठले. दरम्यान, दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्यामुळे अस्वस्थ असलेल्या पालकांनी ती घरी परतताच तिला विचारणा केली.
तिने आपबिती सांगताच पालकांनी तिला धंतोली ठाण्यात नेले. ठाणेदार विजय आकोत यांनी तक्रार ऐकून आरोपी शहजादविरुद्ध अपहरण करून बलात्कार करणे, डांबून ठेवणे, धमक्या देणे तसेच आरोपी जावेदविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आपल्या सहकाऱ्यांना लगेच शोधकामी लावून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना आज कोर्टात हजर करून त्यांचा २५ ऑगस्टपर्यंत पीसीआर मिळवला.
मोबाईलने फसला आरोपी
आरोपी शहजादने दोन दिवस (दोन रात्र) तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर गुरुवारी तिला सोडून जाताना त्याने पुन्हा कधी वाटले तर मला फोन कर, असे म्हणत तिला स्वत:चा मोबाईल नंबरही दिला. तरुणीकडून पोलिसांनी तो नंबर घेऊन आरोपी शहजादला गुरुवारी रात्री नंदनवनमध्ये बोलवून घेतले. तरुणीने पुन्हा फोन केल्याचे पाहून आरोपी शहजाद लगबगीने तेथे पोहचला. तरुणीजवळ येताच धंतोली पोलिसांनी त्याची गचांडी धरली.
ऑटोचालकाची गुंडगिरी ठेचणार कोण
उपराजधानीतील काही (सर्व नव्हे) ऑटोचालकांची गुंडगिरी वाढतच चालली आहे. एकट्या महिला-मुलीची छेड काढणे, त्यांचे अपहरण करणे, बलात्कार करणे, असे गुन्हे यावेळीही नागपुरात घडले आहे. महिला मुलींसोबतच काही आरोपी ऑटोचालक मनमाने पैसे मागण्यासाठी सभ्य तसेच प्रतिष्ठित व्यक्तींसोबत वाद घालून त्यांना वेठीस धरतात. त्यांनी विरोध केल्यास अपमान करतात. शुक्रवारी दुपारी छत्रपती चौकात अशाच प्रकारे एका ऑटोचालकाने मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी ऑटोत कोंबले. त्यामुळे एका व्यक्तीने त्याच्या ऑटोत बसण्यास नकार दिल्यामुळे आरोपी ऑटोचालकाने त्यांच्यासोबत वाद घातला. बाजूला उभे असलेल्या एका पत्रकाराने त्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांना कळविली. भांडारकर यांनी तत्परतेने आपल्या सहकाऱ्यांच्या माहिती देऊन त्या ऑटोचालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली.

Web Title: Kidnapping and raped by auto driver in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.