खासदार महोत्सव : शब्दाविना सजली स्वरांची तालयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:18 AM2018-12-15T00:18:11+5:302018-12-15T00:21:42+5:30

मानवी मनाला उच्च कोटीचा आनंद देणारी गोष्ट म्हणजे संगीत. निसर्गाच्या कनाकनात हे संगीत सामावले आहे. एकदा हे संगीत कानामनात उतरले की शब्दाविना पराकोटीचा आनंद देणारे असते. अगदी हाच आनंद शब्दाविना सजलेल्या तालयात्रेत नागपूरकरांनी शुक्रवारी अनुभवला. दिनमानानुसार वाढलेला सायंकाळचा गारवा आणि अशात आकाशाखाली रंगलेली तालवाद्यांची मैफिल. जगप्रसिद्ध कलावंत राकेश चौरसिया यांच्या बासरीचे सुमधूर स्वर, त्यांच्या संचातील कलावंतांकडून विविध वाद्यांवर दाखविलेले कौशल्य आणि एकट्याने अनेक वाद्यांवरून थेट संवाद साधणारे विख्यात कलावंत शिवमणी. या कलावंतांद्वारे सादरीत अनोख्या फ्यूजनला ‘वा क्या बात है’ अशी दाद देत, मनमुराद आनंद रसिकांनी अगदी तल्लीन होउन लुटला.

Khasdar Festival: No Vocal only instrumental music | खासदार महोत्सव : शब्दाविना सजली स्वरांची तालयात्रा

खासदार महोत्सव : शब्दाविना सजली स्वरांची तालयात्रा

Next
ठळक मुद्देभारतीय व पाश्चिमात्य संगीत यांच्या मिश्र संगीताचा मिलाप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी मनाला उच्च कोटीचा आनंद देणारी गोष्ट म्हणजे संगीत. निसर्गाच्या कनाकनात हे संगीत सामावले आहे. एकदा हे संगीत कानामनात उतरले की शब्दाविना पराकोटीचा आनंद देणारे असते. अगदी हाच आनंद शब्दाविना सजलेल्या तालयात्रेत नागपूरकरांनी शुक्रवारी अनुभवला. दिनमानानुसार वाढलेला सायंकाळचा गारवा आणि अशात आकाशाखाली रंगलेली तालवाद्यांची मैफिल. जगप्रसिद्ध कलावंत राकेश चौरसिया यांच्या बासरीचे सुमधूर स्वर, त्यांच्या संचातील कलावंतांकडून विविध वाद्यांवर दाखविलेले कौशल्य आणि एकट्याने अनेक वाद्यांवरून थेट संवाद साधणारे विख्यात कलावंत शिवमणी. या कलावंतांद्वारे सादरीत अनोख्या फ्यूजनला ‘वा क्या बात है’ अशी दाद देत, मनमुराद आनंद रसिकांनी अगदी तल्लीन होउन लुटला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार महोत्सवाच्या माध्यमातून तालयात्रेचा ‘फ्यूजन’ सोहळा शुक्रवारी संत्रानगरीच्या रसिकांनी अनुभवला. अर्थातच या कार्यक्रमाला तरुणांनी मोठी गर्दी केली होती. सुरुवातीच्या सत्रात बासरीवादक राकेश चौरसिया व त्यांच्या संचातील दिग्गज कलावंतांच्या स्वर-तालाच्या फ्यूजनचा आनंद रसिकांना मिळाला. पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य व पुतने राकेश चौरसिया यांनी बासरीच्या माधुर्याची रसिकांवर बरसात केली. सुरांशी लीलया खेळत त्यांचे समेवर येणे परत वादनातील तयारी पेश करत इतर वाद्यांच्या साथीने रसिकांना मोहवून गेले. कृष्णाच्या लडिवाळ बासरीचे मंत्रमुग्ध करणारे स्वर त्यांनी आसमंतात भरुन टाकले होते. पहाडी धूनच्या स्वरांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांच्यासोबत ड्रमवादक जिनो बँक्स, तबलावादक सत्यजित तळवळकर, बास गिटारवादक शेल्डन डिसिल्वा आणि कीबोर्डवादक संगीत हल्दीपूर यांनी तालयात्रेचा अक्षरश: रंग उधळला. या फ्यूजनमध्ये मध्येच इतर कलावंत थांबून एका कलावंताचे स्वर निनादायचे आणि श्रोते अवाक् होउन ते ऐकत राहायचे. जिनो बँक्सच्या ड्रमवरील आणि सत्यजितच्या तबल्यावरील कौशल्यासोबत रसिकांच्या टाळयांचे स्वर जुळले. संजय दास यांची गिटार आणि शेल्डनची बास गिटार अशीच श्रोत्यांना तल्लीन करून गेली. प्रत्येक कलावंताच्या स्वतंत्र सादरीकरणावर श्रोत्यांनी टाळयांचा कडकडाटाने दाद दिली. पुढे ‘होंठो से छुलो तुम..., तुम इतना जो मुस्कुरा रही हो..., मेरी आवाजही पेहचान है..., छुकर मेरे मनको..., पल पल दिल के पास, निले निले अंबर पर..., भिगी भिगी रातो मे..., तेरे मेरे होठों पर मिठे मिठे गीत..., जग घुमिया..., चलते चलते मेरे ये गीत...’ अशा गीतांवर राकेश यांच्या बासरीचे स्वर निनादले आणि श्रोत्यांचे भान हरपले. 


दुसऱ्या सत्रात जादू चढली ती शिवमणी या अद्भूत कलावंताची. सर्व वाद्य वाजविणारा एकटाच संगीतकार अशी त्याची ओळख. लहान डफली वाजवितच त्याने मंचावर प्रवेश केला. पुढे एक-एक वाद्यावर रिदम तपासली. एक-दोन नव्हे तर मंचावर असलेल्या २० च्या जवळपास वेगवेगळ्या वाद्यांवर आपले कसब दाखवित, श्रोत्यांना अक्षरश: आश्चर्याने तोंडात बोट घालायला भाग पाडले. श्रोते अवाक होउन त्याचे हे कसब पाहत होते. त्याच्या वादनाने हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. अखेर राकेश चौरसिया यांची बासरी व शिवमणीचे वादन याच्या फ्यूजनने या अलौकीक सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 यांचा झाला सत्कार
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते निवेदक किशोर गलांडे, गिटारवादक योगेश ठाकर, गायक हफीज भाई, गायक व संगीतकार ओ.पी. सिंह, गझल गायक शिशिर पारखी, हार्मोनियमवादक विजय बोरीकर, संगीत गायक वर्षा बारई, निवेदक व साहित्यिक प्रकाश एदलाबादकर, तबलावादक हर्षल ठाणेकर या कलावंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते.

 

Web Title: Khasdar Festival: No Vocal only instrumental music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.