महिला सक्षमीकरणासाठी धडपडणाऱ्या ‘कस्तुरबा’; १५० वी जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:26 AM2018-04-11T10:26:42+5:302018-04-11T10:26:53+5:30

Kasturba struggling for women's empowerment; 150th Birth Anniversary | महिला सक्षमीकरणासाठी धडपडणाऱ्या ‘कस्तुरबा’; १५० वी जयंती

महिला सक्षमीकरणासाठी धडपडणाऱ्या ‘कस्तुरबा’; १५० वी जयंती

Next
ठळक मुद्देअडथळ्यांना पार करत पोहोचल्या होत्या पारशिवनीला‘कस्तुरबा भवन’ चालवतेय गांधी विचारांची परंपरा

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोहनदास करमचंद गांधी ते ‘महात्मा’ या प्रवासाच्या साक्षीदार असलेल्या त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी या आयुष्यभर गांधीविचारांना जगल्या. महिलांना कमी लेखल्या जात असल्याच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी त्या नेहमी पुढाकार घेत. त्यांची ही तळमळ नागपूर जिल्ह्यातील पारशिवनीने अनुभवली होती. १९३० साली मुलींच्या शाळेच्या उद्घाटनासाठी कस्तुरबा गांधी यांनी विविध अडथळ्यांचा सामना केला होता व जिद्दीने त्या शाळेच्या उद्घाटनाला पोहोचल्या होत्या, हे विशेष. ही शाळा सुरू करणारे चिंतामणराव तिडके यांच्या कन्या सुधाताई गडकरी यांनी ही आठवण सांगितली.
वर्धा आणि कस्तुरबा गांधी यांचे नाते अतुट होते व त्यांचे संस्कार बापूकुटीमध्ये जागोजागी रोवल्या गेले. मात्र वर्ध्यासोबतच नागपूर व आजूबाजूच्या परिसरातदेखील महात्मा गांधींसोबतच कस्तुरबा यांना आदर्श मानणारे अनेक जण होते. १९३० साली पारशिवनी येथे चिंतामणराव तिडके यांनी मुलींसाठी शाळा सुरू करण्याचा मानस केला होता व शाळेच्या उद्घाटनप्रसंगी मौलिक मार्गदर्शनासाठी कस्तुरबा गांधी यांनी येण्याचे वचन दिले होते. कस्तुरबा गांधी या शिकल्या नव्हत्या, मात्र साक्षरतेचे महत्त्व त्यांना चांगल्या रीतीने माहीत होते. देशभरात महात्मा गांधींसमवेत प्रवास करत असताना महिला सक्षमीकरण किती आवश्यक आहे, हे त्यांना कळले होते. त्यामुळेच पारशिवनीच्या शाळेचे निमंत्रण त्यांनी लगेच स्वीकारले होते. त्या काळी चांगले रस्ते नव्हते.
आपली वचनपूर्ती करण्यासाठी व मुलींना नवा हुरूप देण्यासाठी कस्तुरबा यांना जानकीबाई बजाज, महात्मा गांधी यांच्या स्वीय सहायकांच्या पत्नी गोमतीबाई बेन यांच्यासमवेत वर्ध्याहून पारशिवनीसाठी निघाल्या. रामटेकला पोहोचल्यानंतर रस्ता नसल्याने त्या जवळील गावापर्यंत नावेतून गेल्या. पावसाळ्याचे दिवस असतानादेखील त्यांनी त्यानंतर चिखलाने भरलेल्या रस्त्यातून कधी पायी तर कधी बैलगाडी, असा प्रवास करत पारशिवनी गाठले होते.

‘गांधी भवन’चे झाले ‘कस्तुरबा भवन’
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे नागपुरातील बजाजनगरात गांधी भवन निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला व विनोबा भावे यांच्या हस्ते १९६५ ला भूमिपूजन झाले होते. २ आॅक्टोबर १९६८ साली कमलाबाई होस्पेट यांच्या हस्ते कोनशिलान्यास झाला व जयप्रकाश नारायण यांनी उद्घाटन केले होते. त्यावेळी नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर गांधी विचारधारा विभागात गांधी भवन होते. त्यामुळे एकाच भागात दोन गांधी भवन असल्याने कार्यक्रमांच्या वेळी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत होते. त्यामुळे १९९० मध्ये या भवनाला कस्तुरबा भवन असे नाव देण्यात आले, अशी माहिती महात्मा गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील यांनी दिली.

Web Title: Kasturba struggling for women's empowerment; 150th Birth Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.