मातृभाषेसोबत इंग्रजीवरही प्रभुत्व हवे

By admin | Published: November 29, 2015 03:50 AM2015-11-29T03:50:29+5:302015-11-29T03:50:29+5:30

महाराष्ट्रात मराठीचे शिक्षण मिळायलाच पाहिजे. मातृभाषेच्या शिक्षणातून आपली संस्कृती व विचार रुजवता येतो.

It is necessary to have dominion over English along with the mother tongue | मातृभाषेसोबत इंग्रजीवरही प्रभुत्व हवे

मातृभाषेसोबत इंग्रजीवरही प्रभुत्व हवे

Next

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘मेस्टा’चा पहिला राज्यव्यापी मेळावा
नागपूर : महाराष्ट्रात मराठीचे शिक्षण मिळायलाच पाहिजे. मातृभाषेच्या शिक्षणातून आपली संस्कृती व विचार रुजवता येतो. परंतु इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. वैज्ञानिक भाषा आहे, हे विसरून चालणार नाही. आपली संस्कृती व विचार जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी सुद्धा इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे. त्यामुळे मातृभाषेसोबतच इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्यावतीने (मेस्टा) शनिवारी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित इंग्रजी शाळा संस्थाचालकांच्या पहिल्या राज्यव्यापी महामेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. विकास कुंभारे, मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील, महासचिव राजेंद्र दायवा, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सिंग, स्कूल बस संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग, कोषाध्यक्ष मनीष हांडे, विदर्भ विभागाचे अध्यक्ष संजय कोचे, भादरंगे, योगेश पाटील, बुशरा पठाण, अनिल असलकर, रमादेवी रेड्डी, विनोद कुलकर्णी, नाना सातपुते, राजाभाऊ टांकसाळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील आवश्यक भाषा आहे. भारतात मातृभाषेसोबतच इंग्रजी शिक्षणामुळेच भारतीयांना परदेशातही प्रभाव वाढविण्याची संधी मिळालेली आहे. चीन, जपान, कोरिया विज्ञान तंत्रज्ञानात आघाडीवर आहेत. परंतु या देशांना जगासमोर येण्यासाठी इंग्रजीलाच प्राधान्य असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी इंग्रजीचे शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सुद्धा इंग्रजी ही वाघिणीचे दूध असल्याचे स्पष्ट केले. तसेच संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी आरटीई परतावा मिळावा, आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना टी.सी. अनिवार्य करण्यात यावी, इंग्रजी शाळांना व्यावसायिक वीज बिल लावू नये, गल्लीबोळातील शाळांचे स्थलांतरण करण्यास मंजुरी मिळावी आणि डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांसाठी सुद्धा संरक्षणाचा कायदा व्हावा आदी मागण्या केल्या.
याप्रसंगी मेस्टा टॅलेंट हंट परीक्षेची प्रश्नपत्रिका, मेस्टा दिनदर्शिका आणि मेस्टा बुलेटिनचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सातारा, पारनेर, शिरुर, अहमदनगर भागातील इंग्रजी माध्यम संघटनेचे विलिनीकरण यावेळी मेस्टामध्ये करण्यात आले.
डॉ. राजेंद्र सिंग यांनी प्रास्ताविक केले. अवंतिका लेकुरवाळे यांनी संचालन केले. राजेंद्र दायमा यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: It is necessary to have dominion over English along with the mother tongue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.