वेदशक्तीमुळे जगाचे लक्ष भारताकडे : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:29 AM2019-04-27T00:29:30+5:302019-04-27T00:34:56+5:30

विज्ञान जे सिद्ध करते तेच अंतिम सत्य आहे असे जग ग्राह्य धरत होते. त्यामुळे आपण सर्व जाणतो, असेच जगाला वाटत होते. त्याच गोष्टीला जीवन जगण्याची संपूर्ण कला मानले गेले व या अहंकारात २००० वर्षे निघून गेली. मात्र अशा जगण्यातून जे हवे होते, ते मिळाले नाही. युद्धाचे संकट आहे, कलह आहे आणि दु:ख आहे. या गोष्टी समजायला लागल्या आणि हे जगणे अपूर्ण असल्याचे समजले. मग जगण्याची पूर्ण कला कोणती हा विचार सुरू झाला तेव्हा जगाचे लक्ष भारताकडे गेले. कारण भारताची ‘आर्ट ऑफ लिव्हींग’ वेदांमुळे परिपूर्ण झालेली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

India's focus on the world due to Vedashakti: Mohan Bhagwat | वेदशक्तीमुळे जगाचे लक्ष भारताकडे : मोहन भागवत

वेदशक्तीमुळे जगाचे लक्ष भारताकडे : मोहन भागवत

Next
ठळक मुद्देआर्ट ऑफ लिव्हिंगच्या वेद पाठशाळा व वेद संशोधन केंद्र प्रतिकृतीचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विज्ञान जे सिद्ध करते तेच अंतिम सत्य आहे असे जग ग्राह्य धरत होते. त्यामुळे आपण सर्व जाणतो, असेच जगाला वाटत होते. त्याच गोष्टीला जीवन जगण्याची संपूर्ण कला मानले गेले व या अहंकारात २००० वर्षे निघून गेली. मात्र अशा जगण्यातून जे हवे होते, ते मिळाले नाही. युद्धाचे संकट आहे, कलह आहे आणि दु:ख आहे. या गोष्टी समजायला लागल्या आणि हे जगणे अपूर्ण असल्याचे समजले. मग जगण्याची पूर्ण कला कोणती हा विचार सुरू झाला तेव्हा जगाचे लक्ष भारताकडे गेले. कारण भारताची ‘आर्ट ऑफ लिव्हींग’ वेदांमुळे परिपूर्ण झालेली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 


दि आर्टऑफ लिव्हींग आणि वैदिक धर्म संस्थान यांच्यावतीने दहेगाव, कळमेश्वर रोड येथे निर्माण होणाऱ्या श्री श्री गुरुकुल वेद पाठशाळा व वैदिक संशोधन केंद्राच्या प्रतिकृतीच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित अनावरण कार्यक्रमात कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, महापौर नंदा जिचकार, स्वामी हरिहर, चैतन्य स्वामी व वैदिक धर्म संस्थानचे ट्रस्टी प्रशांत कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. भागवत पुढे म्हणाले, स्वत:मध्ये डोकावण्याची दृष्टी वेदांमधून मिळते. आपण ज्या नियमाने चालतो तोच धर्म होय. ही सृष्टी स्वत:च्या नियमाने चालते. त्यातील काही आपल्याला माहीत आहे. माहीत नसले तरी सृष्टी चालत आहे. सृष्टी चालण्याचे तत्त्व वेदांमध्ये समाविष्ट आहे. वेद हे ऋषींच्या अंतस्फूर्तीमधून निर्माण झाले आहेत. त्यामुळे वेदांचे अध्ययन आणि संशोधन आवश्यक आहे. वेदांची संहिता सुरक्षित ठेवणे, लुप्त झालेल्या वेदांच्या शाखांचा पुनर्विष्कार करणे व त्या प्रचलित करणे गरजेचे आहे. वेदांचे संशोधन, जतन हे सृष्टीच्या कल्याणासाठी आवश्यक आहेत. हे काम वेद विद्यालयांनी करावे. हे करताना वेद अध्ययन व संशोधन करणाऱ्या वेदांच्या सर्व शाखांना एकत्रित जोडण्याचे आवाहन डॉ. भागवत यांनी केले. यावेळी प्रा. वरखेडी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रशांत कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर नवीन खानोरकर यांनी आभार मानले.
प्रतिकृती अनावरणानंतर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भास्कर दास यांनी बासुरी आणि सत्यंद्रसिंग सोलंकी यांनी संतुरच्या स्वरांनी आर्ट ऑफ लिव्हींगच्या सभागृहात उपस्थित सदस्यांना श्रवणानंद दिला. यावेळी गौतम डबीर यांनी सुमेरू संध्या सादर केली.
वेदशाळेत संपूर्ण वेदशाखांचा अभ्यास व संशोधन
कळमेश्वर रोडवरील दहेगाव येथे आर्ट ऑफ लिव्हींगची ही वेदशाळा सात एकर जागेत तयार होणार आहे. वेदशाळेच्या प्रवेशद्वारावर यज्ञशाळा असणार आहे. मध्ये श्रीनगरच्या शंकराचार्य मंदिरासारखे शिव मंदिर साकारले जाणार आहे. हे शिवमंदिर ओम आकाराच्या जलविहाराने वेढलेले असेल. जलतलावात देशातील प्रमुख सात नद्यांचे पाणी असेल. शंकराचार्य मंदिराप्रमाणे येथील शिवलिंगावर वर्षातून एकदा सूर्याची किरणे पडतील, अशी रचना केली जाणार आहे. परिसरात ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेदाचा अभ्यास पुरातन काळातील गुरुकुलप्रमाणे निर्मिती स्वतंत्र कुटींमध्ये केला जाणार आहे. ही वेद पाठशाळा देशातील सर्वात मोठी वेद शाळा असेल, ज्यामध्ये जगभरातील वेदतज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

Web Title: India's focus on the world due to Vedashakti: Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.