मान्सून लांबल्यास नागपूरसमोर भीषण पाणीटंचाईची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 09:09 PM2019-05-21T21:09:29+5:302019-05-21T21:10:56+5:30

नागपूर शहराला नवेगाव खैरी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोतलाडोह या प्रकल्पाच्या मृत पाणीसाठ्यातूनही पाणीपुरवठा करण्याला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा मृत जलसाठा उपलब्ध आहे.

If the monsoon is delayed, then the possibility of severe water scarcity ahead of Nagpur | मान्सून लांबल्यास नागपूरसमोर भीषण पाणीटंचाईची शक्यता

मान्सून लांबल्यास नागपूरसमोर भीषण पाणीटंचाईची शक्यता

Next
ठळक मुद्देमृत साठ्यातून होतोय पाणीपुरवठाटिल्लू पंप विरुद्ध विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराला नवेगाव खैरी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोतलाडोह या प्रकल्पाच्या मृत पाणीसाठ्यातूनही पाणीपुरवठा करण्याला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा मृत जलसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याचे दररोज १.२६ दलघमी पाणी तोतलाडोह प्रकल्पातून सोडण्यात येत आहे. मानसून लांबल्यास नागपूर शहरालाही भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. तीत पिण्याचे पाणी वापरताना महानगरपालिकेने पाण्याचा अपव्यय होणार नाही. तसेच अवैधपणे मुख्य जलवाहिनीवरून पाणी उचलणाऱ्या विरुद्ध तसेच टिल्लूपंप वापरणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मुदगल यांनी दिले. नवेगाव खैरी प्रकल्पातून दररोज ७५० दलघमी पाणी शहराला पुरविण्यात येते. कळमेश्वर, कोराडी तसेच खापा आदी नगरपालिकांनासुद्धा या प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अंबाझरी जलाशयातून वाडी नगरपालिकेला पिण्याचे पाणी पुरविण्याला सुरुवात झाली असून, पाणीपुरवठा करताना निर्जंतुकीकरण व जलशुद्धीकरण करूनच पिण्याचे पाणी पुरवावे, अशी सूचना करताना पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी स्वच्छ पाणी न वापरता सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावे. अशी सूचना यावेळी करण्यात आली.
ग्रामीण भागात पाणीटंचाई आराखड्यानुसार मंजूर करण्यात आलेल्या नवीन विंधन विहिरी, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विहीर खोल करणे तसेच गाळ काढणे आणि विंधन विहिरींच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिल्या.
बैठकीत अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, कार्यकारी अभियंता तुरखेडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता टाकळीकर तसेच नगरपालिकांचे कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

३५ गावांना ४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा
ग्रामीण भागातील पाणीटंचाईसाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यात १ हजार ५३० उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, यासाठी २८ कोटी ८० लक्ष रुपये विविध विभागांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये नवीन विंधन विहिरी, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विहीर खोल करणे व गाळ काढणे तसेच खासगी विहिरींच्या अधिग्रहणाला प्राधान्य देण्यात आले आहे. कामठी, हिंगणा व नागपूर ग्रामीण या तीन तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या ३५ गावांना ४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये कामठी तालुक्यातील चार गावांना नऊ टँकर, हिंगणा तालुक्यातील २० गावांना १२ टँकर तर नागपूर ग्रामीण तालुक्यातील ११ गावांना २७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

नगरपालिकेतही टँकर
- नगरपालिका तसेच नगरपंचायतअंतर्गत येणाºया नागरिकांना ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कळमेश्वर, सावनेर, भिवापूर, महादुला, कन्हान पिंपरी, रामटेक, मोहपा नगर परिषदेतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पिण्याचे पाणी काटकसरीने वापरा
ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविताना पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची खबरदारी घेताना पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
- अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी

Web Title: If the monsoon is delayed, then the possibility of severe water scarcity ahead of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.