कॅनव्हासवर साकारल्या संत्रानगरीच्या वैभवखुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:25 AM2019-02-11T10:25:03+5:302019-02-11T10:27:08+5:30

भोसलेंचा महाल, शुक्रवारी तलाव, संगमेश्वर मंदिर, मारबत, बडग्या, हरिहर मंदिर किंवा काशीबाईचे देउळ असो हे सर्व नागपूरची ३०० वर्षांच्या वैभवाची ओळख पटविणाऱ्या आहेत.

History of Orange city is on canvas | कॅनव्हासवर साकारल्या संत्रानगरीच्या वैभवखुणा

कॅनव्हासवर साकारल्या संत्रानगरीच्या वैभवखुणा

googlenewsNext
ठळक मुद्देबालचित्रकारांसह तीन पिढ्यांची रंगजत्रा बसोली ग्रुपचा अनोखा चित्रप्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भोसलेंचा महाल, शुक्रवारी तलाव, संगमेश्वर मंदिर, मारबत, बडग्या, हरिहर मंदिर किंवा काशीबाईचे देउळ असो हे सर्व नागपूरची ३०० वर्षांच्या वैभवाची ओळख पटविणाऱ्या आहेत. कदाचित नव्या पिढीला हा वारसा माहीत नसेल. मात्र बसोली ग्रुपच्या अनोख्या चित्रप्रकल्पातून या वैभवशाली खुणा कॅनव्हासवर उतरल्या. अगदी गोंडराजांच्या अस्तित्वापासून ते आताच्या मेट्रोपर्यंतचे वैभव शहरातील प्रतिष्ठित मान्यवर व व्यावसायिक चित्रकारांच्या सहभागातून बालचित्रकारांच्या अभिनव कल्पनांनी कॅनव्हासवर साकार झाले.
हा अनोखा चित्रप्रकल्प ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांच्या पुढाकाराने बसोली ग्रुप, बालजगत आणि आॅरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन व कोकियो कॅमलिन लिमि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी बालजगत, लक्ष्मीनगरच्या परिसरात राबविण्यात आला.
‘संत्रानगरी नागपूर कॅनव्हासवर’ हाच या चित्रप्रकल्पाचा विषयही होता. यात शहरातील ७० प्रतिष्ठित मान्यवर आणि ५० व्यावसायिक चित्रकारांसह ७५ बालचित्रकारांनी सहभाग घेतला.
सकाळी चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके, फिल्म गुरू समर नखाते, गिरीश गांधी, बैद्यनाथचे सुरेश शर्मा, विलास काळे, रघू नवरे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे औपचारिक उद््घाटन करण्यात आले. नागपूरचे गोंडराजा ते मेट्रो असा सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक असा प्रवास रंगातून उलगडत गेला. लावा येथील नागनदीचा उगम, चितार ओळ, सावजी हॉटेल, मारबत, बडग्या, हायकोर्ट, गुरुद्वारा, भोसलेकालीन तान्हा पोळा, हाडपक्या गणपती, यशवंत स्टेडियम, टेकडी गणपती, सेमिनरी हिल्स, रामझुला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ, दीक्षाभूमी, भोसले वेदशाळा, हत्तीनाला, संत्रा मार्केट, मॉडेल मिल, महाराज बाग, व्हीएनआयटी, तेलंगखेडी-अंबाझरी तलाव अशी नागपूरची ओळख असलेल्या ५० विषयांवरील चित्रे कॅनव्हासवर चितारण्यात आली. तीन पिढ्यांचे एकत्रीकरण व त्यांच्यातील संवादाचे चित्रात रूपांतरण महत्त्वाचे ठरले.
बालचित्रकारांसह प्रमोदबाबू रामटेके, दीपक जोशी, नाना मिसळ, दीनानाथ पडोळे, राहुल मेश्राम, डॉ. प्रफुल्ल क्षीरसागर, प्रा. अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार, संजय मोरे, शशिकांत ढोकणे, प्रा. बाबर शरीफ, गौरी देशपांडे, संजय वलीवकर, सोनाली चौधरी, सदानंद चौधरी, प्रफुल्ल डेकाटे आदी ५० व्यावसायिक चित्रकार आणि विविध क्षेत्रातील ७० प्रतिष्ठित मान्यवरही या रंगसंगतीत हरवून गेले होते.
यासाठी मुलांना काही दिवसाअगोदर नागपूरसंदर्भातील विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी त्याचे रेफरन्स शोधत ही रंगसंगती साकारली आहे. हे बंधनमुक्त चित्रण महत्त्वाचे आहे. लवकरच या चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान तैलरंगातील व्यक्तिचित्रणाच्या प्रत्यक्षिकामध्ये प्रा. प्रमोदबाबू रामटेके व प्रा. गफ्फार यांच्यासोबत चित्रकारांच्या कलागप्पा रंगल्या. बालजगतचे जगदीश सुकळीकर यांनी संयोजन केले होते.

संत्रानगरीच्या परिवर्तनाला महत्त्व
चंद्रकांत चन्ने यांच्यानुसार या कल्पनांमध्ये इतिहासाला नाही तर संत्रानगरीच्या परिवर्तनाला महत्त्व आहे. यात बालकलाकारांना किंवा व्यावसायिक चित्रकारांनाही बंधन नाही. सत्यापेक्षा त्यांचा कल्पनाविलास, फॅन्टसी महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

Web Title: History of Orange city is on canvas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :artकला