हॅट्स ऑफ...‘अभिनव’ आदर्श...; तरुणाच्या अंत्यसंस्काराअगोदर आई व पत्नीने पार पाडले राष्ट्रीय कर्तव्य

By योगेश पांडे | Published: April 19, 2024 11:56 PM2024-04-19T23:56:59+5:302024-04-19T23:59:05+5:30

दु:खाच्या क्षणातदेखील मतदानाला दिले प्राधान्य, समाजासमोर ठेवला अनोखा आदर्श...

Hats off Before the funeral of the young man, the mother and wife performed the national duty | हॅट्स ऑफ...‘अभिनव’ आदर्श...; तरुणाच्या अंत्यसंस्काराअगोदर आई व पत्नीने पार पाडले राष्ट्रीय कर्तव्य

हॅट्स ऑफ...‘अभिनव’ आदर्श...; तरुणाच्या अंत्यसंस्काराअगोदर आई व पत्नीने पार पाडले राष्ट्रीय कर्तव्य


नागपूर : तरुण वयातील मुलगा गमावल्यानंतर सर्वसाधारणत: कुटुंबीय त्या धक्क्याने अक्षरश: कोलमडते. मात्र, दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतरदेखील एका कुटुंबातील दोन महिलांनी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत समाजासमोर आदर्शच प्रस्थापित केला. डोळ्यांत अश्रू, हृदयात कालवाकालव या स्थितीत मुलाचे अंत्यसंस्कार होण्याअगोदर त्याची आई व पत्नी यांनी मतदान केंद्र गाठून मतदान केले. नागपुरातील तात्या टोपेनगरात ही घटना घडली असून, परिसरातील नागरिकांच्या तोंडून ‘हॅट्स ऑफ’ हेच शब्द बाहेर पडत होते.
दु:खाच्या क्षणात राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या मातेचे नाव मैथिली कऱ्हू असून, त्याची पत्नीचे नाव श्रुती आहे.

तात्या टोपेनगर निवासी अभिनव राम कऱ्हू (३९) या तरुणाचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. अभिनव हा अभियंता होता व नागपुरातील सोमलवार शाळेतून त्याने शालेय शिक्षण घेतले होते. तो बरीच वर्षे अमेरिकेत नोकरीनिमित्त होता. मात्र, यादरम्यान त्याला एएलएस या मोटॉर न्यूरॉन आजाराने ग्रासले. तो पत्नी व लहानग्या मुलासह नागपुरात परतला होता. बराच काळ शारीरिक त्रास सहन केल्यानंतर शुक्रवारी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या या संघर्षात त्याची आई मैथिली व पत्नी श्रुती या दोघी अखेरपर्यंत सोबत होत्या.

नातेवाईक पोहोचल्यानंतर ८ वर्षांच्या लहानग्या मुलाला त्यांच्याजवळ ठेवून दोघींनीही मतदान करायला जाण्याचा निर्णय घेतला. अनेकांना यामुळे धक्का बसला. मात्र, अभिनव असता तर त्याने कशाही स्थितीत मतदानाला जा असेच म्हटले असते या विचाराने दोघींनीही ज्युपिटर शाळेतील मतदान केंद्र गाठले आणि आपला हक्क बजावला. त्यांच्यावर कोसळलेला दु:खाचा डोंगर आणि त्या स्थितीतही निभावलेले राष्ट्रीय कर्तव्य पाहून मतदान केंद्र व बुथवरील कार्यकर्त्यांनीदेखील त्यांना सलामच केला. अभिनव हा स्वत: सामाजिक कार्यात जुळलेला होता व अमेरिकेत असतानादेखील तो शहरातील कार्यांत शक्य तेवढे सहकार्य करायचा. त्याची प्रकृती ढासळलेली असतानादेखील त्याने कुटुंबीयांना मतदानाला पाठविलेच असते. आज तो जिथे कुठे असेल तिथे समाधानी असेल. संघ स्वयंसेवक असलेल्या अभिनवच्या कुटुंबाने खरोखरच समाजासमोर आदर्श मांडला आहे, अशी भावना त्याच्या नातेवाइकांनी व्यक्त केली.

चुलत सासऱ्यांनीदेखील सोडला अंतिम सामना
अभिनवचे चुलत सासरे जयंत व्यास हे क्रिकेटपटू असून जमशेदपूर येथे ज्येष्ठांच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचा शुक्रवारी अंतिम सामना होता. मात्र, मतदानासाठी ते व त्यांचे सहकारी अतुल सहस्त्रबुद्धे, राम बंबावाले व अनंत नराळे नागपुरात पोहोचले. शहरात पोहोचत असतानाच त्यांना अभिनवच्या मृत्यूची दु:खद बातमी मिळाली.

Web Title: Hats off Before the funeral of the young man, the mother and wife performed the national duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.