गुंडांनी केला काँग्रेस नेत्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:21 AM2017-08-17T01:21:26+5:302017-08-17T01:22:31+5:30

पाचपावली नवी वस्तीत गुन्हेगारांनी जुन्या वैमनस्यावरून काँग्रेस नेत्याचा खून केला. या घटनेमुळे उत्तर नागपुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Gundsar murder case: Congress leader's murder | गुंडांनी केला काँग्रेस नेत्याचा खून

गुंडांनी केला काँग्रेस नेत्याचा खून

Next
ठळक मुद्देसाथीदारही जखमी : रुग्णालयापर्यंत पाठलाग करून केले वार, मुलाच्या खुनाचाही होता बेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली नवी वस्तीत गुन्हेगारांनी जुन्या वैमनस्यावरून काँग्रेस नेत्याचा खून केला. या घटनेमुळे उत्तर नागपुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खुनामुळे दु:खी झालेल्या नागरिकांनी पाचपावली ठाण्याला घेराव घातला.
अब्दुल्ला खान ऊर्फ अब्दुल्ला सेठ सैफुल्ला खान (५०) रा. टेका नवी वस्ती असे मृताचे नाव असून, अशफाक खान (३८) असे जखमी इसमाचे नाव आहे. अब्दुल्ला हे शहर काँग्रेस कमिटीचे सचिव होते. त्यांचे टेका नवी वस्तीत बिर्यानी सेंटर, पानठेला होता. अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा इमरान बिर्यानी सेंटर चालवीत होते. त्यांचा साळा पानठेला चालवीत होता. हत्येचा सूत्रधार कमर कॉलनी, जरीपटका येथील कुख्यात आरोपी साबीर ऊर्फ चाकू आहे. पोलिसांनी चाकू आणि त्याचे साथीदार मोहसीन, शोएबला अटक केली आहे. सूत्रानुसार तीन महिन्यापूर्वी रात्री २ वाजता चाकू आपल्या साथीदारासह अब्दुल्लाच्या पानठेल्यावर आला होता. त्याने सिगारेट, पान, खर्रा मागितला. अब्दुल्लाने पोलीस असल्याने पानठेला बंद असून थोडी वाट पाहण्यास सांगितले. चाकूने पोलिसांच्या नावाने शिवीगाळ करून अब्दुल्लाचा मुलगा इमरानला पानठेला उघडण्यास सांगितले. नकार दिल्यामुळे त्याचा इमरानसोबत वाद झाला. चाकूने साथीदारांच्या मदतीने अब्दुल्ला, इमरान आणि त्यांच्या साथीदारांवर हल्ला केला. या प्रकरणात चाकू आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हाही दाखल आहे. त्यानंतर चाकू अब्दुल्लाला धडा शिकविण्याच्या मागे लागला. टेका नवी वस्तीच्या मक्का मशीद चौकात मंगळवारी सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अब्दुल्लाचा मुलगा इमरान, त्याचे मित्र सोमवारी रात्री २ वाजता ध्वजारोहणाच्या चबुतºयाची रंगरंगोटी करीत होते. त्यावेळी चाकू आपला भाऊ, साथीदार रिजवान, इम्मू, शोएब व आठ-दहा लोकांसह तलवार आणि दुसºया शस्त्रांसह नवी वस्ती चौकात पोहोचला. त्यावेळी अब्दुल्ला घरी होते.
त्यांना ओळखीच्या व्यक्तीने चाकू चौकात आल्याचे सांगून मुलाला घरी बोलविण्यास सांगितले. धोक्याची घंटा ओळखून अब्दुल्ला आपले साथीदार अशफाक खान, शाबीर खान आणि सय्यद इमरान यांच्यासोबत तेथे पोहोचले. चाकू आणि त्याचे साथीदार अब्दुल्ला आणि त्यांच्या साथीदारांवर तुटुन पडले. अब्दुल्ला आणि अशफाक त्यांच्या हाती लागले. हल्लेखोरांनी अशफाकला जखमी करून अब्दुल्लावर रक्तबंबाळ होईपर्यंत वार केले. अब्दुल्लाला मारून चाकू आणि त्याचे साथीदार फरार झाले. अब्दुल्लाला त्यांचा मुलगा इमरान आपल्या मित्राच्या बाईकवर बसवून मेयो रुग्णालयाकडे रवाना झाला. चाकू आणि त्याचे साथीदार इमरानचा पाठलाग करीत कमाल टॉकीज चौकात पोहोचले. त्यांनी इमरानला थांबवून पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इमरान कसातरी तेथून निसटला. वडिलांचा जीव वाचविण्यासाठी इमरान जोरात बाईक चालवीत होता. मोमिनपुराजवळ नगरसेवक कामील अन्सारी यांच्या कार्यालयासमोर बाईक अनियंत्रित होऊन इमरान आणि त्याचा मित्र जखमी झाले.
लोक मदतीला आल्यामुळे चाकू आणि त्याचे साथीदार फरार झाले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने अब्दुल्ला, इमरान आणि त्याच्या मित्राला रुग्णालयात पोहोचविण्यात आले. तेथे अब्दुल्लाला मृत घोषित करण्यात आले. अब्दुल्ला टेका परिसरात मदत करणारे नेता आणि चर्चेतील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या हत्येमुळे टेका परिसरात तणाव पसरला. शेकडो नागरिक पाचपावली ठाण्यात पोहोचले. पोलिसांमुळे चाकू आणि त्याच्या साथीदारांचे मनसुबे उंचावल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला. तीन महिन्यापूर्वी दाखल गुन्ह्यातही चाकूविरुद्ध कारवाई करण्यात आली नव्हती.
अनेक गुन्ह्यात समावेश
चाकूच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा जरीपटका परिसरात जुगाराचा अड्डा आहे. तरीसुद्धा त्याच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला अभय देण्यात येत होते. त्याला एमपीडीए कायद्यानुसार तुरुंगात पाठविण्याचा प्रस्ताव तांत्रिक कारणामुळे अडकून पडला होता.
खुनानंतरही दिली धमकी
साबीर ऊर्फ चाकूने अब्दुल्लाच्या खुनानंतरही त्याचा मुलगा इमरानला फोन करून धमकी दिली. फोनवर धमकी दिली तेव्हा इमरान मेयो रुग्णालयात शेकडो समर्थकांसह उपस्थित होता. त्याच्या मोबाईलचा स्पीकर चालू असल्यामुळे समर्थकांनीही ही धमकी ऐकली. त्यानंतर समर्थकांनी पाचपावली ठाणे गाठून पोलिसांशी वाद घातला. अब्दुल्ला यांनी दोनदा महापालिकेची निवडणुक लढली होती. त्यांचे टेका परिसरात अनेक समर्थक आहेत.

Web Title: Gundsar murder case: Congress leader's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.