नागपूरच्या बाजारात चैतन्याची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 10:48 PM2019-04-03T22:48:47+5:302019-04-03T22:52:28+5:30

घरोघरी गुढ्या उभारून मराठी नववर्षाचा आरंभ करण्याच्या उत्साहाला चैतन्याचे तोरण लागले आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला बाजारात प्रचंड उत्साह संचारला आहे. सोने-चांदीच्या पारंपरिक खरेदीसह इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, घर व इतर वस्तूंच्या खरेदीवर नागपूरकरांचा भर राहणार आहे. व्यापाऱ्यांनी शोरूम पारंपरिक पद्धतीने सजविण्यास सुरुवात केली आहे.

Gudhi of enthusiasm in the Nagpur market | नागपूरच्या बाजारात चैतन्याची गुढी

श्रद्धानंद अनाथालयाच्या मुलींनी विक्रीसाठी तयार केलेल्या गुढी

Next
ठळक मुद्देगुढीपाडव्यानिमित्त बाजारात उत्साह : विविध सवलतींच्या योजना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरोघरी गुढ्या उभारून मराठी नववर्षाचा आरंभ करण्याच्या उत्साहाला चैतन्याचे तोरण लागले आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला बाजारात प्रचंड उत्साह संचारला आहे. सोने-चांदीच्या पारंपरिक खरेदीसह इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, घर व इतर वस्तूंच्या खरेदीवर नागपूरकरांचा भर राहणार आहे. व्यापाऱ्यांनी शोरूम पारंपरिक पद्धतीने सजविण्यास सुरुवात केली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये मुबलक स्टॉक
गुढीपाडव्याने मराठी नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी खरेदी करणे शुभ समजले जाते. त्यामुळेच शनिवार, ६ एप्रिलला गुढीपाडव्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करण्याचे नियोजन अनेकांचे असून, दुकानांमध्ये नव्या वस्तूंचे बुकिंगसुद्धा सुरू झाले आहे. बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्यामुळे विक्रेत्यांनी दुकानांमध्ये मुबलक स्टॉक करीत गुढीपाडव्याची तयारी केली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे शोरूम आघाडीवर असून एलईडी टीव्ही, फ्रीज, एसी अशा विविध वस्तूंमध्ये जास्त गुंतवणूक होण्याचा अंदाज विक्रेत्यांना आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी वस्तूंवर सवलत जाहीर केली आहे. त्याचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे.
घर बुकिंगसाठी बिल्डर्स सज्ज
सरकारने किफायत घराच्या बुकिंगवर १ टक्के आणि त्यानंतरच्या घरावर ७ टक्के जीएसटीची घोषणा केल्यानंतर बांधकाम क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक बिल्डर्सनी गुढीपाडव्यानिमित्त नवीन प्रकल्पाचे लाँचिंग आणि बुकिंगवर सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. ग्राहकांना आर्थिक लाभ देऊन प्रकल्प उभारणीत उत्साह आणण्याचा बिल्डर्सचा उद्देश आहे. गुढीपाडव्याला घर बुकिंग करण्यासाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज रिअल इस्टेटमधील व्यावसायिकांना आहे. खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांनाही गृहकर्जासाठी कमी व्याजदराच्या घोषणा जाहीर केल्या आहेत. शहरातील अनेक बिल्डर्सनी त्यांच्या नव्या स्कीम्सचे बुकिंग सुरू केले आहे. तशा जाहिरातीही झळकू लागल्या आहेत.
सोने-चांदीची खरेदी शुभ
गुढीपाडव्यानिमित्त सोने आणि चांदीच्या वस्तू खरेदीची प्रथा आहे. यादिवशी सराफांकडे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यंदाही सराफा बाजारात १०० कोटींपेक्षा जास्त खरेदी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यंदा सराफा व्यावसायिकांनी चांदीच्या गुढी बाजारात आणल्या आहेत. या मुहूर्तावर किमान एक ग्रॅम सोने घेणे शुभ मानले जाते. या पार्श्वभूमीवर सराफा बाजार सज्ज झाला आहे. नोटाबंदीनंतर सोन्याच्या भावामध्ये सातत्याने चढउतार होत आहे. बुधवारी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव ३२,७८० रुपये होता. पुढे भाव वाढण्याची शक्यता नाही. सोन्यामध्ये प्रामुख्याने अंगठी, ब्रेसलेट, नेकलेस, मंगळसूत्र, लॉकेट यांच्यासोबतच सुवर्ण नाणी घेण्यास ग्राहक प्राधान्य देत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी दागिने व विविध वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्याचे सराफांनी सांगितले.
ऑटो बाजारात उत्साहाचे वातावरण
दुचाकी वा चारचाकीचे बुकिंग करून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वाहन घरी नेण्याची प्रथा आहे. त्यानुसार अनेकांनी गाड्यांचे बुकिंग केले आहे. या दिवशी गाडी नेण्यासाठी नामांकित कंपन्यांच्या शोरूममध्ये बुकिंगसाठी ग्राहकांची गर्दी आहे. गुढीपाडव्यानिमित्त कंपनीकडे जास्त गाड्यांची मागणी केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
बाजारपेठा फुलल्या
गुढीपाडव्यासाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे. शहरातील प्रमुख बाजारांपेठांमध्ये अनेक वस्तू विक्रीकरिता आल्या आहेत. भल्या सकाळीच गुढी उभारण्यात येत असल्याने त्यासाठी लागणारे साहित्य व इतर वस्तूंना मागणी आहे.

Web Title: Gudhi of enthusiasm in the Nagpur market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.