नागपूर जिल्ह्यातल्या बोटेझरीत बहरली अनमोल रोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:46 AM2018-07-02T10:46:54+5:302018-07-02T10:50:56+5:30

‘यंदा एकच लक्ष्य १३ कोटी वृक्ष’ अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. ही घोषणा सार्थ ठरविण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील बोटेझरी शिवारात रोपवाटिका तयार केली.

Grand nursery in Botezari in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातल्या बोटेझरीत बहरली अनमोल रोपवाटिका

नागपूर जिल्ह्यातल्या बोटेझरीत बहरली अनमोल रोपवाटिका

googlenewsNext
ठळक मुद्देतीन हेक्टरचा व्याप४० प्रजातींची तब्बल चार लाख रोपटी उपलब्ध

अभय लांजेवार/शरद मिरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: ‘यंदा एकच लक्ष्य १३ कोटी वृक्ष’ अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील वर्षीच्या वन महोत्सवात केली होती. त्यांची ही घोषणा सार्थ ठरविण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्षभर विशेष कष्ट घेत दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील बोटेझरी शिवारात रोपवाटिका तयार केली. तीन हेक्टर परिसरात असलेल्या या रोपवाटिकेत आज ४० विविध प्रजातींची तब्बल चार लाख रोपटी मोठ्या डौलात उभी आहेत.
या रोपवाटिकेत फेब्रुवारी २०१७ मध्ये बीज प्रक्रियेची तयारी सुरू झाली. या रोपवाटिकेचे नियोजनही अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आले. रोपट्यांच्या योग्य संगोपनासोबतच पाणी, खतं, फवारणी याचाही योग्यवेळी वापर करण्यात आला. प्लास्टिक पिशव्यांमध्ये माती, शेणखत व रेतीचे योग्य मिश्रण ही रोपटी जगविण्यात आली. विशेष म्हणजे, यातील एकही रोपटे सुकले अथवा आजाराने मृतवत झाले नाही.
सध्या या रोपवाटिकेत साग, पिंपळ, बांबू, वड, उंबर, बकान, खैर, सीताफळ, चिंच, आंबा, फणस, बेहडा, येन, करू, रिठा, जांभूळ, शेवगा, बदाम, अशोका, मोह, तेंदू, आजन, विलायती चिंच आदी प्रजातींची दर्जेदार रोपटी बघावयास मिळते. त्यामुळे ही रोपटी ९ ते १८ महिन्यांची असून, यातील १ लाख ९८ हजार रोपटी लागवडीसाठी तयार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सोबतच ९ महिन्यांच्या आतमधील दोन लाख रोपटी पुढील वन महोत्सवादरम्यान लागवडीसाठी तयार राहणार असल्याचा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांनीही या रोपवाटिकेची प्रत्यक्ष पाहणी केली. उपवन संरक्षक डी. मल्लिकार्जुन यांच्या मार्गदर्शनात सहायक वन संरक्षक एस. एन. क्षीरसागर, दक्षिण उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. तडस, क्षेत्रसहायक आर. एन. देशमुख, वनरक्षक डी. एस. वावरे, रोजगार सेवक बाबाराव टाले आदींनी या रोपवाटिकेसाठी जीवाचे रान केले, हे विशेष!

दुर्मिळ ‘घोश ट्री’
चार लाख रोपांच्या या रोपवाटिकेत ‘करू’ नावाच्या दुर्मिळ वनस्पतींच्या रोपांचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. या वनस्पतीपासून डिंक तयार होतो. उमरेड, पवनी  वनपरिक्षेत्रात पांढरा गोटा परिसरात या प्रजातीचे वृक्ष आहेत. हुबेहूब महिलेचा आकार साकारलेलेही वृक्ष या परिसरात आहे. या रोपवाटिकेत चार हजार ‘घोश ट्री’ची रोपटीही डोलत आहेत.

जैविक ‘फॉर्म्युला’
ही रोपवाटिका १०० टक्के यशस्वी ठरली आहे. शिवाय, ही जैविक फॉर्म्युल्यावर तयार केल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी पी. एस. तडस यांनी आवर्जून सांगितले. पक्षिमित्र नितीन राहाटे यांनी हा ‘सिक्रेट फॉर्म्युला’ वनविभागाला दिल्याचे तसेच त्याचे तंतोतंत पालन करण्यात आल्याचे तडस यांनी सांगितले. या फॉर्म्युल्यामुळे रोपांची वाढ व दर्जा चांगलाच सुधारला. यात रासायनिक खतांचा वापर टाळण्यात आला. नितीन राहाटे स्वत: याठिकाणी येऊन आम्हास सहकार्य करतात. मेहनतही घेतात, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Grand nursery in Botezari in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.