मारिया शाकीर यांच्या कुंचल्यातून साकारले गेले ‘गोल्ड फाॅईल आर्टवर्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 06:48 PM2022-07-02T18:48:32+5:302022-07-02T18:50:11+5:30

Nagpur News युवा चित्रकार मारिया हसनैन शाकीर यांच्या कुंचल्यातून ‘गोल्ड फाॅईल आर्टवर्क’ साकारले गेले आहे. या चित्रांचे प्रदर्शन ‘कथा’ या शीर्षकाखाली लोकमत भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये सादर झाले आहे.

'Gold File Artwork' by Maria Shakir | मारिया शाकीर यांच्या कुंचल्यातून साकारले गेले ‘गोल्ड फाॅईल आर्टवर्क’

मारिया शाकीर यांच्या कुंचल्यातून साकारले गेले ‘गोल्ड फाॅईल आर्टवर्क’

googlenewsNext
ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत ‘कथा’ चित्रप्रदर्शन जीवनातील अपेक्षांचा एक ‘अलग ॲन्गल’

नागपूर : चित्र म्हणजे केवळ रंगांचा खेळ नव्हे; तर ते डोळ्यांद्वारे मेंदूतून अंतरंगात उसळणाऱ्या भावनांचे मायाजाळ आहे. जेव्हा हेच मायाजाळ व्यक्त होते तेव्हा कुंचल्याद्वारे कॅन्व्हॉसवर जे काही रेखाटले जाते, ते रेखाटन संवेदनेचे प्रतीक बनते. युवा चित्रकार मारिया हसनैन शाकीर यांच्या कुंचल्यातून असेच ‘गोल्ड फाॅईल आर्टवर्क’ साकारले गेले आहे. या चित्रांचे प्रदर्शन ‘कथा’ या शीर्षकाखाली लोकमत भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये सादर झाले आहे.

शनिवारी मारिया शाकीर यांच्या ‘कथा’ या द्विदिवसीय चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या सदरातून प्रसिद्धीस आलेले वास्तवदर्शी चित्रकार बिजय बिस्वास यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या चित्रप्रदर्शनात मारिया यांनी साकारलेल्या ४५ पेंटिंग्ज सादर करण्यात आल्या आहेत. बेंगळुरू येथील सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझायनर ॲण्ड टेक्नॉलॉजी येथून बॅचलर ऑफ क्रिएटिव्ह आर्ट इन कॉन्टेम्पररी आर्ट्स ही पदवी घेतलेल्या मारिया यांनी या प्रदर्शनात हँडरॉन व डिजिटल आर्टवर्क पेंटिंग्ज ठेवल्या आहेत. या प्रदर्शनातील ‘गोल्ड फॉईल आर्टवर्क’ लक्ष वेधून घेणाऱ्या ठरत असून, वैशिष्ट्यपूर्ण अशा या गोल्ड फाॅईल आर्टवर्कमध्ये माणसाच्या मनातील अपेक्षांचे काहूर व्यक्त करण्यात आले आहे.

कोरोना संक्रमण काळातील दोन वर्षांचे रिफ्लेक्शन या चित्रातून व्यक्त होते. लॉकडाऊनमध्ये लोक घरच्या घरी थांबले असले तरी त्यांचे जीवन सुरू होते, अशी ही ‘कथा’ चित्रप्रदर्शनाची संकल्पना आहे. मारिया यांच्या चित्रांचे हे दुसरे एकल प्रदर्शन असून, २०१९ मध्ये पहिले प्रदर्शनही जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्येच भरविण्यात आले होते. त्यांनी ग्रुप एक्झिबिशनमध्ये बेंगळुरू, मुंबई व जयपूर येथेही सहभाग घेतला आहे. भविष्यात आपल्या चित्रांचे प्रदर्शन अन्य शहरांतही भरविण्याचा मानस मारिया शाकीर यांनी या वेळी व्यक्त केला.

......................

Web Title: 'Gold File Artwork' by Maria Shakir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.