रजोनिवृत्तीला प्रसन्नतेने समोर जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 09:23 PM2018-12-13T21:23:20+5:302018-12-13T21:24:48+5:30

रजोनिवृत्ती म्हणजेच ‘मेनोपॉज’चा एक काळ आहे. तो कायम राहत नाही. या बदलाला प्रसन्नतेने सामोरे जायला हवे. मानसिकता बिघडत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा. हा आजार नाही. शारीरिक बदलाचा एक काळ आहे. सकारात्मक विचारसरणीने त्याला सामोरे गेल्यास त्रास कमी होतो. त्यासाठी आपल्या आहार आणि विहारामध्ये बदल करणे आवश्यक ठरते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. कांचन समीर गोलावार यांनी मुलाखतीत दिली.

Go in front of menopause with pleasant | रजोनिवृत्तीला प्रसन्नतेने समोर जा

रजोनिवृत्तीला प्रसन्नतेने समोर जा

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. कांचन गोलावार यांनी लोकमत आॅनलाईनला दिलेली खास मुलाखत

सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रजोनिवृत्ती म्हणजेच ‘मेनोपॉज’चा एक काळ आहे. तो कायम राहत नाही. या बदलाला प्रसन्नतेने सामोरे जायला हवे. मानसिकता बिघडत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा. हा आजार नाही. शारीरिक बदलाचा एक काळ आहे. सकारात्मक विचारसरणीने त्याला सामोरे गेल्यास त्रास कमी होतो. त्यासाठी आपल्या आहार आणि विहारामध्ये बदल करणे आवश्यक ठरते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. कांचन समीर गोलावार यांनी मुलाखतीत दिली.
रजोनिवृत्ती म्हणजे काय?
रज म्हणजे पाळी. निवृत्ती म्हणजे बंद होणे. रजनिवृत्ती ही एक नैसर्गिक क्रिया आहे. वयाच्या १३ ते १५ व्या वर्षी मासिकपाळीला सुरुवात होते व वयाच्या ४५ व्या वर्षानंतर बीजग्रंथी म्हणजे ‘ओव्हरी’चे कार्य संपुष्टात येते. बीजग्रंथीमधील हार्मोन्स तयार होण्याचे थांबल्यामुळे मासिकपाळी येणे बंद होते. रजोनिवृत्ती काळात स्त्रियांमध्ये ‘अँक्झायटी’ व नैराश्य दिसून येते. ज्यामुळे स्त्रिया उच्च रक्तदाबालाही बळी पडतात.
रजोनिवृत्तीमुळे होणारे भावनिक बदल कोणते?
१) लवकर राग येणे, २) वेळोवेळी मन:स्थिती बदलणे, ३) एकाग्रता कमी होणे, ४) स्मरणशक्ती कमी होणे. ५) तणाव, अस्वस्थता, खिन्नता वाढणे, ६) निद्रानाश, छातीत धडधडणे आदी भावनिक बदल दिसून येतात.
रजोनिवृत्तीमुळे कुठले बदल होतात?
१) मासिकपाळी काही महिने थांबते व पुन्हा सुरू होते.
२) काही वेळा खूप रक्तस्राव होतो किंवा रक्ताच्या गुठळ्या पडतात.
३) मूत्रविसर्जनावर नियंत्रण नसते. (उदा. खोकला, शिंका येतात तेव्हा नियंत्रण सुटणे)
४) चक्कर येणे.
५) स्तन संवेदनशील होणे.
६) हाडे ठिसूळ होणे.
७) मणक्यांची झीज होणे.
८) इस्ट्रोजन पातळी कमी झाल्यामुळे हृदयरोग होण्याची संभावनाही असणे,
९) योनीमार्ग कोरडा राहणे व जंतुसंसर्ग होणे.
१०) गरम वाफा चेहऱ्याभोवती असल्यासारखे वाटणे.
११) वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे.
१२) बद्धकोष्ठता, सांधेदुखी होणे, आदी बदल दिसून येऊ शकतात.
सध्या वेळेआधी रजोनिवृत्ती प्राप्त होणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
रजोनिवृत्तीनंतर आहार कसा असावा?
रजोनिवृत्तीनंतर आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास काही प्रमाणात त्रास कमी होतो.
१) ‘फायटा-इस्ट्रोजन’चा आहारात समावेश करावा. या पदार्थाच्या सेवनामुळे नैसर्गिकरीत्या ‘इस्ट्रोजन’ मिळाल्यामुळे मानसिक अस्वस्थता व हाडांची झीज होण्याचे प्रमाण कमी होते. ‘फायटा-इस्ट्रोजन’ असलेले पदार्थ आहेत, सोयाबीन, चने, फ्लॅक्स सीड, सूरजमुखी बीज, फळे व हिरव्या भाज्या.
२) कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा. यात हाडांच्या मजबुतीसाठी दूध, दही, चीज, मासे व अंडी खाणे आवश्यक ठरते.
३) लोहयुक्त आहाराचा (आयर्न) समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या, अंडी, मासे यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते.
४) ‘व्हिटॅमीन-ई’चे महत्त्व. व्हिटॅमीन ई हे केस, त्वचा यासाठी आवश्यक. रजोनिवृत्तीत त्वचा शुष्क होणे, सुरकुत्या पडणे व केस गळणे ओघाने आलेच. म्हणून व्हिटामीन-ई युक्त आहाराचा समावेश असावा. बदाम, सुखामेवा, तूप, मासे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटामीन-ई च्या गोळ्यांचा वापर करावा.
५) फायबरयुक्त आहार व तेल. फायबरयुक्त आहारात गहू, बाजरा, ज्वारी, रागी, अंकुरीत धान्य, डाळी, फळे, भाज्या घ्याव्यात. जास्त तळलेले पदार्थ खाऊ नये. तेल कमी प्रमाणातच खावे. आहाराचे व व्यायामाचे नियम शरीराला घालून द्यावे.
रजोनिवृत्तीनंतरची दैनंदिनी कशी असावी?
रजोनिवृत्तीचा जर खरा आनंद घ्यायचा असेल तर नियमित आहार + नियमित व्यायाम + डॉक्टरांचा सल्ला = आनंदी रजोनिवृत्ती, हे सूत्रे आत्मसात करणे आवश्यक आहे. यात पहाटे ६ वा. निंबूपाणी किंवा ६ भिजलेले बदाम. सकाळी ७ वा. १ ग्लास दूध, सकाळी ८ वा. २ अंडी, आम्लेट किंवा अंकुरीत उसळ किंवा उपमा किंवा रागी किंवा दलिया. सकाळी ११ वा.१ कप सूप कोणतेही (टमाटे/गाजर/पालक/भाजीचे सूप) दुपारी १.३० ते २ वा. पोळी, भाजी, डाळ, मासोळी, दही, ताक. मध्यान्ह ४ ते ६ वा. दरम्यान मुरमुरे, ताक, सोयाबीन स्नॅक्स किंवा फलाहार. रात्री ८ वा. बाजरी किंवा ज्वारीची पोळी, हिरवी भाजी, मुगाची खिचडी, थोडा चवीला गूळ असावा.
व्यायाम कोणता करावा?
१) ‘किगल’ व्यायाम: हा व्यायाम संबंधित डॉक्टरांकडे जाऊन समजावून घ्यावा व दिवसातून १० काऊंट असे ५-६ वेळा करावे. या व्यायामामुळे मूत्रविसर्जनावर नियंत्रण राहण्यास मदत होते.
२) व्यायाम व कार्डिओ व्यायाम कमीतकमी १५० मिनिटे करावा.
३) दररोज पहाटे योगा, सायकल चालविणे, अनुलोमविलोमचा समावेश असावा. व्यायामामुळे रजोनिवृत्तीत येणारे नैराश्य, वारंवार मन:स्थितीत होणारे बदल, अ‍ॅक्झाटरी, केगलमुळे वारंवार होणाऱ्या मूत्रवृत्तीवर ताबा राहणे, बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांवर नियंत्रण मिळविता येते.

डॉक्टरांचा सल्ला आवश्यक का?
रजोनिवृत्ती जरी नैसर्गिक असली तर दुर्लक्षित असता कामा नये. रजोनिवृत्त महिलेने खालील अति महत्त्वपूर्ण बाबी लक्षात ठेवाव्या व डॉक्टरांना ताबडतोब भेटावे.
१) दर दहा महिन्यांनी आपले पॅपस्मीयर तपासणी करावी (गर्भाशयाच्या कॅन्सरचे स्क्रिनिंग)
२) वर्षातून एकदा स्तन तपासून घ्यावे. दुखल्यास, गाठ असल्यास, पाणी, द्रव निघाल्यास सल्ला घ्यावा.
३) रजोनिवृत्ती काळात जास्त रक्तस्राव असल्यास गुठळ्या पडल्यास किंवा रजोनिवृत्तीचा बराच काळ लोटल्यावर अचानक थेंबभर रक्त पडल्यास किंवा (शारीरिक संबंध झाल्यावर रक्तस्राव झाल्यास ताबडतोब स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटावे व सांगितलेल्या तपासण्या करून घ्याव्या.)
४) पोटाला फुगारा, पोटात गोळा व पोटात पाणी होणे, ओटीपोटात दुखणे, वजन कमी होणे असे असल्यास स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटावे. अंडाशयाच्या कर्करोगाचे लक्षणे ही ठराविक नसतात. अकस्मात अंडाशयाचे कर्करोग निदान होते.
५) तसेच हाडांची झीज, सांधेदुखीसाठी कॅल्शियमच्या गोळ्या सल्ल्यानुसार घ्याव्यात.
६) श्वेतप्रदर (पांढरे जाणे), अतिप्रमाणात श्वेतप्रदर होणे, वास असणे याबद्दल ताबडतोब सल्ला घ्यावा.
७) वर्षातून एकदा आपले संपूर्ण शरीराची तपासणी करून घ्यावी.
अशाप्रकारे मानसिक, शारीरिक स्तरावर असलेले बदल लक्षात घेता त्यावर नियमित आहार, नियमित व्यायाम व डॉक्टरांचा सल्ला योग्यवेळी घेणे हीच रजोनिवृत्तीची खरी गुरुकिल्ली आहे.

Web Title: Go in front of menopause with pleasant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.