A gang of betel-nut theft arrested in Nagpur | सुपारी चोरणाऱ्या टोळीला नागपुरात शिताफीने अटक 
सुपारी चोरणाऱ्या टोळीला नागपुरात शिताफीने अटक 

ठळक मुद्दे दरोड्यात सापडलेल्या गुन्हेगारांचा खुलासा : १७ लाखांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डायरेक्टोरेट आॅफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय) ने जप्त केलेली ४५ लाख रुपयांची सुपारी चोरणारी गँग पोलिसांच्या हाती लागली आहे. कळमना पोलीस ठाणेपरिसरात दरोड्याच्या तयारीत पकडलेल्या गुन्हेगारांनीच कोल्ड स्टोअरेजमधून सुपारी चोरली होती. आरोपींनी चौकशीत याचा खुलासा केला आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ११ फेब्रुवारीच्या रात्री गस्तीवर असताना चिखली येथील रेल्वे क्रॉसिंगच्याजवळ संदिग्ध अवस्थेत असलेल्या सहा लोकांना पकडले होते. तपासणी केली असता त्यांच्याजवळ दोन दुचाकी व दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख रमजान शेख जमीर (४०), मिनीमातानगर, कुलदीप ऊर्फ पायजामा सुभाष गणवीर (२३), न्यू कॉलोनी, राजेश धनराज कठाणे (३२) म्हाडा क्वार्टर, चिखली, सूर्यकांत ऊर्फ जगदीश ऊर्फ जग्गा मारोतराव पिसे (३२), जितेंद्र पुरुषोत्तम पुर्रे (२२), गुलमोहरनगर तसेच अनिल ऊर्फ बारिक कृष्णा साहू (१९), विजयनगर यांना अटक केली होती.
दरम्यान पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांना याच आरोपींनी मौदा येथील गोयल कोल्ड स्टोअरेजमधून सुपारी चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कडक चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. डीआरआयने काही दिवसांपूर्वी शहरातीत सुपारी व्यापाऱ्यांवर धाडी घातल्या होत्या. सीमा शुल्क न भरता नागपुरात आणलेली २५५ टन सुपारी जप्त केली होती. यापैकी ४५ लाख १८ हजार रुपये किमतीची १८ टन सुपारी चोरीला गेली होती व याचा खुलासा ८ फेब्रुवारी रोजी झाला होता. डीआरआयचे अधिकारी अनिल कुमार पंडित यांच्या तक्रारीवर मौदा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाहोता व शहर तसेच ग्रामीण पोलीस याचा शोध घेत होते.
या टोळीचा सूत्रधार रमजान आहे. डीआरआयच्या धाडीत जप्त केलेली सुपारी कामगारांच्या मदतीने कोल्ड स्टोअरेजमध्ये पाठविण्यात आली होती. रमजान गाड्या चालविण्याचे काम करतो. तो ही या कामात सहभागी होता. याच दरम्यान त्याने सुपारी चोरी करण्याची योजना आखली. शटरच्या आतमध्ये हात टाकून नट बोल्ट खोलून कोल्ड स्टोअरेजमध्ये प्रवेश करता येतो हे त्याच्या लक्षात आले होते. त्याचा पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला व त्यानंतर तो वारंवार सुपारी चोरू लागला. रमजानने साथीदारांच्या मदतीने २३१ पोती सुपारी चोरली. पोलिसांनी आरोपींकडून ८९ पोती सुपारी व वाहनांसह १७ लाख रुपयांचा माल हस्तगत केला. यानंतर आरोपींना मौदा पोलिसांकडे सोपविण्यात आले.
व्यापाऱ्यांवरही कारवाई
 आरोपींनी चोरलेली सुपारी सतीश लक्ष्मीनारायण केशरवानी (५९), लालगंज व राहुल गजानन बावनकुळे (२८) भारतनगर, कळमना यांना विकली होती. त्यामुळे या व्यापाऱ्यांनाही ताब्यात घेऊन मौदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. केशरवानी हे मिरची व्यापारी आहेत तर बावनकुळे हे दलाल आहेत. मौदा पोलीस त्यांच्याविरोधात चोरीचा माल खरेदी करण्याचा गुन्हा दाखल करू शकते.
आरोपी आहेत सराईत गुन्हेगार
 अटक करण्यात आलेले आरोपी अट्टल गुन्हेगार आहेत. जगदीशच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल आहे. कुलदीप ऊर्फ पायजामा, राजेश चोरीच्या प्रकरणात सहभागी आहे. सूत्रधार रमजानच्या विरोधात छेडखानीचा गुन्हा दाखल आहे. आरोपींनी ज्याप्रकारे चार महिने सुपारी चोरून ती विकण्याचे काम केले, यावरून ते सराईत गुन्हेगार असल्याचे सिद्ध होते.


Web Title: A gang of betel-nut theft arrested in Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.