Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; आदिगुरुश्रीगणकाचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 09:43 AM2018-09-14T09:43:17+5:302018-09-14T09:44:01+5:30

 गाणपत्य संप्रदायाचे आद्यगुरू म्हणून भगवान श्री गणकाचार्य यांचा उल्लेख केला जातो. श्रीबुद्धिसुत अर्थात भगवान गणेशांच्या बुद्धीनामक शक्तीचे पुत्र अशा रूपात यांच्या अलौकिकत्वाला परंपरा वंदन करते.

Ganesh Chaturthi 2018; Ganaapitha Acharya tradition; Adiguru Shree Ganakacharya | Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; आदिगुरुश्रीगणकाचार्य

Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; आदिगुरुश्रीगणकाचार्य

Next
ठळक मुद्देश्रीगणेश अथर्वशीर्षाचे ऋषी आहेत भगवान गणकाचार्य

 प्रा. स्वानंद गजानन पुंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गाणपत्य संप्रदायाचे आद्यगुरू म्हणून भगवान श्री गणकाचार्य यांचा उल्लेख केला जातो. श्रीबुद्धिसुत अर्थात भगवान गणेशांच्या बुद्धीनामक शक्तीचे पुत्र अशा रूपात यांच्या अलौकिकत्वाला परंपरा वंदन करते. गणेश उपासकांमध्ये सर्वश्रेष्ठ रूपात सर्वख्यात असलेले स्तोत्र म्हणजे श्री गणेश अथर्वशीर्ष. या श्रीगणेश अथर्वशीर्षाचे ऋषी आहेत भगवान गणकाचार्य. त्यांच्या त्या ऋषित्वाचा श्रीगणेश अथर्वशीर्षातच ‘गणक ऋषि:’ असा सुस्पष्ट उल्लेख पाहावयास मिळतो. गणेश अथर्वशीर्ष हे श्रुती प्रस्थान, श्री गणेशगीता हे स्मृती प्रस्थान आणि महावाक्यदर्शनभूत परमाद्वैतसूत्र हे सूत्र प्रस्थान अशा प्रस्थानत्रयीची मांडणी करून श्री गणकाचार्यांनी गाणपत्य संप्रदायाची मुहूर्तमेढ केली. याशिवाय ब्रह्मज्ञानसुखोदय नामक दिव्य ग्रंथाची रचना त्यांनी केल्याचा उल्लेख मिळतो. मात्र दुर्दैवाने त्यांचे या तीनही प्रस्थानावरील भाष्य किंवा हा ग्रंथ हे काहीही साहित्य आज उपलब्ध नाही. भगवान श्रीगणेशांच्या सगुण साकार रूपाला गाणपत्य संप्रदायात श्रीगुणेश असे म्हटले जाते. पाचही देवतांचे एकत्रित रूप असे श्रीगुणेश दशभुज रूपात वर्णिले असतात. यांनाच श्री वल्लभेश असेही म्हणतात. याच श्रीगुणेशांचे गुरुरूपातील अवतरण म्हणजे श्री गणकाचार्य होय. आषाढ शुद्ध पौर्णिमा हा त्यांचा प्रगटदिन, कार्तिक शुद्ध पौर्णिमा हा त्यांचा दिग्विजय आरंभ दिन, माघ शुद्ध पौर्णिमा हा त्यांचा श्रीक्षेत्र मोरगाव येथील ब्रह्मभूयमहासिद्धीपीठावर गुरुपदी आरूढ होण्याचा दिवस आणि वैशाख शुद्ध पौर्णिमा हा त्यांचा अवतार समाप्ती दिवस. या चारही पौर्णिमांना गाणपत्य संप्रदायात गुरुपौर्णिमा म्हणूनच साजरे केले जाते. श्रीक्षेत्र मोरगावला सभामंडपामध्ये जे कासव मांडलेले आहे ते श्रीगणकाचार्यांचे स्थान होय. त्यांच्या निर्गुणत्वाचा आदर म्हणून तिथे त्याच रूपात त्यांची पूजा केली जाते. जसे ते कासव भगवंताकडेच जाते तसेच सर्व भक्तांना हळुवारपणे भगवंताकडे घेऊन जाणारे आदिगुरु म्हणून श्री गणकाचार्यांना गाणपत्य संप्रदायात परब्रह्म गुरु म्हणून वंदन केले जाते.

 

Web Title: Ganesh Chaturthi 2018; Ganaapitha Acharya tradition; Adiguru Shree Ganakacharya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.