नोकरीचे आमिष दाखवून नागपूर जिल्ह्यात बेरोजगारांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:26 AM2018-08-29T10:26:19+5:302018-08-29T10:29:43+5:30

महानिर्मिती कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष देत अनेक बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

fraud by temptation of job to unemployed people in Nagpur district | नोकरीचे आमिष दाखवून नागपूर जिल्ह्यात बेरोजगारांना गंडा

नोकरीचे आमिष दाखवून नागपूर जिल्ह्यात बेरोजगारांना गंडा

Next
ठळक मुद्देबनावट नोकरीचे आदेश कधी होणार गुन्हा दाखल ?

दिनकर ठवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानिर्मिती कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष देत अनेक बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ठग हा तामसवाडी (सावनेर) येथील असल्याची माहिती आहे. मात्र आपले बिंग फुटणार असल्याची माहिती लागताच त्याने बेरोजगार युवकांना कोराडी येथील वीज केंद्रात सेवेत रुजू होण्याचे बोगस आदेशही दिल्याची माहिती आहे.
आपल्याला कायम नोकरीचे आदेश मिळाल्याच्या आनंदात असलेले युवक जेव्हा कोराडी येथील वीज केंद्रात रुजू होण्यासाठी गेले तेव्हा त्यांना देण्यात आलेले आदेश बोगस असल्याचे लक्षात येताच या प्रकरणाचे बिंग फुटले.
कोराडी वीज केंद्रातील सुरक्षा यंत्रणेने संबंधित प्रकरणाची माहिती कोराडी पोेलिसांना दिली. मात्र या प्रकरणात पैशाचे व्यवहार खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने कोराडी पोलिसांनी हे प्रकरण खापरखेडा पोलिसांकडे वर्ग केले आहे. सध्या तरी या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
याबाबत माहिती अशी की, सोमवारी दुपारच्या सुमारास पाच युवक कोराडी वीज केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ गेले. त्यांनी नोकरीच्या आदेशपत्राची प्रत स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांना दाखवित केंद्रात प्रवेश करण्याची परवानगी मागितली. मात्र युवकांजवळील नियुक्ती आदेशाबाबत संशय आल्याने सुरक्षा अधिकाºयांनी वीज निर्मिती केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात हे प्रकरण आणून दिले.
तपासणी अंती हे सर्व आदेश बोगस असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ व्यवस्थापक एस. के. इंगळे, उपवरिष्ठ व्यवस्थापक आर.आर.लोंढे व कनिष्ठ सुरक्षा अधिकारी भांडारकर यांनी संबंधित युवकांना कोराडी पोेलिसांच्या ताब्यात दिले. या युवकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ईश्वर तिमाजी पैटउईके रा.तामसवाडी याने दीड वर्षांपूर्वी वीज केंद्रात नोकरी लावून देण्यासाठी अनेक युवकांकडून दीड ते दोन लाख रुपये घेतले आहे. संजय हरिचंद्र सातपैश (३८) रा.तेली मोहल्ला,नागपूर, आशिष अरविंदसिंग ठाकूर (२४) रा.मानकापूर, शुभम सुरेश माकडे (२२) रा.ढोरे ले-आऊट, मानकापूर, यशवंत शालिकराम चौधरी (३२)रा.मानकापूर, रोशन देवीदास बावने (३०)रा.इतवारी, अनिस वामराव डहाके (३०)रा.दहेगाव रंगारी व संदीप गोमाजी मेश्राम रा.साकोली (सावनेर) असे फसवणूक झालेल्या युवकांची नावे आहेत. ईक्ष्वर याच्या नातेवाईकांनाही यासाठी शिफारस करून युवकांना त्याच्यासोबत जोडले.
दीड वर्षापासून हे युवक ईश्वर याच्या मागे नोकरीच्या आदेशासाठी फिरत होते. अखेर महिन्याभरापूर्वी ईश्वरने यातील अनेक युवकांना कोराडी वीज केंद्रात नियुक्तीचे आदेश दिले. यात नियुक्तीची तारीख २३ आॅगस्ट अशी नमूद करण्यात आली होती. त्यानुसार २३ आॅगस्ट रोजी हे सर्व युवक रुजू होण्याच्या तयारीत असताना वरिष्ठ अधिकारी रजेवर असल्याने तूर्तास आपण रुजू होऊ नका, असे या युवकांना सांगितले. त्यानंतर ईश्वरचा या युवकांशी संपर्क झाला नाही. मात्र आपल्याला मिळालेले आदेश खरे की खोटे याची शाहनिशा करण्यासाठी हे युवक कोराडी केंद्रात पोहचल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

काय म्हणते महानिर्मिती
महानिर्मिती कंपनीमध्ये नोकरीवर लागण्याकरिता आॅनलाईन/आॅफलाईन पद्धतीने भरती प्रक्रि या राबविण्यात येते. ज्यामध्ये वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते सोबतच महानिर्मितीच्या संकेतस्थळावर तपशीलवार माहिती देण्यात येते. त्यानंतर परीक्षा घेवून संबंधित उमेदवारांना कळविण्यात येते. कागदपत्रे तपासल्यानंतर निवडीबाबतची अंतिम यादी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर देण्यात येते. फसवणूकीचे उपरोक्त प्रकरण लक्षात घेत तरु ण-तरु णींना आवाहन करण्यात येते की, महानिर्मितीमध्ये थेट नोकरी लावून देण्याचे आमिष देणाऱ्या अथवा महानिर्मिती नोकरी संदर्भात कुठलाही गैरप्रकार आढळल्यास त्वरित जवळच्या महानिर्मिती कार्यालयास अथवा पोलिसांना कळवावे, असे कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: fraud by temptation of job to unemployed people in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.