सिंचन घोटाळा प्रकरणात आणखी चार गुन्हे दाखल, अजित पवार, सुनील तटकरेंच्या अडचणी वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 07:00 PM2017-12-12T19:00:46+5:302017-12-12T21:09:37+5:30

राज्यभरात खळबळ उडवून देणा-या बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज अचानक सक्रीय होत चार गुन्हे दाखल केले. हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण गरम झाले असतानाच घडलेल्या या आकस्मिक घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Four more cases were registered in the irrigation scam case | सिंचन घोटाळा प्रकरणात आणखी चार गुन्हे दाखल, अजित पवार, सुनील तटकरेंच्या अडचणी वाढणार?

सिंचन घोटाळा प्रकरणात आणखी चार गुन्हे दाखल, अजित पवार, सुनील तटकरेंच्या अडचणी वाढणार?

Next
ठळक मुद्देराज्यात खळबळ उडवणारा घोटाळाराजकीय वर्तुळात चर्चेला उधाण


आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यभरात खळबळ उडवून देणा-या बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज अचानक सक्रीय होत चार गुन्हे दाखल केले. हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण गरम झाले असतानाच घडलेल्या या आकस्मिक घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सिंचन घोटाळ्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणा-या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध कामांच्या निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा जोरदार आरोप झाला होता. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकांनी नागपूर एसीबीला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक युनिटचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वात एसीबीच्या पथकाने या गैरव्यवहाराची प्रदीर्घ चौकशी केली. त्यात संबंधित कामाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. जलसंपदा विभागातील तत्कालीन अभियंते , विभागीय लेखाधिकारी, तसेच कालव्याच्या कामाचे कंत्राटदार, त्यांचे भागिदार, आममुख्त्यारपत्र धारक यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले होते.

चौकशीनंतरच्या तक्रारीतील मुद्दे 

 मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या नवतळा, मेटेपार, चिखलापार शाखा कालव्यांचे मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरणाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदेचे मूल्य वाढवण्यात आले.  अवैध स्तरावर निविदेला स्वीकृती / मंजुरी देण्यात आली.  पूर्वअर्हता अर्जाच्या छाननी दरम्यान अपात्र कंत्राटदाराला गैरमार्गाचा अवलंब करून पात्र ठरविण्यात आले तसेच यशस्वी कंत्राटदाराने प्रतिस्पर्धी कंत्राटदाराचे बयाना रकमेचे डीडी देऊन निविदा प्रक्रियेदरम्यान संगनमत करून गैरव्यवहार (कार्टेलिंग) केल्याचा ठपका चौकशीत ठेवण्यात आला 

 उमाशंकर पर्वते (कार्यकारी अभियंता), सी. टी. जिभकाटे (विभागीय लेखाधिकारी), डी. डी. पोहेकर (अधीक्षक अभियंता), सो. रा. सूर्यवंशी (मुख्य अभियंता), दे. पा. शिर्के (कार्यकारी संचालक) तसेच ए. जी. भांगडिया, नागपूर या फर्मचे आममुख्त्यारपत्र धारक फिरदोस खान पठाण हे उपरोक्त गैरव्यवहाराला जबाबदार असल्यामुळे सदर पोलिसांनी त्यांना या गुन्ह्यात आरोपी करून त्यांच्याविरोधात कलम १३ (१, क, ड), सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार सहकलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. 

 

दुसरा गुन्हा गोसिखुर्द डावा कालवा 

दुसरा गुन्हा गोसिखुर्द डावा कालवा १० किलोमिटर मधील मातीकाम आणि बांदकामाचा आहे. या  कामाच्या निविदा प्रक्रियेत नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदेचे मुल्य वाढवण्यात आले.  अवैध स्तरावर निविदेला स्विकृती / मंजूरी देण्यात आली. कंत्राटदाराने जे. व्ही फर्मच्या नावे निवदा अर्ज भरला असता त्याच्या फर्मची नोंदणी भागीदारी निबंधक कार्यालयात नसताना देखिल त्या कंत्राटदाराला गैरकायदेशिररित्या या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. या प्रक्रियेतील यशस्वी कंत्राटदार मे. आर. बलरामी रेड्डी यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी कंत्राटदराच्या कामाची बयाना रक्कम (डीडी) आपल्या बँक खात्यातून देऊन संगणमताने गैरव्यवहार केला. या गैरव्यवहारात आरोपी म्हणून दशरथ बोरीकर (कार्यकारी अभियंता), यशवंत गोन्नाडे (कार्यकारी अभियंता), धनराज नंदागवळी (विभागीय लेखाधिकारी), डी. डी. पोहेकर (अधीक्षक अभियंता), सो. रा. सूर्यवंशी (मुख्य अभियंता), रो. मा. लांडगे (कार्यकारी संचालक) तसेच श्रीनिवास कंटस्ट्रक्शन कंपनी अ‍ॅन्ड आर. बलरामी रेड्डी  या फर्मचे  वतिने रामी रेड्डी श्रीनिवासुला रेड्डी हे उपरोक्त गैरव्यवहाराला जबाबदार असल्याचा ठपका चौकशीत ठेवण्यात आला. त्यामुळे सदर पोलिसांनी त्यांना या गुन्ह्यात आरोपी करून त्यांच्याविरोधात कलम १३ (१, क, ड), सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार सहकलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.  

तिसरा गुन्हा वडाला शाखा कालव्याचा 

एसीबीने सदर ठाण्यात तिस-या गुन्ह्याची तक्रार मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या वडाला शाखा कालव्याच्या कामातील गैरव्यवहाराचा आहे. त्यात यू. व्ही. पर्वते (कार्यकारी अभियंता), सी. टी. जिभकाटे (विभागीय लेखाधिकारी),  तसेच श्रीनिवास कंटस्ट्रक्शन कंपनी अ‍ॅन्ड आर. बलरामी रेड्डी  या फर्मचे  वतिने व्यवस्थापकीय भागीदार बी. व्ही. रामाराव  जबाबदार असल्याचा ठपका चौकशीत ठेवण्यात आला. त्यानुसार तिस-या गुन्ह्यात या आरोपींविरोधात सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

चौथा गुन्हा घोडाझरी शाखा कालव्याचा   

चौथा गुन्हा घोडाझरी शाखा कालव्याचा आहे. २६ किलोमीटरच्या अस्तरीकरण आणि बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत संगनमत करून गैरप्रकार करण्यात आला. लाखोंच्या या गैरव्यवहारात ललित इंगळे (कार्यकारी अभियंता), गुरुदास मांडवकर (विभागीय लेखाधिकारी), संजय खोलापूरकर (अधीक्षक अभियंता), सो. रा. सूर्यवंशी (मुख्य अभियंता), दे. पा. शिर्के (कार्यकारी संचालक) या पाच अधिकाºयांना आरोपी बनविण्यात आले.  सदर पोलिसांनी त्यांच्याविरोधात कलम १३ (१, क, ड), सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार सहकलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. ही कामगिरी एसीबीचे अधीक्षक  पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधी़क्षक मिलिंद तोतरे, विजय माहूलकर, तसेच रमाकांत कोकाटे आणि प्रमोद र्चौधरी यांनी बजावली.  

 

 

Web Title: Four more cases were registered in the irrigation scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.