नागपूरच्या मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये चार कोटीचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:16 PM2019-01-22T22:16:29+5:302019-01-22T22:20:56+5:30

रामदासपेठेतील मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार कोटीचे घबाड जमवल्याचे प्रकरण सामोर आले आहे. सीताबर्डी पोलीसांनी डॉ. समीर पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शहरातील डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे.

A four crore scam in the Meditrina hospital in Nagpur | नागपूरच्या मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये चार कोटीचा घोटाळा

नागपूरच्या मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये चार कोटीचा घोटाळा

Next
ठळक मुद्देडॉ. समीर पालतेवार व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल : सरकारी योजनांचा दुरुपयोग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामदासपेठेतील मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार कोटीचे घबाड जमवल्याचे प्रकरण सामोर आले आहे. सीताबर्डी पोलीसांनी डॉ. समीर पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शहरातील डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे.
रामदासपेठ येथे मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे. या हॉस्पिटलचे संचालन तक्रारकर्ता गणेश चक्करवार, डॉ. पालतेवार व अन्य काही जणांकडून करण्यात येते. चक्करवार यांनी डॉ. पालतेवार, विशाल मुत्तेमवार व अन्य लोकांच्या मदतीने २००६ मध्ये व्हीआरजी हेल्थ केअर सुरू केले होते. २०१२ मध्ये मुत्तेमवार व अन्य काही लोक वेगळे झाल्यानंतर मेडिट्रिना हॉस्पिटल सुरू करण्यात आले. कंपनीच्या माध्यमातून हॉस्पिटलची सुरुवात करण्यात आली होती. यात ६७ टक्के भागीदारी चक्करवार यांची होती. त्यामुळे त्यांना प्रबंध संचालक व चेअरमन पद देण्यात आले होते. डॉ. पालतेवार व त्यांची पत्नी सोनाली यात संचालक होते. डॉ. पालतेवार पत्नी व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने हॉस्पिटलचे संचालन सुरू होते.
चक्करवार यांनी केलेल्या तक्रारीनुसार डॉ. पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटलच्या कारभारात मोठा घोटाळा केला आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत रुग्णाच्या उपचारासाठी सरकार रुग्णालयांना निधी उपलब्ध करते. डॉ. पालतेवार व त्याचे साथीदार रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांकडून अवैध पद्धतीने वसुली करीत होते. या योजनेंतर्गत प्रत्येक रुग्णालयात आरोग्यमित्राची नियुक्ती करण्यात येते. आरोग्यमित्राच्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून पैशाची वसुली करण्यात येत होती. २०१७ मध्ये आरोग्यमित्राला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केली होती. अनेक रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी आरोग्य विभागाला सुद्धा हॉस्पिटलसंदर्भात तक्रार केली होती. डॉ. पालतेवार यांनी बनावट व्हाऊचर बनवून रुग्णांना रिफंड द्यायचे असल्याचे सांगून बरीच मोठी रक्कम हॉस्पिटलच्या खात्यातून परस्पर काढली. या व्यवहाराचा कुठलाही हिशेब त्यांनी ठेवला नाही.
डॉ. पालतेवार यांच्यावर मेडिट्रिना हॉस्पिटलचा ट्रेडमार्क बनावट पद्धतीने मिळविल्याचा आरोप आहे. चक्करवार यांच्या म्हणण्यानुसार हॉस्पिटलचे संचालन व्हीआरजी कंपनीतर्फे करण्यात येते. त्या कंपनीचे कार्यालय हॉस्पिटलमध्ये आहे. डॉ. पालतेवार यांनी बनावट दस्तावेज सादर करून कंपनीचे कार्यालय आपल्या निवासस्थानी असल्याचे दाखविले आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये आयकर विभागाने हॉस्पिटलवर कारवाई केली होती. चक्करवार यांच्या तक्रारीनुसार डॉ. पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९ फेब्रुवारी २०१२ पासून आतापर्यंत चार कोटी रुपयांचे घबाड जमवले आहे.
 आर्थिक गुन्हे शाखेचा निष्काळजीपणा
आर्थिक सल्लागार गणेश चक्करवार यांनी जुलै २०१८ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. परंतु आर्थिक गुन्हे शाखेने कुठलीही कारवाई केली नाही. पोलिसांकडून कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे चक्करवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. १० जानेवारीला उच्च न्यायालयाने पोलिसांना दोन आठवड्याच्या आत या प्रकरणावर योग्य निर्णय घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाने दखल घेतल्यानंतर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. डीसीपी संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक प्रमोद घोंगे हे प्रकरणाचा तपास करीत आहे. त्यांनी केलेल्या चौकशीच्या आधारे मंगळवारी डॉ. पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांवर फसवणूक केल्याप्रकरणी, बोगस दस्तावेज बनविल्या प्रकरणात तसेच गुन्हेगारी षड्यंत्र रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
डॉक्टर आणि अधिकारीही गुंतलेले
सूत्रांच्या मते हॉस्पिटलच्या व्यवहाराची सखोल चौकशी केल्यानंतर प्रकरणात अनेक खुलासे होऊ शकतात. आर्थिक शाखा या खुलाशांना समोर आणण्यास इच्छुक नव्हती. त्यामुळे सहा महिन्यानंतरही कुठलीही चौकशी केली नव्हती. या प्रकरणात हॉस्पिटलमधील अन्य डॉक्टर व अधिकारीही गुंतले असल्याची माहिती आहे.

 

Web Title: A four crore scam in the Meditrina hospital in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.