महाराष्ट्रदिनी ‘झेंडा’युद्ध रंगणार

By Admin | Published: May 1, 2017 01:10 AM2017-05-01T01:10:13+5:302017-05-01T01:10:13+5:30

महाराष्ट्रदिनी उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात विविध संघटना व राजकीय पक्षांमध्ये झेंडायुद्ध रंगणार आहे.

The 'flag' war will be played in Maharashtra | महाराष्ट्रदिनी ‘झेंडा’युद्ध रंगणार

महाराष्ट्रदिनी ‘झेंडा’युद्ध रंगणार

googlenewsNext

 विदर्भवादी पाळणार काळा दिवस : महाराष्ट्र समर्थक धडाक्यात साजरा करणार
नागपूर : महाराष्ट्रदिनी उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात विविध संघटना व राजकीय पक्षांमध्ये झेंडायुद्ध रंगणार आहे. सोमवारी संपूर्ण विदर्भात विदर्भवादी संघटनांतर्फे विदर्भाचा झेंडा फडकवत काळा दिवस पाळण्यात येणार आहे तर अखंड महाराष्ट्राचे समर्थन करणाऱ्या पक्षांकडून महाराष्ट्र दिन धडाक्यात साजरा करण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. एकूणच विदर्भवादी व महाराष्ट्रवादी यांची अस्मितेची लढाई दिसून येणार आहे.
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीची हाक संपूर्ण देशात जावी यासाठी विदर्भवादी संघटना सरसावल्या आहेत. १ मे रोजी महाराष्ट्रदिनी संपूर्ण विदर्भात विदर्भवादी संघटनांतर्फे काळा दिवस पाळण्यात येणार आहे. ‘विदर्भ कनेक्ट’तर्फे सर्व ११ जिल्ह्यांतील मुख्यालयी विदर्भाचा झेंडादेखील फडकविण्यात येणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गावांमधील घराघरांवर, चौकात, वेशीवर विदर्भाचे झेंडे लावण्यात येणार आहेत. शिवाय विविध ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ विविध उपक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे हे स्वत: इतर नेत्यांसमवेत नागपुरात ‘विष्णूजी की रसोई’ येथे विदर्भाचा झेंडा फडकविणार आहेत. ‘विरा’तर्फे ‘रक्ताक्षरी’ मोहिम राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताची स्वाक्षरी करून वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसंदर्भात निवेदन पाठविण्यात येणार आहे.
दुसरीकडे अखंड महाराष्ट्राच्या समर्थकांकडूनदेखील विदर्भात महाराष्ट्रदिन साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. चौकाचौकांमध्ये भगवे झेंडा लावले जाणार असून अखंड महाराष्ट्रासाठी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. आतषबाजीने मनसेतर्फे महाराष्ट्र दिनाचे स्वागत करण्यात आले. दिवसभरदेखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. यानंतर श्रमिक व कामगारांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, दुपट्टा, होमिओपॅथी औषध वितरित करण्यात येईल. शहराच्या सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम होतील. यास प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, शहराध्यक्ष प्रवीण बरडे, जिल्हाध्यक्ष सतीश कोल्हे, किशोर सरायकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

लोकप्रतिनिधींना विचारणार जाब
दरम्यान विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्र्यांसह विदर्भातील सर्व मंत्री, खासदार, आमदारांना वेगळे राज्य केव्हा देता असा भ्रमणध्वनीवरून जाब विचारण्यात येणार आहे. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विदभार्साठी काय केले व काय करणार, असा सवाल देखील करण्यात येईल, अशी माहिती समितीचे नेते वामनराव चटप व मुख्य संयोजक राम नेवले यांनी दिली. समितीच्यावतीने १ मे रोजी गिरीपेठेतील मुख्यालयात सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर आवाहन
आपल्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त जनतेने सहभागी व्हावे यासाठी विदर्भवादी व अखंड महाराष्ट्राचे पुरस्कर्ते, अशा दोघांकडूनदेखील प्रयत्न करण्यात येत आहेत. सोशल मीडिया व ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून यासंदर्भात नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. शिवाय शांतीचा भंग होणार नाही याची काळजी घेणारे ‘मॅसेज’देखील फिरत आहेत.
काँग्रेस नेत्यांची भूमिका काय?
विदर्भवादी आणि अखंड महाराष्ट्रवादी यांच्या या झेंडायुद्धात काँग्रेस नेत्यांची नेमकी भूमिका काय राहणार याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेस पक्ष वेगळ्या विदर्भाच्या विरोधात असला तरी विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी या काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मागील वर्षी वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. त्यामुळे १ मे रोजी हे नेते वेगळ्या विदर्भाच्या लढ्याला जाहीर समर्थन देणार का याकडे लक्ष लागले आहे.
 

Web Title: The 'flag' war will be played in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.