नागपूर-अमरावती महामार्गावरील कंपनीत स्फोट; कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:33 AM2018-06-20T10:33:42+5:302018-06-20T10:33:48+5:30

नागपूर-अमरावती महामार्गालगत असलेल्या बाजारगाव-चाकडोह शिवारातील ‘सोलार एक्सप्लोसिव्ह’ नामक कंपनीत झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला.

Explosion on the Nagpur-Amravati highway; Worker's death | नागपूर-अमरावती महामार्गावरील कंपनीत स्फोट; कामगाराचा मृत्यू

नागपूर-अमरावती महामार्गावरील कंपनीत स्फोट; कामगाराचा मृत्यू

Next
ठळक मुद्देचाकडोह शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गालगत असलेल्या बाजारगाव-चाकडोह शिवारातील ‘सोलार एक्सप्लोसिव्ह’ नामक कंपनीत झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला. यात अन्य कामगारांना कुठलीही दुखापत झाली नाही. स्थानिक ग्रामस्थांनी आत प्रवेश करून बॉक्स फेकण्याचा प्रयत्न केल्याने कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना मंगळवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास घडली.
तुषार प्रभाकर मडावी (२२, रा. बाजारगाव) असे मृत कामगाराचे नाव आहे. तुषार ‘सोलार एक्सप्लोसिव्ह’ या कंपनीमध्ये मागील काही दिवसांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करायचा. सत्यनारायण नुवाल, नागपूर हे या कंपनीचे चेअरमन असून, या कंपनीत ‘डिटोनेटर’ या स्फोटकाचे उत्पादन केले जाते. त्यासाठी इतर घटकांसोबतच अ‍ॅल्युमिनियमच्या पावडरचाही वापर केला जातो. तुषार मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे कामावर होता, शिवाय रात्री कंपनीतील एका पाईपलाईनच्या सफाईचे काम सुरू होते. येथील बहुतांश घटकांवर कमी-अधिक तापमानाचा परिणाम होतो. दरम्यान, कंपनीतील ‘पीपी-६’ या युनिटमध्ये तुषार अ‍ॅल्युमिनियम पावडर वाहून नेत असतानाच अचानक स्फोट झाला. त्यात गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला लगेच नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
स्फोटाच्या आवाजामुळे ग्रामस्थ कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ गोळा झाले. त्यातील काहींनी गेट उघडून आत प्रवेश केला. त्यातच कामगारही लगेच बाहेर पडले. ग्रामस्थांनी आतील साहित्याचे बॉक्स बाहेर फेकायला सुरुवात करताच कोंढाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांना बाहेर काढले. त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल आणि सल्लागार जे. एफ. साळवे नागपूरबाहेर असल्याची माहिती जाणकारांनी दिली. या स्फोटामुळे कंपनीच्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते.

Web Title: Explosion on the Nagpur-Amravati highway; Worker's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Blastस्फोट