नागपूरजवळ फुबगावात सापडली लोहयुगीन वस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:15 PM2019-01-28T13:15:16+5:302019-01-28T13:15:43+5:30

नागपूरपासून २१० किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर अमरावती तालुक्यातील फुबगावांत लोहयुगातील वस्ती सापडली आहे.

Evidences of Iron Era found in Fubgaon near Nagpur | नागपूरजवळ फुबगावात सापडली लोहयुगीन वस्ती

नागपूरजवळ फुबगावात सापडली लोहयुगीन वस्ती

Next
ठळक मुद्देभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने लावला शोध

वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरपासून २१० किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर अमरावती तालुक्यातील फुबगावांत लोहयुगातील वस्ती सापडली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या खोदकामात हा खुलासा झाला आहे.
३ ते ४ हजार वर्षापूर्वीचे लोहयुगातील पुरावशेष शोधण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची उत्खनन शाखेची चमू दोन आठवड्यापूर्वी अमरावती तालुक्यातील फुबगांव येथील पूर्णा नदीच्या काठावर उत्खनन करीत होती. उत्खननात त्यांना जमिनीखाली त्या काळातील घरांची फर्शी सापडली. त्याचबरोबर आभूषणाचे अवशेष, मौल्यवान दगडाद्वारे बनविण्यात आलेल्या वस्तू मिळाल्या. सोबतच लोहयुगातील भांडी, शस्त्र व भांडी बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साचे मिळाले. त्यावेळेच्या मुद्रेचे संकेतही मिळाले आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या २० सदस्यांद्वारे हे संशोधन होत आहे. यापूर्वी २०१७ मध्ये सुद्धा या परिसरात विभागाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले होते.
त्यात फुबगावमध्ये कृष्ण लोह काळ्या व लाल रंगाचे भांडे, मातीचे माठ मिळाले होते. याच आधारावर या परिसरात विभागाने उत्खननाचा निर्णय घेतला.

टुरिस्ट स्पॉट बनू शकतो
या उत्खननासंदर्भात विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक खुलासे केले नाही. पण या भागात लोहयुगीन संस्कृती व अधिवासासंदर्भात अवशेष व पुरावशेष मोठ्या प्रमाणात सापडल्यास हा परिसरात सुरक्षित केल्या जाऊ शकतो. असे झाल्यास हा परिसर पर्यटन स्थळाच्या रुपात विकसित होऊ शकतो. तसेच आॅर्कियोलॉजी क्षेत्रात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व शोधकर्त्यांसाठी एक महत्त्वपूर्ण स्थळ होऊ शकते.

फुबगावात मॅपिंग केल्यानंतर सर्वे व लॅण्डस्केपींग करण्यात आले. यानंतर २० बाय २० मीटर च्या दोन ट्रेंटमध्ये खोदकाम सुरू केले. यात लोहयुगात बनलेल्या एका घराची फर्शी मिळाली. त्याचबरोबर धान्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बनविण्यात आलेले भांडार, गळ्यात घालण्यात येत असलेली माळ सापडली आहे. पुढे आश्यकतेनुसार पुन्हा खोदकाम करण्यात येऊ शकते. खोदकामासोबतच विस्तृत अहवाल तयार करण्यात येत आहे.
डॉ. प्रशांत सोनोने,
सहा. आर्कियोलॉजिस्ट,
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

महत्त्वपूर्ण स्थळ आहे
पूर्णा नदीच्या काठी १९८५ नंतर पहिल्यांदा उत्खनन करण्यात आले आहे. आता केवळ खोदकामाला सुरुवात झाली आहे. यात लोहयुगीन अधिवासाचे संकेत मिळाले आहे. लोहयुगातील संस्कृतीची माहिती मिळविण्यासाठी हे खूप महत्वाचे स्थळ आहे.
डॉ. निखिल दास,
संचालक, उत्खनन शाखा

Web Title: Evidences of Iron Era found in Fubgaon near Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.