इंग्रजीच्या पुस्तकात ‘मिस्टेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:40 AM2017-09-19T00:40:05+5:302017-09-19T00:40:30+5:30

मातृभाषेप्रमाणेच आजच्या तारखेत इंग्रजी भाषेचे ज्ञान असणेदेखील आवश्यक झाले आहे.

In English book 'Mistake' | इंग्रजीच्या पुस्तकात ‘मिस्टेक’

इंग्रजीच्या पुस्तकात ‘मिस्टेक’

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य मंडळाच्या ७ वी व ९ वीच्या पुस्तकात व्याकरण भरकटले :कसा होणार विद्यार्थ्यांच्या भाषेचा विकास?

योगेश पांडे। लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मातृभाषेप्रमाणेच आजच्या तारखेत इंग्रजी भाषेचे ज्ञान असणेदेखील आवश्यक झाले आहे. शालेय अभ्यासक्रमातून इंग्रजीचा पाया पक्का होत असतो. मात्र जर शाळेत शिकविल्या जाणाºया पुस्तकांमध्येच भरकटलेले व चुकीचे व्याकरण असेल तर...! वाचून आश्चर्य वाटले असेल, मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या ७ वी व ९ वीच्या इंग्रजीच्या नवीन पुस्तकांमध्ये व्याकरणाच्या अनेक चुका आढळून आल्या आहेत. अशाप्रकारे चुकीचे व्याकरण विद्यार्थ्यांना शिकविल्या गेले तर उद्या जाऊन त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून यंदा इयत्ता ७ वी व ९ वीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. नवीन पुस्तकांसाठी तज्ज्ञांची समितीदेखील नेमण्यात आली.
३ मार्च २०१७ रोजी समन्वय समितीने नवीन पुस्तकांना मान्यता दिली.
यानुसार इयत्ता ७ वीचे ‘माय इंग्लिश बुक सेव्हन’ आणि इयत्ता नववीचे ‘माय इंग्लिश कोर्सबुक’ छापण्यात आले. मात्र प्रत्यक्षात पुस्तके हाती आल्यानंतर इंग्रजीच्या अनेक शिक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले. दोन्ही पुस्तकांत अनेक ठिकाणी व्याकरणाच्या चुका स्पष्टपणे दिसून येत आहेत. तर मराठीतूनच जसेच्या तसे इंग्रजीत भाषांतर झाले आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्तमानकाळ आणि भूतकाळाची सरमिसळ
दोन्ही पुस्तकांमध्ये काही ठिकाणी धडा भूतकाळात सुरू होतो आणि अचानकपणे वर्तमानकाळातील व्याकरण वापरण्यात आले आहे. सातवीच्या पुस्तकातील ‘जर्नी टू द वेस्ट’ या धड्यात युवान च्वांगच्या प्रवासाबाबत भूतकाळात माहिती देण्यात आली आहे. मात्र पान क्रमांक १९ वरील ‘पॅरिग्राफ’मध्ये चक्क वर्तमानकाळ वापरण्यात आला आहे. नववीच्या पुस्तकातदेखील काही ठिकाणी अशा चुका आढळून आलेल्या आहेत.
समितीचे दुर्लक्ष कसे झाले?
या दोन्ही पुस्तकांसंदर्भात नागपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक समन्वय समितीच्या सदस्य डॉ. प्रीती पेंढारकर यांनी तर चुकांची यादीच काढली आहे. साधारणत: दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचा इंग्रजी व्याकरणाचा पाया मजबूत होत असतो. ही दोन्ही पुस्तके मराठी व ‘लोअर इंग्लिश’ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाची आहेत. मात्र तज्ज्ञ समितीचा असूनदेखील लहान लहान चुका या दोन्ही पुस्तकांमध्ये दिसून येत आहेत. इंग्रजी भाषेमध्ये व्याकरणाला महत्त्व आहे. चुकीचे शब्द, अयोग्य व्याकरण यामुळे विद्यार्थ्यांवर चुकीचे संस्कार होतील व भविष्यात त्या आधारावरच ते पुढील शिक्षण घेतील. ही बाब गंभीर असून या बाबी लक्षात का घेण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न डॉ. पेंढारकर यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या संचालकांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: In English book 'Mistake'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.