नागपुरातील दुहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:24 PM2018-02-24T22:24:01+5:302018-02-24T22:39:14+5:30

पत्रकाराच्या मुलीची आणि आईची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींचा तपास सहायक पोलीस आयुक्त समाधानकारक पद्धतीने करताना दिसत नाही. उलट ते हेकेखोर पद्धतीने वागून पीडित परिवारावरच दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हा तपास काढून तो गुन्हे शाखेकडे सोपवावा, अशी मागणी आज पत्रकारांच्या बैठकीतून करण्यात आली.

The double murder case in Nagpur is to be investigated by the crime branch | नागपुरातील दुहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवावा

नागपुरातील दुहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवावा

Next
ठळक मुद्देतपास अधिकाऱ्यांकडून पीडित परिवाराची कोंडी : हेकेखोरीचा गंभीर आरोप : पोलीस आयुक्तांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्रकाराच्या मुलीची आणि आईची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींचा तपास सहायक पोलीस आयुक्त समाधानकारक पद्धतीने करताना दिसत नाही. उलट ते हेकेखोर पद्धतीने वागून पीडित परिवारावरच दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हा तपास काढून तो गुन्हे शाखेकडे सोपवावा, अशी मागणी आज पत्रकारांच्या बैठकीतून करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार आणि नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी पीडित रविकांत कांबळे यांच्या आणि अन्य पत्रकारांच्या वतीने ही तक्रारवजा मागणी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याशी बोलताना केली.
रविकांत यांची दीड वर्षीय मुलगी राशी आणि आई उषाताई यांची गणेश शाहू याने निर्घृण हत्या केली. त्याच्या परिवारातील सदस्यांनी त्याला या हत्याकांडात मदत केली. या घटनेला आज एक आठवडा पूर्ण झाला आहे. घटनेनंतर निर्माण झालेल्या लोकभावना लक्षात घेत पोलिसांनी या प्रकरणात हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली गणेश आणि त्याची पत्नी यांना अटक केली तर एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. नंतर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसारही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यामुळे हा तपास हुडकेश्वरचे सहायक पोलीस आयुक्त किशोर सुपारे यांना सोपविण्यात आला. मात्र, सुपारे यांची पहिल्या दिवसापासूनच तपासाची पद्धत समाधानकारक नाही. पंचासोबतही ते व्यवस्थित बोलत नाहीत आणि पीडित परिवारालाही प्रतिसाद देत नाही. ‘मला एकच काम नाही, या तपासासोबत आणखीही अनेक कामे आहेत. कुणाला गुन्हेगार म्हणून अटक करायची आणि कुणाला नाही, ते मी ठरवणार आहे. मी माझ्या पद्धतीने तपास करेल, तुम्ही मला सांगू नका, माझ्याशी वारंवार फोनवर बोलायचे नाही’, असे म्हणून त्यांनी कांबळे परिवाराची मानसिक कोंडी चालवली आहे, असे रविकांत कांबळे यांनी आज येथील पत्रकारांना आपली व्यथा ऐकवताना सांगितले.
विशेष म्हणजे, सात दिवसांच्या तपासात पोलिसांनी काय मिळवले, ते कळायला मार्ग नाही. अजून मृत महिलेजवळचे दोन ते अडीच लाखांचे दागिने, आरोपीने ज्या धारदार शस्त्राने हत्या केली, ते शस्त्र पोलिसांनी जप्त केलेले नाही. पत्रकारांनी त्यांना गुन्ह्यांशी संबंधित तपासात काय प्रगती आहे, अशी विचारणा केली असता ते प्रतिसाद देत नाहीत, अशा भावना जवळपास सर्वच क्राईम रिपोर्टर्सनी व्यक्त केल्या. आरोपीच्या पीसीआरला केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र, त्यांनी अनेक महत्त्वाचे पुरावे अद्याप गोळा केलेले नाही. त्यांचे एकूणच वर्तन लक्षात घेता, ते या प्रकरणाचा तपास व्यवस्थित करू शकणार नाही, अशी भावना कांबळेंसोबत अनेक पत्रकारांनी व्यक्त केली. ती लक्षात घेता ज्येष्ठ पत्रकार प्रदीपकुमार मैत्र यांनी लगेच पोलीस आयुक्तांसोबत बोलणी केली. एसीपी सुपारे यांच्याकडून हा तपास काढून तो तातडीने गुन्हे शाखेला सोपवावा, अशी मागणी त्यांनी केली. आयुक्तांनी संबंधित अधिकाºयांशी चर्चा करून त्यांना लगेच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
अ‍ॅड. निकम यांची नियुक्ती करावी
हे प्रकरण केवळ पत्रकारांशी नव्हे तर पोलिसांच्या परिवाराशीही संबंधित आहे. मृत उषातार्इंची सून आणि चिमुकल्या राशीची आई रूपाली स्वत: पोलीस कर्मचारी आहे. तरीसुद्धा तपास अधिकाऱ्याकडून हेकेखोर पद्धतीने त्यांना वागणूक दिली जात आहे. त्यामुळे या तपासाचा फायदा आरोपींना मिळण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे हा तपास गुन्हे शाखेकडून करून घ्यावा, या मागणीसोबत हा दुहेरी हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि त्यासाठी सरकारने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची युक्तिवादासाठी नियुक्ती करावी, अशी मागणीही पत्रकारांच्या बैठकीत करण्यात आली. या मागणीच्या पूर्ततेसाठी पत्रकारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

 

Web Title: The double murder case in Nagpur is to be investigated by the crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.