अपघातात गमावलेल्या मुलाचं पालकांकडून अवयव दान; दोघांना दृष्टी तर तिघांना जीवदान

By सुमेध वाघमार | Published: March 22, 2024 06:25 PM2024-03-22T18:25:08+5:302024-03-22T18:27:02+5:30

वडिलांकडून एकुलत्या एक मुलाचे अवयवदान, चंंद्रिकापुरे कुटुंबियांचा पुढाकार

Donation of organs by parents of a child lost in an accident; three life saved | अपघातात गमावलेल्या मुलाचं पालकांकडून अवयव दान; दोघांना दृष्टी तर तिघांना जीवदान

अपघातात गमावलेल्या मुलाचं पालकांकडून अवयव दान; दोघांना दृष्टी तर तिघांना जीवदान

नागपूर: रस्ता अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या एकुलत्या एक मुलाच्या अवयवदानासाठी ६० वर्षीय वडिलांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या मानवतावादी निर्णयाने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळणार आहे.

ईशार्थ चंद्रिकापुरे, (वय २४) रा.  उंटखाना रोड, हनुमान नगर असे अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, ईशार्थ हा मित्राला भेटण्यासाठी बुधवारला सायंकाळी ७ वाजता नागपूर येथून खापरी येथे दुचाकीने जात होता. वाटेत चिंचभवनच्या समोर एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी त्याल मिहान येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. ‘एम्स’च्या डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचाराला तो प्रतिसाद देत नव्हता.

‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. आलोक उमरेडकर, डॉ. ओम शुभम असई, डॉ. प्रियंका टिकै त व डॉ. सुचेता मेश्राम यांनी ईशार्थला तपासून ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत असल्याची माहिती दिली.  ‘एम्स’च्या समन्वयक  प्रीतम त्रिवेदी आणि प्राची खैर यांनी नातेवाईकांना अवयव दानाविषयी समुपदेशन केले. ईशार्थचे ६०वर्षीय वडील विजय चंद्रिकापुरे यांनी त्या दु:खातही अवयवदानास संमती दिली. आई निशा (वय ४९) व बहिण आकांशा (वय २७) यांनीही ‘ईशार्थ’ला अवयवरुपी जीवंत ठेवण्याला मंजुरी दिली. ही माहिती, विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) देण्यात आली. त्यांच्याकडील प्रतिक्षा यादीनुसार गरजू रुग्णांना अवयवदान करण्यात आले. 

‘एम्स’मधील १९वे ‘कॅ डेव्हर’
‘एम्स’मध्ये आतापर्यंत १९ ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून अवयवदान (कॅडेव्हर) झाले. ‘झेडटीसीसी’ने त्यांच्या प्रतिक्षा यादीनुसार, एक मूत्रपिंड ‘एम्स’ंमधील ३३वर्षीय पुरुषाला, दुसरे मूंत्रपिंड २३ वर्षीय एका पुरुष रुग्णाला तर यकृत न्यू इरा हॉस्पिटलमधील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाला दान करण्यात आले. ‘कॉर्निआ’ची जोडी ‘एम्स’नेत्रपेढीला दान करण्यात आली.

Web Title: Donation of organs by parents of a child lost in an accident; three life saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.