विश्व वंदनीय शिवरायांना हिंदुत्वाच्या चौकटीत बांधू नका : पुरुषोत्तम खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 08:53 PM2018-02-19T20:53:12+5:302018-02-19T21:05:49+5:30

शिवाजी महाराजांना आज काही लोक हिंदू धर्माभिमानी व मुस्लीमद्वेष्टा ठरवत आहेत. त्यांना मराठी व महाराष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त करीत आहेत. विश्व वंदनीय शिवरायांना अशा छोट्या चौकटीत बांधणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.

Do not build world-classed Shivaji in the framework of Hindutva: Purushottam Khedekar | विश्व वंदनीय शिवरायांना हिंदुत्वाच्या चौकटीत बांधू नका : पुरुषोत्तम खेडेकर

विश्व वंदनीय शिवरायांना हिंदुत्वाच्या चौकटीत बांधू नका : पुरुषोत्तम खेडेकर

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठातर्फे शिवाजी जयंतीनिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : ‘शिवमुद्रे’त नमूद असल्याप्रमाणे जिजाऊ मातेने शिवाजी महाराजांना ‘जगाला वंदनीय ठरेल असे स्वराज्य निर्माण करा’ असे आवाहन केले होते. महाराजांनीही तोच आदर्श ठेवत स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या स्वराज्यात सर्व धर्मीयांना समान स्थान होते. स्त्रियांचा सन्मान सर्वोच्च होता. सर्वांना समान आर्थिक वाटा मिळेल असे त्यांचे धोरण होते. त्यांचे राज्य खऱ्या अर्थाने जगाला आदर्श ठरावे असे होते. मात्र आज काही लोक त्यांना हिंदू धर्माभिमानी व मुस्लीमद्वेष्टा ठरवत आहेत. त्यांना मराठी व महाराष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त करीत आहेत. विश्व वंदनीय शिवरायांना अशा छोट्या चौकटीत बांधणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवाजी महाराज आणि वर्तमान स्थिती’ विषयावर आयोजित व्याख्यानात वक्ता म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. अ‍ॅड. खेडेकर यांनी शिवरायांच्या त्यावेळच्या कर्तृत्वाचे दाखले देत आज ते असते तर त्यांनी ही परिस्थिती कशी हाताळली असती, हा आशावाद मांडला. वर्तमान परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ‘क्षमता असेल तो टिकेल’ हा डार्विनचा सिद्धांत आज लागू पडतो. सूत्र आणि शास्त्र हे यशाचे तंत्र झाले आहे. भारतीयांची परिस्थिती त्यापेक्षा बिकट आहे. धार्मिक वादविवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारीचा प्रश्न बिकट झाला आहे. शिवाजी महाराज असते तर या समस्या नसत्या.
आज शिक्षणाच्या नावाने पदवी घेऊन चालत नाही तर ‘अप्लाईड नॉलेज’ व संशोधनाच्या गुणवत्तेला महत्त्व आहे. महाराज असते तर त्यांनी शिक्षणाची अशी व्यवस्था निर्माण केली असती. त्यांच्या राज्यात व्यसनावर बंदी असती. माध्यमांमध्ये सतत येणाऱ्या बलत्काराच्या बातम्यांनी भीतीचे वातावरण निर्माण करून महिलांना पुन्हा घराच्या भिंतीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. स्त्रियांचा सन्मान सर्वोच्च मानणाऱ्या शिवरायांच्या राज्यात स्त्रिया कोणत्याही वेळी बिनदिक्कतपणे वावरू शकल्या असत्या. त्यांनी आपल्या मावळ्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यामुळे ते असते तर अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्यनिष्ठा असती.

Web Title: Do not build world-classed Shivaji in the framework of Hindutva: Purushottam Khedekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.