करवसुलीसाठी मनपाचा ‘ढोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:44 AM2017-07-18T01:44:04+5:302017-07-18T01:44:04+5:30

तिजोरी रिकामी असल्याने महापालिकेचे बजेट बिघडले आहे. त्यातच मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीचा आकडा ४५२ कोटींवर पोहोचला आहे.

Corporation's 'Dhol' for tax collection | करवसुलीसाठी मनपाचा ‘ढोल’

करवसुलीसाठी मनपाचा ‘ढोल’

Next

२० मोठ्या थकबाकीदारांच्या घरासमोर करणार ‘गांधीगिरी’ : ८ आॅगस्टला मालमत्ताही जप्त करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिजोरी रिकामी असल्याने महापालिकेचे बजेट बिघडले आहे. त्यातच मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीचा आकडा ४५२ कोटींवर पोहोचला आहे. विकास कामांचा ढोल वाजवताना येत्या निवडणुकांना पुढे जाण्यासाठी शहरात प्रत्यक्ष विकासाची गरज आहे. तिजोरीत पैसा आल्यावरच विकासाची गाडी सुपरफास्ट धावेल हे सत्तापक्ष आणि प्रशासनाला माहिती आहे. त्यामुळे आता बड्या थकबाकीदारांकडून करवसूलीसाठी मनपा प्रशासनाने अनोखी ‘गांधीगिरी’ करण्यात येणार आहे. थकबाकीदारांचे कान टवकारावे यासाठी मनपा त्यांच्या घरापुढे ढोल वाजविणार आहे.
करवसुलीसाठी १७ जुलै ते ८ आॅगस्ट दरम्यान मालमत्ता व पाणी कर अभय योजना राबविली जात आहे. या योजनेला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु आजवरचा अनुभव विचारात घेता काही थकबाकीदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यास ८ आॅगस्टला त्यांची मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी दहा झोनमधील २० मोठ्या थकबाकीदारांच्या घरापुढे वा व्यावसायिक प्रतिष्ठांनापुढे ढोल वाजवून त्यांना थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात येईल. झोन सभापती व जलप्रदाय समितीचे सभापती यांच्या नेतृत्वात ही ‘गांधीगिरी’करण्यात येणार असल्याची माहिती सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
मालमत्ता कराची व पाणीपट्टीची सर्वाधिक थकबाकी असलेल्या झोनमधील प्रत्येकी १० अशा २० बड्या थकबाकीदारांचा यात समावेश आहे. सभापतींच्या नेतृत्वात त्यांच्या घरापुढे ढोल वाजवला जाणार आहे. यावेळी लाऊ ड स्पिकरवरून थकबाकीदाराला थक बाकी भरण्याचे आवाहन करण्यात येईल. ढोल वाजविण्याचा कार्यक्रम एक तासाचा राहणार आहे. त्यानंतर थकबाकीदाराला गुलाबाचे फूल देण्यात येईल. यामुळे परिसरातील लोकांना थकबाकीदारांची नावे कळतील.
शहर विकासात थकबाकीदार आडकाठी आणत असल्याची जाणीव लोकांना व्हावी, हा यामागील हेतू असल्याचे जोशी यांनी सांगितले.
यात शहरातील नामांकित मॉल, प्रतिष्ठित संस्था व व्यक्तींचा समावेश आहे. शासकीय कार्यालयांकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. यात वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अनेक कार्यालयाकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नासुप्र व काही अन्य संस्थांकडे असलेल्या थकबाकीचे बूक समायोजन करण्यात येणार आहे. एम्प्रेस मॉलवर सर्वाधिक थकबाकी आहे. जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे यांच्या नेतृत्वात एम्प्रेस मॉलपुढे ढोल वाजवला जाणार आहे.

धनादेश न वटल्यास गुन्हा दाखल
गेल्यावेळी थकबाकीदारांसाठी योजना राबविण्यात आली होती. यात काही थकबाकीदारांनी धनादेश दिले होते. परंतु यातील काही धनादेश अजूनही वटलेले नाही. अशा लोकांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी त्यांना ८ आॅगस्टपर्यंत रक्कम भरण्याची संधी आहे.

देयकाची प्रतीक्षा करू नका
मालमत्ता कर दरवर्षी सारखाच असतो. त्यामुळे मालमत्ताधारकांना देयक मिळालेले नसेल तरी त्यांनी आजवर आकारण्यात येत असलेल्या क राइतकीच रक्कम त्यांना भरावयाची आहे. त्यामुळे करदात्यांनी देयकाची प्रतीक्षा न करता कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मालमत्तांचा लिलाव करणार
दहा झोनमधील मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. महापालिकेचे उपायुक्त रवींद्र देवतळे यांच्या नेतृत्वात थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अभय योजनेच्या कालावधीत थकबाकीदारांनी थकबाकी न भरल्यास त्यांच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. यासाठी मालमत्ता व पाणीपट्टीची सर्वाधिक थकबाकी असलेल्या २० जणांचा यात समावेश असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.

पहिल्याच दिवशी
१.१६ कोटींची वसुली
अभय योजनेला सोमवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सर्व झोनमधील ११०८ मालमत्ताधारकांनी ७६ लाख १२ हजार रुपयांची थकबाकी भरली. पाणीपट्टी थकीत असलेल्या १२०२ ग्राहकांनी ४०लाख २४ हजार ४१८ रुपयांची थकबाकी भरली. अशी एकूण १ कोटी १६ लाख ५२ हजारांची वसुली झाली.

Web Title: Corporation's 'Dhol' for tax collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.