सफाई कर्मचाऱ्यांनी लावले लक्ष्मीनगर झोनला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:12 AM2019-07-09T00:12:48+5:302019-07-09T00:20:24+5:30

जीपीएस घड्याळीच्या त्रुटीमुळे तब्बल ७५ टक्के सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन कटले. याविरुद्ध लक्ष्मीनगर झोनमधील संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन करीत कार्यालयाला टाळे ठोकले. निदर्शने केली.

Cleansing workers locked the Laxminar zone | सफाई कर्मचाऱ्यांनी लावले लक्ष्मीनगर झोनला टाळे

सफाई कर्मचाऱ्यांनी लावले लक्ष्मीनगर झोनला टाळे

Next
ठळक मुद्देजीपीएस घड्याळीच्या त्रुटीने ७५ टक्के कर्मचाºयांचे वेतन कटले कर्मचाºयांनी केले काम बंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीपीएस घड्याळीच्या त्रुटीमुळे तब्बल ७५ टक्के सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन कटले. याविरुद्ध लक्ष्मीनगर झोनमधील संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन करीत कार्यालयाला टाळे ठोकले. निदर्शने केली. रास्ता रोको आंदोलन केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर नंदा जिचकार, सत्ता पक्षनेते संदीप जोशी यांच्यासह अनेक नगरसेवक व अधिकारी झोन कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना शांत केले. प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन मॅन्युअली जारी करण्याचे निर्देश दिले. यानंतर सकाळी ११ वाजता सफाई कर्मचारी कामावर परतले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच गांधीबाग झोनच्या कर्मचाऱ्यांनी मनपा मुख्यालयात जाऊन जीपीएस घड्याळीतील त्रुटींकडे लक्ष वेधले होते. ९० टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन कटले होते. रवींद्र ठाकरे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर प्रकरण शांत झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर झोनमध्ये ५५४ सफाई कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळ देण्यात आले आहे. शनिवारी या महिन्याच्या पगाराची स्लीप जारी करण्यात आली. जीपीएस घड्याळीने वेतन जोडले असल्याने जवळपास ७० टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन शून्य ते १५ दिवसापर्यंतचेच निघाले. सफाई कर्मचाऱ्यांवर नजर ठेवणाऱ्या जमादारांची उपस्थिती शून्य आहे. त्यामुळे त्यांचे वेतनच निघाले नाही. सोमवारी सकाळपासूनच लक्ष्मीनगर झोनच्या सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. संतप्त कर्मचारी सकाळी कार्यालयात आले आणि त्यांनी गेटला टाळे ठोकले. याची सूचना मिळताच महापौर जिचकार आणि सत्ता पक्षनेते जोशी झोन कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत काही विरोधी पक्षाचे नगरसेवकही होते. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यानंतर सफाई कर्मचारी कामावर परतले.
सफाई कर्मचाऱ्यांचे लोकेशन दाखविते थायलंड-अमेरिका
आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जीपीएस घड्याळीमधील त्रुटीमुळे येणाऱ्या दिवसात आणखी समस्या निर्माण होतील. कारण ही घड्याळ सफाई कर्मचाऱ्यांचे लोकेशन कधी थायलंड तर कधी अमेरिका दाखवीत असते. अर्धा तास ते दोन तासाचा लाईव्ह डाटा येतो. याशिवाय अनेक तांत्रिक त्रुटी आहेत, ज्या दूर केल्यानंतरच जीपीएस घड्याळीच्या अटेंडन्सला वेतनाशी जोडले जावे. अन्यथा प्रत्येक महिन्यात झोन कार्यालयात अशीच समस्या निर्माण होत राहील.

Web Title: Cleansing workers locked the Laxminar zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.