नागपुरात एटीएम कार्डची अदलाबदली करून रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 01:28 AM2019-04-14T01:28:45+5:302019-04-14T01:30:34+5:30

नवीन एटीएम कार्डची बेमालूमपणे अदलाबदली करून एका व्यक्तीचे २१, ७०० रुपये एका आरोपीने लंपास केले. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याची चौकशी केल्यानंतर नंदनवन पोलिसांनी शनिवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

By changing ATM card cash withdrawn in Nagpur | नागपुरात एटीएम कार्डची अदलाबदली करून रक्कम लंपास

नागपुरात एटीएम कार्डची अदलाबदली करून रक्कम लंपास

Next
ठळक मुद्देपिन कोड जनरेट करून देण्याची बतावणी : नंदनवनमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन एटीएम कार्डची बेमालूमपणे अदलाबदली करून एका व्यक्तीचे २१, ७०० रुपये एका आरोपीने लंपास केले. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याची चौकशी केल्यानंतर नंदनवन पोलिसांनी शनिवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
नंदनवनमधील मीरे लेआऊटमध्ये राहणारे प्रवीण मोरेश्वर झोटिंग (वय ३६) यांना बँक ऑफ बडोदाकडून जानेवारी महिन्यात नवीन एटीएम कार्ड मिळाले. हे कार्ड घेऊन झोटिंग १५ जानेवारीला दुपारी २.३० वाजता उदयनगर चौकातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये गेले. त्यांना नवीन कार्डचा पीन कोड जनरेट करायचा होता. त्यांना ते जमत नसल्याचे पाहून बाजूला उभा असलेला एक २० ते २५ वयोगटातील आरोपी त्यांच्याजवळ आला. त्याने पिन कोड जनरेट करून देतो, असे सांगून झोटिंग यांचे एटीएम कार्ड ताब्यात घेतले आणि त्यांची नजर विचलित करून दुसरे एटीएम कार्ड त्यांच्या हातात देऊन आरोपी तेथून निघून गेला. काही दिवसानंतर झोटिंग एटीएममध्ये पैसे काढायला गेले. मात्र, त्यांचे कार्ड आणि पिन अवैध असल्यामुळे रक्कमच निघाली नाही. त्यामुळे ते बँकेत गेले. त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता बँकेमार्फत त्यांना पाठविलेले कार्ड त्या भामट्याने लंपास केल्याचे आणि त्याचा गैरवापर करून एटीएममधून २१,७०० रुपये काढून घेतल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे झोटिंग यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार अर्ज दिला. या अर्जाची चौकशी करण्यासाठी नंदनवन पोलिसांना तब्बल तीन महिने लागले. त्यानंतर शनिवारी या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. एटीएममधील सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: By changing ATM card cash withdrawn in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.