उमरेडच्या स्ट्राँगरुममधून सीसीटीव्ही, टीव्हीसंच चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:20 AM2019-04-24T01:20:37+5:302019-04-24T01:21:31+5:30

रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील मतदार सुरक्षा केंद्रातून सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग असलेले डीव्हीआर आणि टीव्ही संच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परंतु ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वपूर्ण साहित्य आधीच नागपुरात पोहचते केल्याने चोरीला गेलेले साहित्य महत्त्वपूर्ण नसल्याचा निर्वाळा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

CCTV, TVS stolen from Umred's Strangroom | उमरेडच्या स्ट्राँगरुममधून सीसीटीव्ही, टीव्हीसंच चोरीला

उमरेडच्या स्ट्राँगरुममधून सीसीटीव्ही, टीव्हीसंच चोरीला

Next
ठळक मुद्देसाहित्य महत्त्वपूर्ण नसल्याचा प्रशासनाचा निर्वाळा

अभय लांजेवार /लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (उमरेड) : रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील मतदार सुरक्षा केंद्रातून सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग असलेले डीव्हीआर आणि टीव्ही संच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परंतु ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वपूर्ण साहित्य आधीच नागपुरात पोहचते केल्याने चोरीला गेलेले साहित्य महत्त्वपूर्ण नसल्याचा निर्वाळा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उमरेड विधानसभा क्षेत्रात एकूण ३८४ मतदार केंद्र होते. या संपूर्ण मतदान केंद्रासाठी उमरेड येथील शासकीय औद्योगिक संस्थेची स्ट्राँग रुमसाठी निवड करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या सुरक्षा केंद्रावर करडी नजर ठेवण्यासाठी आणि साहित्य सुरक्षित असावे याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. साधारणत: मार्च अखेरपासूनच येथील स्ट्राँग रुमवर एका पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात २४ तास कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात होता. सदर मतदान सुरक्षा केंद्रावरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे डीव्हीआर आणि टीव्हीसंच चोरीला गेले आहेत.
निवडणूक अथवा मतमोजणी प्रक्रियेला बाधा पोहचणार नाही
उमरेड विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जनार्दन लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, मतदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वपूर्ण साहित्य नागपूरच्या कळमना येथील स्ट्राँगरुममध्ये सुरक्षितरीत्या पोहचविण्यात आले. निवडणूक प्रक्रियेचे केलेले व्हिडिओ चित्रीकरणही प्रशासनाकडे उपलब्ध आहे. हे सर्व साहित्य रवाना केल्यानंतर उमरेडच्या स्ट्राँगरुमला कुलूप लावण्यात आले. त्या स्ट्राँगरुममध्ये सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग असलेले डीव्हीआर आणि दोन टीव्हीसंच व इतर साहित्य ठेवलेले होते. त्यातील हे साहित्य चोरीला गेले आहे. त्याबाबतचे पत्र स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. संबंधित साहित्य चोरीला गेल्यामुळे निवडणूक अथवा मतमोजणीच्या प्रक्रियेला कुठलीही बाधा पोहचणार नाही, असा निर्वाळा लोंढे यांनी यावेळी दिला.

 

Web Title: CCTV, TVS stolen from Umred's Strangroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.