नागपुरातील ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे चार शहरांना जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 08:03 PM2018-12-22T20:03:18+5:302018-12-22T20:04:26+5:30

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) ब्रॉडगेज रेल्वेचा ३०० कोटींची तरतूद असलेला विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य शासनाकडे सादर केला आहे. ब्रॉडगेज मेट्रो नागपुरातून वर्धा, भंडारा, रामटेक आणि नरखेड या चार शहरांसोबत जोडण्यात येणार आहे.

Broadgase Metro rail in Nagpur connects four cities | नागपुरातील ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे चार शहरांना जोडणार

नागपुरातील ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे चार शहरांना जोडणार

Next
ठळक मुद्देडीपीआर शासनाकडे सादर : ३३० कोटींची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) ब्रॉडगेज रेल्वेचा ३०० कोटींची तरतूद असलेला विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य शासनाकडे सादर केला आहे. ब्रॉडगेज मेट्रो नागपुरातून वर्धा, भंडारा, रामटेक आणि नरखेड या चार शहरांसोबत जोडण्यात येणार आहे.
केंद्र सरकार व भारतीय रेल्वेत होणार करार
हा अहवाल राज्य शासनातर्फे केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. मंजुरीनंतर या प्रकल्पासाठी महामेट्रो आणि भारतीय रेल्वेमध्ये करार होईल. त्यानंतरच प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती मिळेल. चार शहरांना जोडणारी ब्रॉडगेज रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू यासारख्या वित्तीय संस्थेकडून वित्तीय साहाय्य घेण्याची अपेक्षा आहे.
अहवालात नमूद केल्यानुसार मेट्रो सेवेत ब्रॉडगेज रेल्वे नागपूर-नरखेड मार्गावर कळमेश्वर, काटोलला जोडण्यात येणार आहे. ब्रॉडगेज रेल्वेची गती प्रति तास १३० कि़मी. राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना संबंधित ठिकाणी कमी वेळेतच पोहोचता येईल. उदाहरण द्यायचे झाल्यास एक्स्प्रेस रेल्वेला नागपूरहून वर्धेला पोहोचण्यासाठी १०५ मिनिटे लागतात तर ब्रॉडगेज मेट्रोला केवळ ७० मिनिटे लागतील.
चारही शहरात होणार २४ फेऱ्या
ब्रॉडगेज रेल्वे नागपुरातून कळमेश्वर, काटोल, नरखेड, बुटीबोरी, वर्धा, सेलू, भंडारा, रामटेक, कामठी, कन्हान या भागांना जोडण्यात येणार आहे. चारही शहरांमध्ये रेल्वेच्या २४ फेऱ्या राहणार आहेत. एका रेल्वेत दोन हजार प्रवासी संख्या राहणार आहे. प्रारंभी म्हणजेच एक वर्षापर्यंत एका दिवशी २१ हजार प्रवासी संख्या त्यानंतर दरवर्षी ३ टक्के वाढ होण्याच्या अपेक्षेने ही संख्या ४८ हजारापर्यंत जाण्याची शक्यता अहवालात व्यक्त केली आहे. प्रकल्पावर होणारी गुंतवणूक ३० वर्षांत वसूल होण्याचा अंदाज आहे.
३६ कोचेसची आवश्यकता
प्रकल्पांतर्गत ३६ कोचेसची गरज भासणार असून गुंतवणूक २८८ कोटींची राहील. या अंतर्गत तिकीट यंत्रणा नागपूर मेट्रो, ब्रॉडगेज मेट्रो आणि सिटी बसची एकत्रित व्यवस्था राहील. नागपूर ते टर्मिनल स्टेशनपर्यंतचे एका मार्गाचे तिकीट शुल्क ५० ते ८० रुपये आणि मासिक पास दोन हजार रुपये राहील. या शुल्कापैकी प्रति प्रवासी २५.३९ रुपये भारतीय रेल्वेला देण्याचे अहवालात नमूद केले आहे.
या प्रकल्पासाठी नागपूर मेट्रोला सहा कोचेसची एक रेल्वे अशा एकूण सहा रेल्वे खरेदी कराव्या लागतील. स्टेट ऑफ ऑर्ट एसी कोचेसची किंमत २८८ कोटी रुपये प्रस्तावित केली आहे. ही किंमत एकूण प्रकल्पाच्या ८७ टक्के राहील. प्रवाशांसाठी इंटरचेंज सुविधा नागपूर मेट्रो आणि ब्रॉडगेज मेट्रोतर्फे नागपूर, अजनी आणि खापरी येथे विकसित करण्यात येणार आहे. या स्टेशनवर ब्रॉडगेज मेट्रो कोसेससाठी प्लॅटफॉर्मची हाईट वाढवावी लागेल, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
राज्याने डीपीआर मंजुरीनंतर केंद्राकडे पाठवावा
महामेट्रोने मेट्रो ब्रॉडगेज मेट्रोचा डीपीआर राज्य शासनाकडे पाठविला आहे. तो मान्य करून राज्याने लवकरच मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवावा. तो तिथेही मंजूर होऊन प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी करार होणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला काही महिने लागतील. या प्रकल्पामुळे चारही शहरांतील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल.
अखिलेश हळवे, उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट कम्युनिकेशन), महामेट्रो.

Web Title: Broadgase Metro rail in Nagpur connects four cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.