नागपुरात वकिलांच्या निवडणुकीत बोगस मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:55 PM2018-10-26T22:55:34+5:302018-10-26T22:59:26+5:30

जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीमध्ये शुक्रवारी काही वकिलांनी बोगस मतदान केले. वकील कायद्याच्या क्षेत्रात कार्य करीत असल्यामुळे त्यांनी कायदा पाळावा अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. परंतु, या निवडणुकीत अनेकांनी कायद्याची पायमल्ली केली.

Bogus voting in Nagpur lawyer's elections | नागपुरात वकिलांच्या निवडणुकीत बोगस मतदान

नागपुरात वकिलांच्या निवडणुकीत बोगस मतदान

Next
ठळक मुद्देडीबीए निवडणूक : अनेकांनी केले नाही नियमांचे पालन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीमध्ये शुक्रवारी काही वकिलांनी बोगस मतदान केले. वकील कायद्याच्या क्षेत्रात कार्य करीत असल्यामुळे त्यांनी कायदा पाळावा अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. परंतु, या निवडणुकीत अनेकांनी कायद्याची पायमल्ली केली.
यावेळी सर्वकाही सुरळीत पार पडावे याकरिता निवडणूक समितीने आवश्यक ती सर्व तयारी केली होती. परंतु, काही वकिलांनी समितीची अपेक्षा पूर्ण होऊ दिली नाही. काही वकिलांनी दुसऱ्या वकिलांच्या नावापुढे सह्या करून बोगस मतदान केले. खरे वकील मतदान करण्यासाठी आल्यानंतर हा गैरप्रकार प्रकाशात आला. ज्येष्ठ वकील डी. एस. श्रीमाली यांचे नाव मतदार यादीमध्ये ३०३४ व्या क्रमांकावर होते. ते दुपारी १२.१५ वाजता मतदान करण्यासाठी मतदार कक्षात गेले. त्यावेळी त्यांच्या नावावर दुसºया वकिलाने मतदान केल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी निवडणूक समितीकडे लेखी तक्रार नोंदवली.
समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. के.बी. आंबिलवादे यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी तीन-चार वकिलांनी बोगस मतदान केल्याची माहिती दिली. ज्यांच्या नावावर बोगस मतदान झाले त्या वकिलांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले नाही. अशा वकिलांना मतदानाची संधी देऊन त्यांची मते वेगळी ठेवण्यात आली आहेत. मतमोजणीनंतर दोन उमेदवारांच्या मतांमध्ये तीन-चार मतांचा अल्प फरक राहिल्यास त्यावेळी ही मते मोजली जातील असे आंबिलवादे यांनी स्पष्ट केले.

८८.९१ टक्के मतदान
निवडणुकीमध्ये ८८.९१ टक्के एकूण मतदान झाले. निवडणुकीत मतदान करण्याकरिता ३९०५ वकील पात्र ठरले होते. त्यापैकी ३४७२ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ दोन वर्षे म्हणजे, २०१८ ते २०२० पर्यंत कार्यरत राहील. शनिवारी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

६८ उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद
निवडणुकीमध्ये कार्यकारी मंडळातील १७ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवार रिंगणात होते. त्यांचे भवितव्य शुक्रवारी पेटीबंद झाले. अध्यक्ष पदासाठी उदय डबले, मनोज साबळे, कमल सतुजा, महासचिव पदासाठी रंजन देशपांडे, नितीन देशमुख, सुशील कल्याणी, विवेक कोलते, मंगेश मून तर, उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी पराग बेझलवार, प्रभाकर भुरे, शशांक चौबे, मनीष गुप्ता, विवेक कराडे, सुनील लाचरवार, सौमित्र पाल, विलास राऊत, विलास सेलोकर, तावीर शेख व छायादेवी यादव यांनी निवडणूक लढवली.

निवडणुकीत मतपत्रिकांची फोटोग्राफी : आचारसंहितेची एैसीतैसी

गेल्या मार्चमध्ये झालेल्या बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये वकिलांनी मतपत्रिकांची फोटोग्राफी केली होती. त्यावेळी वकिलांच्या या अवैध कृतीवर सर्व स्तरातून टीका झाली होती. परंतु, वकिलांनी त्यातून काहीच धडा घेतला नाही. त्या अवैध कृतीची त्यांनी नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या निवडणुकीतही पुनरावृत्ती केली.
निवडणूक समितीने या निवडणुकीमध्ये आचारसंहिता जारी केली होती. मतदान कक्षामध्ये मोबाईल फोन घेऊन जाण्यास व कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी करण्यास प्रतिबंध राहील, असे आचारसंहितेमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. असे असतानाही वकिलांनी मतदान कक्षामध्ये मोबाईल फोन नेले. त्यानंतर ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या नजरा चुकवून मतपत्रिकांचे फोटो काढले. त्या फोटोवरून संबंधित वकिलाने कुणाकुणाला मतदान केले हे स्पष्ट दिसून येते. या कृतीमुळे निवडणूक आचारसंहितेची एैसीतैसी झाली. तसेच, गुप्त मतदान पद्धतीचा भंग झाला. निवडणूक अशाप्रकारे होत असेल तर, नियमांचा फायदा काय असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे. निवडणूक समिती यासंदर्भात काय निर्णय घेते हे आता सर्वात महत्त्वाचे राहणार आहे.

Web Title: Bogus voting in Nagpur lawyer's elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.