नागपुरात घरफोडी करणारे बॉडी बिल्डर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 08:06 PM2018-11-16T20:06:10+5:302018-11-16T20:13:34+5:30

घरफोडी करून आपले महागडे खर्च भागविणारी बॉडी बिल्डरची एक जोडी अजनी पोलिसांनी शोधून काढली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासात या जोडीचा छडा लावून दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

Bodybuilders arrested, who burglars in Nagpur | नागपुरात घरफोडी करणारे बॉडी बिल्डर जेरबंद

नागपुरात घरफोडी करणारे बॉडी बिल्डर जेरबंद

Next
ठळक मुद्देफूड सप्लीमेंट सप्लायरही गजाआड : धाडसी घरफोडीतून खुलासा : अजनी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरफोडी करून आपले महागडे खर्च भागविणारी बॉडी बिल्डरची एक जोडी अजनी पोलिसांनी शोधून काढली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासात या जोडीचा छडा लावून दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य तसेच अन्य चीजवस्तूंसह सहा लाखांचे सामान पोलिसांनी जप्त केल्याची माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज पत्रकारांना दिली. अफसर मोहम्मद खान (वय ३१, रा. तीन खंबा चौक, टिमकी) आणि इरफान हामिद खान (वय २८, रा. ज्योतीनगर खदान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानेश्वरनगरात कालीचरण टाकभवरे यांचे निवासस्थान आहे. त्यांचा संयुक्त परिवार वरच्या आणि खालच्या माळ्यावर राहतो. १२ नोव्हेंबरला ते सहपरिवार दिवाळीच्या सुटीत कुलूमनाली येथे फिरायला गेले होते. १३ नोव्हेंबरला सकाळी त्यांच्या घराच्या तीनही दारांचे कुलूप तुटलेले शेजाऱ्यांना दिसले. त्यामुळे शेजाºयांनी ही माहिती टाकभवरे यांचे जावई सतीश चव्हाण (रा. राजनगर) यांना कळविली. ते टाकभवरेंच्या घरी पोहचले. चौकशीत घरातील १५ तोळे सोने, दिवाळी पूजनासाठी काढून ठेवलेले ६० हजार रुपये आणि एलसीडी घरातून चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
या धाडसी चोरीची माहिती कळताच अजनीचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत टाकभवरेंच्या घराशेजारी १३ नोव्हेंबरच्या पहाटे बॉडी बिल्डर तरुण संशयास्पद अवस्थेत दिसल्याची माहिती पुढे आली. आजूबाजूच्या सीसीटीव्हीत दुचाकीवर एलसीडी टीव्ही नेताना आरोपी दिसून आले. त्यांच्या दुचाकीचे क्रमांक मिळाल्यानंतर अजनीचे ठाणेदार शैलेश संख्ये यांनी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांना ही माहिती दिली. त्यांनी लगेच आरोपींची नावे व पत्ते मिळवून त्यांना अटक करण्यासाठी पथक रवाना केले.
गुरुवारी रात्रीनंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक आरोपींच्या घरी गेले तेव्हा त्यांना आरोपीच्या नातेवाईकांनी जोरदार विरोध केला. त्याला न जुमानता पोलिसांनी आरोपी अफसर आणि इरफानला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून ६० हजार रुपये, सोन्याचे दागिने, एलसीडी टीव्ही आणि चोरीत वापरलेली बुलेट तसेच अन्य एक दुचाकी जप्त केली.
आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येऊ शकतात, अशी शक्यताही उपायुक्त भरणे यांनी व्यक्त केली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासात आरोपींच्या मुसक्या बांधून त्यांच्याकडून सुमारे ६ लाखांचे साहित्य जप्त करण्याची कामगिरी अजनीचे पोलीस उपानिरीक्षक वाय. व्ही. इंगळे, के. पी. मगर, हवलदार अनिल ब्राम्हणकर, रामचंद्र कारेमोरे, सिद्धार्थ पाटील, नायक शैलेष बडोदेकर, आशिष राऊत, मनोज टेकाम, राहुल वरखडे, देवेंद्र वनघरे, अलका ठेंगरे यांनी ही कामगिरी बजावल्याचेही उपायुक्त भरणे यांनी पत्रकारांना सांगितले.

मॉडेल फिजिक स्पर्धेची तयारी अन्...
आरोपी इरफान आणि अफसर हे दोघेही चांगले बॉडी बिल्डर आहेत. त्यांनी अनेक शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागही नोंदवला आहे. राम कुलर चौकात इरफानच्या भावाचा जीम आहे. तेथे हे दोघे ट्रेनर म्हणून काम करतात. तेथे येणारांना अफसर प्रोटीन्स (फूड सप्लिमेंट)ही पुरवितो. जानेवारी २०१९ मध्ये मुंबईत होऊ घातलेल्या मॉडेल फिजिक स्पर्धेची इरफानने तयारी चालवली होती. मात्र, पाहिजे तशी मिळकत नसल्याने आपण ही घरफोडी केल्याचे या दोघांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अफसरची मैत्रिण ओमकारनगरात राहते. त्यामुळे तो तिला भेटायला नेहमीच इकडे येतो. घटनेच्या मध्यरात्री १२ वाजता तो मैत्रिणीला भेटायला जात असताना त्याला टाकभवरेच्या घरी कुलूप लागलेले दिसले. त्याने ही माहिती इरफानला फोन करून दिली. त्यानंतर दोघांनी पहाटेच्या वेळी टाकभवरेच्या निवासस्थानाचे कुलूप तोडून ही धाडसी घरफोडी केली. मात्र, परिसरातील सीसीटीव्हीने त्या दोघांना कैद करून पोलिसांच्या कोठडीत पोहचवले. ही आपली पहिलीच घरफोडी असल्याचे आरोपी सांगत आहेत. मात्र, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून त्यांनी यापूर्वीही असे अनेक गुन्हे केले असावे, असा संशय असल्याचे उपायुक्त भरणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Web Title: Bodybuilders arrested, who burglars in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.