नागपूर व रामटेकमध्ये भाजप-सेनेची सचोटी; काँग्रेसची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:48 AM2019-03-11T10:48:19+5:302019-03-11T10:49:54+5:30

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेले नागपूर व रामटेक हे दोन्ही मतदारसंघ सध्या अनुक्रमे भाजपा व शिवसेनेच्या ताब्यात आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरवर विजयी पताका लहरविण्यासाठी तर शिवसेनेचे कृपाल तुमाने हे रामटेकच्या गडावर भगवा फडकविण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

BJP-Sena's integrity in Nagpur and Ramtek; Congress's Test | नागपूर व रामटेकमध्ये भाजप-सेनेची सचोटी; काँग्रेसची कसोटी

नागपूर व रामटेकमध्ये भाजप-सेनेची सचोटी; काँग्रेसची कसोटी

Next
ठळक मुद्देगडकरी-तुमानेंची मतदारसंघात गस्तकाँग्रेस मात्र दिल्लीत व्यस्तबसपा, ‘आप’, वंचित आघाडी पत्ते उघडेना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेले नागपूर व रामटेक हे दोन्ही मतदारसंघ सध्या अनुक्रमे भाजपा व शिवसेनेच्या ताब्यात आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरवर विजयी पताका लहरविण्यासाठी तर शिवसेनेचे कृपाल तुमाने हे रामटेकच्या गडावर भगवा फडकविण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. निवडणुकीची घोषणा होऊनही काँग्रेसचे तळ्यातमळ्यात सुरू आहे. नागपूरसाठी भाजपा सोडून काँग्रेसवासी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या नावाची दिल्लीत चर्चा आहे. रामटेकमध्ये माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या नावाचीही अद्याप घोषणा झालेली नाही. राज्यातील पहिल्याच टप्प्यात ११ एप्रिल रोजी नागपूर व रामटेक या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. अपुऱ्या वेळेमुळे प्रचारात काँग्रेस ‘बॅकफूट’वर जाण्याची चिन्हे आहेत.
भाजपसाठी नागपूर हा देशातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ आहे. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय याच शहरात आहे. शिवाय मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी भाजपचा चेहरा असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हा मतदारसंघ असल्यामुळे नागपूरची लढत भाजपसाठी प्रतिष्ठेची आणि तेवढीच महत्त्वाची आहे. २०१४ मध्ये नितीन गडकरी यांनी २ लाख ८४ हजार ८४८ मतांनी काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांचा पराभव केला होता. गडकरींना ५४.१७ टक्के मते मिळाली होती. संघभूमी असलेल्या नागपुरात ‘कमळ’ फुलविण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही यश आले. यावेळी एवढे मोठे मताधिक्य टिकवून ठेवण्याचे आवाहन गडकरींसमोर असेल.
गडकरींच्या विरोधात लढण्यासाठी दावेदारांची यादी मोठी आहे. माजी खासदार नाना पटोले, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार आशिष देशमुख, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, ओबीसी नेते बबनराव तायवाडे आदी इच्छुक आहेत. शुक्रवारी दिल्ली येथे झालेल्या छाननी समितीच्या बैठकीत नाना पटोले यांच्या नावाला संमती मिळाल्याची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे अधिकृत घोषणा होईपर्यंत उमेदवारालाही प्रचाराला लागणे कठीण होणार आहे. नागपूर शहरात महापालिकेवर भाजपाचा झेंडा आहे. विधानसभेतील सहा आमदार, विधान परिषदेतील तीन आमदार, राज्यसभेत एक खासदार अशी तगडी फौज आहे. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात दोन हेवीवेट नेतेही आहेत. दुसरीकडे काँग्रेसपुढे गटबाजीचे मोठे आव्हान आहे. मुत्तेवार-चतुर्वेदी यांच्या गटबाजीत चतुर्वेदींना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखविला. मात्र, त्यानंतरही चतुर्वेदी यांनी नितीन राऊत व अनिस अहमद यांना सोबत घेत विरोधी मोट मजबूत बांधली आहे. दुसरीकडे मुत्तेमवार गटाचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या हातात पक्ष संघटना आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तिकीट कोणत्या गटाला मिळते, त्यानंतर दुसरा गट काय भूमिका घेतो यावरही बरेच काही अवलंबून आहे.
एकेकाळी भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी दोेन वेळा प्रतिनिधित्व केलेला रामटेक लोकसभा मतदार संघावर सध्या शिवसेनेचा ताबा आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी २००९ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचला होता. मात्र २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी रामटेकचा गड सर केला. वासनिक यांना तब्बल १,७५,७९१ मतांनी पराभूत करीत रामटेकच्या गडावर पुन्हा एकदा भगवा फडकला. युतीमुळे सुखावलेले तुमाने पुन्हा ‘बाण’ घेऊन रिंगणात असतील तर काँग्रेसकडून दिल्लीत ‘हेवीवेट’ मानले जाणारे महासिचव मुकुल वासनिक पुन्हा तयारीत आहेत.
अ.भा. काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष नितीन राऊत यांनीही पक्षाकडे दावा केला आहे. मात्र, वासनिकांनाच तिकीट मिळण्याचे जवळपास निश्चित आहे. जिल्हा परिषदेत युतीची सत्ता आहे. जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत आणि पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. या मतदारसंघात मोडणाऱ्या विधानसभेच्या सहापैकी पाच जागेवर भाजप आणि एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे. गत वर्षी काटोल विधानसभेत भाजपाकडून जिंकलेले आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसचा ‘हात’ धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानल्या जाणाºया काटोल कौल लोकसभेत कुणाला जातो याकडे लक्ष लागले आहे.

बसपा, आप व आंबेडकरांचे वेट अ‍ॅण्ड वॉच
बसपा, आम आदमी पार्टीसह अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने अद्याप पत्ते उघडलेले नाही. नागपुरात गेल्यावेळी बसपाचे मोहन गायकवाड यांनी ९६४३३ मते घेतली होती. बसपा यावेळीही बाहेरचाच उमेदवार हत्तीवर स्वार करेल का, याकडे लक्ष लागले आहे. भ्रष्टाचार विरोधात लढणारा चेहरा म्हणून नागपुरात ‘आप’ कडून उतरलेल्या अंजली दमानियाही ६९ हजार ८१ मतांवर थांबल्या होत्या. सध्यस्थितीत ‘आप’कडे दमानियांसारखा मोठा चेहरा दिसत नाही. रामटेकमध्ये गेल्यावेळी बसपाच्या किरण पाटणकर यांनी ९५, ०५१ मते घेतली होती. ‘आप’चे प्रताप गोस्वामी यांनी २५ हजारावर मते घेतली होती. मात्र यानंतर ‘आप’ने या मतदारसंघात फारसा प्रताप दाखविला नाही. हे तिन्ही पक्ष किती तगडा उमेदवार देतात यावरही बरेच काही अवलंबून आहे.

Web Title: BJP-Sena's integrity in Nagpur and Ramtek; Congress's Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा