नागपुरकर ‘डॉली चहावाला’सोबत चक्क बिल गेट्स यांची ‘चाय पे चर्चा’

By योगेश पांडे | Published: February 28, 2024 10:00 PM2024-02-28T22:00:06+5:302024-02-28T22:01:24+5:30

गेट्स यांना सोशल माध्यमांतूनच त्याच्याबाबत कळाले व त्यांनी एका हिल स्टेशनवर त्याला आमंत्रित केले.

Bill Gates' 'Chai Pe Charcha' with Nagpurkar 'Dolly Chahwala' | नागपुरकर ‘डॉली चहावाला’सोबत चक्क बिल गेट्स यांची ‘चाय पे चर्चा’

नागपुरकर ‘डॉली चहावाला’सोबत चक्क बिल गेट्स यांची ‘चाय पे चर्चा’

नागपूर: बिल गेट्स या नावाला वेगळ्या ओळखीची काहीच गरज नाही. आपल्या सामाजिक कार्यांसाठीदेखील ते जगभर फिरत असतात आणि सगळ्या सुखसुविधा त्यांच्या पायाशी लोळण घेत असतात. असे असतानादेखील अब्जाधीश बिल गेट्स यांना चक्क नागपुरातील चहाविक्रेत्याच्या चहाने भुरळ घातली. त्यांनी चक्क त्या चहाविक्रेत्याला आमंत्रित करून डोळ्यासमोर चहा बनवताना पाहिले आणि त्याच्यासोबत ‘चाय पे चर्चा’ करत त्याच्या कौशल्याबाबत कौतुकोद्गारदेखील काढले. खुद्द गेट्स यांनी ‘इन्स्टाग्राम’वर शेअर केलेला हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून अशा अनेक ‘मिनी चाय पे चर्चा’ भविष्यात दिसतील असे संकेतच यातून त्यांनी दिले आहे.

नागपुरातील सदर परिसरातील ‘डॉली चहावाला’ हा मागील अनेक काळापासून ‘सोशल मीडिया’वर प्रसिद्ध आहे. त्याचे मोठे फॅन फॉलोईंग असून चहा बनविण्याच्या त्याच्या हटके स्टाईलमुळे त्याचे व्हिडीओ व रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. गेट्स यांना सोशल माध्यमांतूनच त्याच्याबाबत कळाले व त्यांनी एका हिल स्टेशनवर त्याला आमंत्रित केले.

डॉलीने तेथेच एका हातठेल्यावर स्टोव्ह मांडून गेट्स यांच्या डोळ्यासमोर चहा तयार केला. गेट्स त्याची प्रत्येक लकब व चहा बनविण्याची स्टाईल कौतुकाने पाहत होते. व्हिडीओच्या सुरुवातीलाच गेट्स ‘वन चाय प्लिज’ असे म्हणताना दिसतात व व्हिडीओत भारतात परत आल्याने रोमांचित असल्याचे गेट्स यांनी नमूद केले आहे.

अखेरीस अशा अनेक चाय पे चर्चा होतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स येत असून नागपुरकरांना तर मोठा सुखद धक्का बसला आहे. बुधवारी सायंकाळपासूनच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Web Title: Bill Gates' 'Chai Pe Charcha' with Nagpurkar 'Dolly Chahwala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.