बांगलादेशी घुसखोरांची विदेशी सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:00 AM2018-08-27T10:00:45+5:302018-08-27T10:02:25+5:30

भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांनी केवळ नागपुरातच नव्हे तर मुंबई आणि छत्तीसगडमध्येही आपले नेटवर्क उभे केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

Bangladeshi enters in India illegally | बांगलादेशी घुसखोरांची विदेशी सफर

बांगलादेशी घुसखोरांची विदेशी सफर

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रासह छत्तीसगडमध्येही नेटवर्क तपास यंत्रणांचे डोळे विस्फारले

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांनी केवळ नागपुरातच नव्हे तर मुंबई आणि छत्तीसगडमध्येही आपले नेटवर्क उभे केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी पासपोर्ट तयार करून देश-विदेशात हवाई सफर केल्याचे उघड झाल्याने तपास यंत्रणांचे डोळे विस्फारले आहे. अटक करण्यात आलेल्या घुसखोरांपैकी एकाचे ‘अन्सारउल बांगलादेश टीम (एबीटी)’ या बांगलादेशातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा तपास अधिकाऱ्यांना संशय असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
बांगलादेशी घुसखोरांचा नागपूर प्रवेश आणि येथील बेकायदा वास्तव्य तपास यंत्रणा, पोलीस आणि नागपूरकरांसाठी नवीन नाही. १० वर्षांपूर्वी परिमंडळ तीनमध्ये तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रभात कुमार यांनी विशेष मोहीम राबवून ५० पेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोरांना हुडकून काढले होते. त्यांना अटक करून कारागृहात डांबल्यानंतर पुढे कायदेशीर औपचारिकता पार पाडत या सर्व घुसखोरांना भारतातून हाकलून लावण्यात आले होते. त्यानंतरही वेळोवेळी नागपुरात बांगलादेशी घुसखोर पकडले गेले आणि त्यांच्यावर कारवाईदेखिल झाली. बेरोजगारीमुळे हे घुसखोर येथे स्थिरावल्याचे दरवेळीच्या पोलीस तपासात उघड झाले. मात्र, २३ आॅगस्टला विशेष शाखेने ताब्यात घेतलेल्या चार घुसखोरांचे प्रकरण तपास यंत्रणांमध्ये खळबळ निर्माण करणारे आहे.
रॉकी विमल बरूवा ऊर्फ रॉकी चौधरी (वय २६, मूळ पत्ता शहाबीनगर, बरुआपारा, रांगोनिया, जि. चिंत्ताग्राम, बांगलादेश), सुदर्शन नयन बरूवा ऊर्फ नयनसुमन तालुकदार अनंतमोहन (वय ३०, रा. शेगाटा धोपाचुरी, त. शतकानी. जि. चट्टाग्राम, बांगलादेश), विप्लब शिशिर बरूवा ऊर्फ विप्लब शिशिर तालुकदार (वय ३४, रा. शिरकुब, मोकिंचर माब्कली, जि. खटकग्राम, बांगलादेश) आणि प्रदीप चित्तरंजन बरूवा ऊर्फ नंदप्रिय तपन बरूवा (वय २८, रा. पुट्टीविला एमसरहाट, लोहागडा, जि. चट्टग्राम, बांगलादेश) हे चौघे घुसखोरी करून भारतात आले. त्यांनी काही वर्षांपूर्वी गिट्टीखदानमधील गांधी पुतळ्याजवळच्या दीनानाथ निखारे यांच्याकडे भाड्याने खोली घेतली. त्यानंतर त्यांनी स्वत: बांगलादेशी नव्हे तर भारतीय नागरिक असल्याचे भासविणारी बनावट कागदपत्रे तयार करून घेतली.
नागपुरात आपले बेकायदा वास्तव्य त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कायदेशीर करून घेण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे त्यांनी आपले नेटवर्क मुंबई आणि छत्तीसगडमध्येही विस्तारले. या नेटवर्कच्या माध्यमातून काहींनी मुंबई तर काहींनी रायपूर (छत्तीसगड) मधून पासपोर्ट तयार करून घेतल्याचे समजते. या पासपोर्टच्या आधारे उपरोक्त चौघांपैकी रॉकी वगळता तिघांनी सिंगापूर, मलेशिया, थायलंडची सफर केल्याचीही माहिती पुढे आली आहे. या माहितीमुळे तपास यंत्रणा चक्रावली आहे. या चौघांपैकी एकाचे एबीटी नामक बांगलादेशी दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय असतानाच आता तिघांच्या फॉरेन टूरची माहिती उघड झाल्याने तपास यंत्रणांना दुसरा मोठा धक्का बसला आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करून त्यांचा २७ आॅगस्टपर्यंत पोलिसांनी पीसीआर मिळवला आहे.

पैसा कुठून आला ?
तीन देशाच्या हवाई सफरीसाठी त्यांनी रक्कम कुठून जमवली, हा सखोल तपासाचा विषय आहे. त्यांनी तो स्वत: पैसे जमवून केला तर पैसे कुठून आणले आणि दुसरे कुणी त्याचे प्रायोजक (स्पॉन्सरर्स) असेल तर ते कोण आहेत, या स्पॉन्सरर्सचा हेतू काय आहे, याचीही सूक्ष्म चौकशी होणे गरजेचे आहे. दरम्यान, बनावट कागदपत्रे आणि त्याआधारे पासपोर्ट कुणी बनवून दिले असा प्रश्न केला असता ते अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीचे नाव घेत आहेत. ते जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय आहे. दरम्यान, त्यांचा हा फॉरेन टूर सहलीचा भाग होता की त्यामागे आणखी काही आहे, त्याची तपास यंत्रणा चौकशी करीत आहेत.

Web Title: Bangladeshi enters in India illegally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा