नागपुरात अकाऊंट हॅक करून ८४ लाख काढण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 09:39 AM2018-02-26T09:39:26+5:302018-02-26T09:39:32+5:30

नागपुरात जिनिंग व्यापाऱ्याचे अकाऊंट हॅक करून ८४ लाख रुपये काढून घेण्याचा एका गुन्हेगाराने प्रयत्न केला. त्यातील १४ लाख रुपये दुसऱ्या खात्यात वळतेही केले. मात्र, लगेच ही बाब लक्षात आल्याने व्यापाऱ्याची रोकड बचावली.

Attempt to remove 84 lakhs of hacks in Nagpur account | नागपुरात अकाऊंट हॅक करून ८४ लाख काढण्याचा प्रयत्न

नागपुरात अकाऊंट हॅक करून ८४ लाख काढण्याचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्दे१४ लाख दुसऱ्या खात्यात वळते केलेगणेशपेठमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिनिंग व्यापाऱ्याचे अकाऊंट हॅक करून ८४ लाख रुपये काढून घेण्याचा एका गुन्हेगाराने प्रयत्न केला. त्यातील १४ लाख रुपये दुसऱ्या खात्यात वळतेही केले. मात्र, लगेच ही बाब लक्षात आल्याने व्यापाऱ्याची रोकड बचावली. व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणारी ही घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
मेडिकल चौकाजवळ बोथरा कॉम्प्लेक्समध्ये राहणारे सुनील लक्ष्मीचंद बोथरा (वय ५३) यांची जिनिंग फॅक्टरी आहे. या फर्मच्या नावे असलेल्या बँक खात्याचे चेकबुक बोथरा यांच्या कार्यालयातून ३० जानेवारीला चोरी गेले. बोथरा यांच्या ते लक्षात आले नाही. आरोपीने त्या चेकवर बनावट सही करून बोथरा यांच्या खात्यातून ८४ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. त्यातील १४ लाख रुपये तुमकर कामत नामक व्यक्तीच्या खात्यातआरटीजीएस करून घेतले. हा गैरप्रकार लक्षात आल्याने बोथरा यांनी लगेच बँक अधिकाऱ्यांशी संपर्क करून ही संपूर्ण रक्कम फ्रीज केली. त्यामुळे आरोपीला ती काढून घेता आली नाही. त्यानंतर आरोपीने बोथरा यांचे इंटरनेट बॅकिंग अ‍ॅक्टिव्ह केले. त्यातून किती रक्कम कुठे शिल्लक होती, त्याची माहिती घेतली. त्या आधारे नेट बँकिंगचे स्टार टोकन रजिस्टर्ड करून बोथरा यांचा मोबाईल नंबर बदलवून घेतला. बँक खात्यातून रक्कम काढली गेल्यास लगेच संबंधित खातेधारकाला मेसेज येतो, बोथरा यांना मेसेज कळू नये म्हणून आरोपीने ही बनवाबनवी केली. मात्र, रोजचा व्यवहार होऊनही आपल्या मोबाईलवर मेसेज येत नसल्याचे लक्षात आल्याने बोथरा यांनी पुन्हा बँक अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. गणेशपेठ पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.

कोण आहे तुमकर कामत ?
या गुन्ह्याची सुरुवात चेकबुक चोरून केली. त्यामुळे चेकबुक चोरणारा आरोपी बोथरा यांच्या संपर्कातील किंवा त्यांच्याकडे येणे-जाणे करणारा असावा, असा संशय आहे. आरोपीने ज्याच्या खात्यात १४ लाख रुपये वळते केले तो तुमकर कामत कोण आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. तो हाती लागल्यास या प्रकरणातील आरोपी आणि सर्व घटनाक्रम सहजपणे उघड होईल, असा पोलिसांचा विश्वास आहे.

 

Web Title: Attempt to remove 84 lakhs of hacks in Nagpur account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :crimeगुन्हे