वर्षश्राद्धाच्या खर्चाची रक्कम दिली शिक्षणासाठी : चांदे कुटुंबीयांचा जिव्हाळा परिवाराला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:03 AM2018-08-13T11:03:29+5:302018-08-13T11:03:46+5:30

डॉ. अनिल चांदे यांचे वडील मोहन चांदे यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. यावर्षी त्यांचे वर्षश्राद्ध होते. परंतु चांदे कुटुंबीयांनी त्यांचे वर्षश्राद्ध न करता, या श्राद्धावर होणाऱ्या खर्चाचा निधी त्यांनी जिव्हाळा कुटुंबातील निराधार आणि गरजू मुलामुलींच्या शिक्षणासाठी भेट स्वरूपात दिला.

Annual fund expenditure for education: Support for the families of the Chanda family | वर्षश्राद्धाच्या खर्चाची रक्कम दिली शिक्षणासाठी : चांदे कुटुंबीयांचा जिव्हाळा परिवाराला आधार

वर्षश्राद्धाच्या खर्चाची रक्कम दिली शिक्षणासाठी : चांदे कुटुंबीयांचा जिव्हाळा परिवाराला आधार

Next
ठळक मुद्देचालीरीतीला छेद...साधले समाजहित! 

मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजही समाजात जुन्या चालीरीती आणि परंपरेची वीण घट्ट रोवली आहे. त्याला बळी पडून गरज नसलेल्यांवर अनाठायी खर्च करण्यात येत आहे. समाजभान जपणारे काही सुशिक्षित कुटुंब चालीरीती परंपरेची ही वीण उसवून समाजहिताचे कार्य करीत आहे. नागपुरातील चांदे कुटुंबीयांनी असाच एक आदर्श घडविला आहे जो समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
डॉ. अनिल चांदे यांचे वडील मोहन चांदे यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. यावर्षी त्यांचे वर्षश्राद्ध होते. परंतु चांदे कुटुंबीयांनी त्यांचे वर्षश्राद्ध न करता, या श्राद्धावर होणाऱ्या खर्चाचा निधी त्यांनी जिव्हाळा कुटुंबातील निराधार आणि गरजू मुलामुलींच्या शिक्षणासाठी भेट स्वरूपात दिला. जिव्हाळा परिवार गेल्या काही वर्षापासून विदर्भ आणि अरुणाचल प्रदेशातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी कार्य करीत आहे. ज्या गरजू मुलांना शिक्षणाची आवड आहे, परंतु परिस्थितीअभावी जे शिक्षण घेऊ शकत नाही त्यांच्या पालनपोषणापासून शिक्षणाचा भार जिव्हाळा परिवार सांभाळत आहे. जिव्हाळा परिवार हे सर्व कार्य दान आणि रद्दी संकलनाच्या माध्यमातून करीत आहे. त्यामुळे समाजभान जपणारी अनेक मंडळी जिव्हाळ्याशी जुळलेली आहे. त्यातीलच विनोद जोशी हे सुद्धा आहेत. विनोद जोशी हे डॉ. चांदे यांचे परिचित आहे. जोशी यांनी डॉ. चांदे यांना जिव्हाळा परिवाराचा उद्देश सांगितला, त्यांची भेट घडवून दिली. तेव्हा डॉ. चांदे यांनी आपल्या वडिलांचा श्राद्धाचा कार्यक्रम साजरा न करता, श्राद्धासाठी खर्च होणारा ८० हजार रुपयांचा निधी जिव्हाळा परिवारातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी भेट दिला. चांदे कुटुंबीयांनी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेला फाटा दिला आहे. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासून समाजातील अशा अनेक कुटुंबीयांना प्रेरणा दिली आहे. जिव्हाळा परिवारात झालेल्या एका छोटेखानी सोहळ्याला चांदे आणि धोडपकर कुटुंबीयांसोबत उपाध्यक्ष विनया फडणवीस, सचिव नागेश पाटील, मीना पाटील, विलास देशपांडे उपस्थित होते.

दान सत्कारणी लागले पाहिजे
ज्यांना भूक लागली त्यांना खाऊ घालण्यात अर्थ आहे. चालीरीतीच्या नावावर मोठमोठे सोहळे करून पोट भरलेल्यांना खाऊ घालण्यात काहीच अर्थ नाही. जिव्हाळ्याला भेट देऊन आमचे दान सत्कारणी लागले आहे. समाजातून अशी वृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे. जेणेकरून जिव्हाळ्यासारख्या संस्था अनेक निराधारांचा, गरजूंचा आधार बनू शकेल.
- डॉ. अनिल चांदे

Web Title: Annual fund expenditure for education: Support for the families of the Chanda family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.