क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सीच्या कथित प्रमुखाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:13 AM2019-02-24T01:13:46+5:302019-02-24T01:14:26+5:30

क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (सीआयए) नामक खासगी संस्थेच्या उपराजधानीत कथित कार्यालय प्रमुखाला धंतोली पोलिसांनी आज अटक केली. त्याच्या उत्तर प्रदेशातील साथीदाराला पोलिसांनी नागपुरात बोलावून घेतले आहे. दरम्यान, कार्यालय उघडून गुप्तचर यंत्रणेच्या थाटात विविध प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे.

The alleged chief of the Crime Investigation Agency arrested | क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सीच्या कथित प्रमुखाला अटक

क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सीच्या कथित प्रमुखाला अटक

Next
ठळक मुद्देतपास यंत्रणेच्या लोगोचा गैरवापर : कारवरील नेमप्लेट काढली, जामिनावर सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (सीआयए) नामक खासगी संस्थेच्या उपराजधानीत कथित कार्यालय प्रमुखाला धंतोली पोलिसांनी आज अटक केली. त्याच्या उत्तर प्रदेशातील साथीदाराला पोलिसांनी नागपुरात बोलावून घेतले आहे. दरम्यान, कार्यालय उघडून गुप्तचर यंत्रणेच्या थाटात विविध प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे.
अजनी (चुना भट्टी) जवळच्या पूर्व समर्थनगरात एफसीआय गोदाम असून, या गोदामाजवळच्या एका इमारतीत १४ फेब्रुवारीला यवतमाळ येथील नरेश पालारपवार नामक व्यक्तीने सीआयएचे कार्यालय थाटले. त्याच्या कार्यालयाच्या आतमधील साजसज्जा गुप्तचर यंत्रणेच्या कार्यालयासारखी केली. दर्शनी भागात एक वायरलेस सेट (बंद पडलेला) ठेवला. तर, कार्यालयाच्या बाहेर पालारपवार याची एमएच २९ / एडी ४६९६ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार उभी राहायची. तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्याच्या कारवर असावे तसे एरियलही पालारपवारने आपल्या कारवर लावले. एवढेच नव्हे तर ‘स्टेट डायरेक्टर महाराष्ट्र क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी’ अशी नेमप्लेटही कारवर लावली. समोर सीआयएचा झेंडा होता. एकूणच तपास यंत्रणेतील मोठ्या अधिकाऱ्याची वाटावी तशी ही कार होती. पालारपवारने १६ फेब्रुवारीपासून तेथे विविध प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रारी घेणे सुरू केल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कळाले. त्यावरून गुन्हे शाखा आणि धंतोली पोलिसांचे पथक शुक्रवारी दुपारी या कार्यालयात धडकले. कार्यालयातील तामझाम पाहून पोलीसही चक्रावले. पोलिसांनी तेथील कागदपत्रे जप्त करून पालारपवारला त्याच्या कारसह धंतोली ठाण्यात नेले. तेथे त्याची उशिरा रात्रीपर्यंत चौकशी करण्यात आली. सीआयएचा कथित कार्यालय प्रमुख नरेश पालारपवारला विचारणा केली असता त्याने आपण सामाजिक दायित्वाच्या भावनेने विविध प्रकरणाची चौकशी करणार होतो, असे सांगितले. शनिवारी सकाळी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर होण्याची सूचना करून धंतोली पोलिसांनी त्याला शुक्रवारी रात्री सोडून दिले. आज सकाळपासून पुन्हा या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तपास यंत्रणेच्या लोगोचा, झेंड्याचा गैरवापर केल्याचे सांगून धंतोलीचे ठाणेदार प्रसाद सणस यांनी पालारपवार आणि त्याच्या सीआयएच्या कथित प्रमुखाविरुद्ध गुन्हा दाखल केला. काही वेळेनंतर पालारपवारला जामीन देण्यात आला.
प्रतापसिंगलाही अटक करणार
सीआयएचे मुख्यालय उत्तर प्रदेशातील गौंडा जिल्ह्यात आहे. प्रताप सिंग नामक व्यक्ती या संस्थेचा कथित प्रमुख असल्याचे स्पष्ट झाल्याने धंतोली पोलिसांनी त्याच्यासोबत संपर्क करून त्याला मूळ कागदपत्रांसह नागपुरात येण्यास सांगितले. सिंग मंगळवारी नागपुरात येणार असून, त्याला या गुन्ह्यात अटक केली जाणार असल्याचे धंतोलीचे ठाणेदार प्रसाद सणस यांनी लोकमतला सांगितले.

 

 

Web Title: The alleged chief of the Crime Investigation Agency arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.