भावाकडून प्रेरणा घेत अल्फिया बनली ‘बॉक्सर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:40 AM2018-08-29T00:40:18+5:302018-08-29T00:47:12+5:30

मोठ्या भावाकडून प्रेरणा घेत अल्फिया तरन्नूम बॉक्सर बनली. दोन वर्षांच्या कठोर मेहनतीच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने देशाचा सन्मान उंचावला. फारशी बोलकी नसलेल्या लाजऱ्या अल्फियाने इतरांमध्ये मिसळावे, भावासारखेच खेळाडू बनावे, फिटसेनची कास धरावी म्हणून वडील अक्रम पठाण यांनी तिला बॅडमिंटनकडे वळविले. अल्फियाचे मन मात्र बॉक्सिंगमध्येच लागले होते. २०१६ मध्ये अखेर ग्लव्ज हातात घालायला मिळताच या मुलीने अल्पावधीत भारताच्या ज्युनियर संघात स्थान मिळविले.

Alfiya become 'Boxer' inspired by brother | भावाकडून प्रेरणा घेत अल्फिया बनली ‘बॉक्सर’

भावाकडून प्रेरणा घेत अल्फिया बनली ‘बॉक्सर’

googlenewsNext
ठळक मुद्देपारंपरिक बंधने झुगारून १५ वर्षांच्या मुलीची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेपराष्ट्रीय क्रीडा दिन विशेष

किशोर बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोठ्या भावाकडून प्रेरणा घेत अल्फिया तरन्नूम बॉक्सर बनली. दोन वर्षांच्या कठोर मेहनतीच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने देशाचा सन्मान उंचावला. फारशी बोलकी नसलेल्या लाजऱ्या अल्फियाने इतरांमध्ये मिसळावे, भावासारखेच खेळाडू बनावे, फिटसेनची कास धरावी म्हणून वडील अक्रम पठाण यांनी तिला बॅडमिंटनकडे वळविले. अल्फियाचे मन मात्र बॉक्सिंगमध्येच लागले होते. २०१६ मध्ये अखेर ग्लव्ज हातात घालायला मिळताच या मुलीने अल्पावधीत भारताच्या ज्युनियर संघात स्थान मिळविले.
अल्फियाचा या खेळातील प्रवास फारच रंजक ठरला. नागपूर पोलीसमध्ये कर्मचारी असलेले अक्रम खान पठाण यांनी १५ वर्षांच्या अल्फियाला कधी मुलगी मानलेच नाही. अन्य दोन मुलांप्रमाणे त्यांच्यासाठी अल्फिया मुलगाच आहे. पारंपरिक बंधने झुगारून देशासाठी अल्फियाने देदीप्यमान कामगिरी करावी, यासाठी आपण सदैव पाठीशी असल्याचे अक्रम खान सांगतात.
अनेक अडचणींवर केली मात...
पोलीस म्हणून अक्रम खान यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण ते डगमगले नाहीत. पुरेशी साधने नसताना हार न मानण्याची वृत्ती जोपासली. २००३ ला अल्फियाचा जन्म माझ्यासाठी ‘लकी’ ठरल्याचे ते सांगतात. त्यांनी २०१४ साली अल्फियाला ‘हज’चे दर्शनही घडविले. घरापासून दूर मुलांना सरावासाठी नेण्याचे आणि अभ्यासाकडेही लक्ष देण्याचे काम पतीपत्नीने केले. यातून अल्फिया आणि तिचे दोन्ही भाऊ घडू शकले. मोठा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून दुसरा भाऊ शाकिब राष्ट्रीय दर्जाचा बॉक्सर आहे. तो अकोला येथे डॉ. सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात सराव करतो. युवा राष्ट्रीय स्पर्धा तसेच शालेय राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक विजेता असलेला शाकिब हाच अल्फियाची या खेळातील प्रेरणा आहे. नंदूरबार येथे झालेल्या राज्य शालेय स्पर्धेत भाऊ-बहिणीने सुवर्ण पदक जिंकले होते. तेव्हापासून अल्फियाची कारकीर्द सुवर्णमय ठरत गेली.
लहान वयात मोठे टार्गेट...
अवस्थीनगरात राहणाऱ्याअल्फियाने १३ व्या वर्षी बॉक्सिंग सुरू केले. आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या खेळाडूला ‘नॉक आऊट’ केल्यामुळे अनेकांनी अल्फियाचा धसका घेतला. गोरेवाडा येथील सेंट व्हिन्सेंट पलोटी स्कूलमध्ये दहाव्या वर्गात असलेल्या अल्फियाने सलग तीन राज्य स्पर्धांमध्ये तीन सुवर्णांची कमाई केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर विजयी घोडदौड कायम राखली. यंदा क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘खेलो इंडिया’ बॉक्सिंगमध्ये ८० किलोच्या वरील गटात सुवर्ण जिंकताच तिची रोहतकच्या राष्ट्रीय बॉक्सिंग अकादमीत निवड झाली. येथे दीड महिना प्रशिक्षण घेतल्यानंतर राष्ट्रीय संघातून अल्फियाला कझाकिस्तानमध्ये दोन महिन्यांच्या अ‍ॅडव्हान्स सरावासाठी पाठविण्यात आले होते. अतिशय जिद्दीने आणि जिंकण्याच्या निर्धाराने खेळणाऱ्या अल्फियाने सर्बियातील अरबास येथे झालेल्या ज्युनियर नेशन्स चषकात देशाला रौप्य मिळवून दिले. अल्फियाचे देशासाठी हे पहिले पदक आहे. ‘डावखुरी बॉक्सर’ असलेल्या अल्फियाची वाटचाल पाहून भविष्यात ही खेळाडू देशाला अनेक पदके जिंकून देईल, असे भाकीत राष्ट्रीय सिनियर संघाचे कोच भास्कर भट्ट यांनी वर्तविले. अल्फियाला डाव्या हाताने पंच मारण्याचा चांगला फायदा होतो. प्रतिस्पर्धी बॉक्सरला तिचे डावपेच कळण्याआधीच ती प्रहार करते. अटॅकिंग खेळाडू असल्याने वयाने लहान असली तरी सिनियर खेळाडूंवर ठोशांचा प्रहार करण्यात ती वरचढ ठरते, असे तिचे स्थानिक कोच गणेश पुरोहित आणि अरुण बुटे यांचे मत आहे.
अल्फिया आता राष्ट्रीय स्तरावर सराव करते. रोहतकच्या राष्ट्रीय केंद्रात तिचे वास्तव्य आहे. काही दिवसांसाठी ती नागपुरात आहे. दिवसांतून आठ तास सराव आणि फिटनेसमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगून अल्फिया म्हणाली, ‘दहावीला असले तरी मी अभ्यास आणि सराव यात फरक मानत नाही. टेन्शन न घेता दोन्ही गोष्टींवर भर देणार. माझे करियर बॉक्सिंग आहे. कर्तृत्वाच्या बळावर देशाला गौरव मिळवून देण्याची जिद्द असल्याने कठोर मेहनतीची आपली तयारी असेल. ही तर सुरुवात आहे. यंदा राष्ट्रीय शालेय स्पर्धा, यूथ आणि ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेचे सुवर्ण हे माझे टार्गेट असेल.’
वडिलांची पोलीस खात्यातील नोकरी आणखी चार वर्षे आहे. आई-वडिलांनी आम्हा भावंडांना खेळाडू बनविण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. अपुऱ्या साधनांमध्ये आम्ही वाटचाल करीत आहोत. मुस्लीम समाजातील चालीरिती सांभाळून उज्ज्वल भविष्यासाठी माझा ‘गोल्डन पंच’ नक्की काम करेल, असा विश्वास अल्फियाने व्यक्त केला आहे.

 

Web Title: Alfiya become 'Boxer' inspired by brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.