९७ लाखांची मोसंबी घेतली अन् १५.३५ लाखांचा गंडा घातला

By योगेश पांडे | Published: November 23, 2023 05:42 PM2023-11-23T17:42:43+5:302023-11-23T17:43:03+5:30

राष्ट्रवादीच्या पुर्व नागपूर अध्यक्षाची कळमन्यातील व्यापाऱ्यांकडून फसवणूक : जीवे मारण्याची दिली धमकी

97 lakhs was taken and a deposit of 15.35 lakhs was made | ९७ लाखांची मोसंबी घेतली अन् १५.३५ लाखांचा गंडा घातला

९७ लाखांची मोसंबी घेतली अन् १५.३५ लाखांचा गंडा घातला

नागपूर : ९७ लाखांची मोसंबी घेतल्यानंतर कळमना बाजारातील दोन व्यापारी भावांनी राष्ट्रवादीच्या पुर्व नागपूर अध्यक्षाला १५.३५ लाखांचा गंडा घातला. त्यांनी एजंट म्हणून काम करणाऱ्या संबंधित पदाधिकाऱ्याला दिलेले धनादेश वटलेच नाही व पैसे मागितले असता जीवे मारण्याची धमकी दिली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

रविनिश श्रीनिवास पांडे (४२, नेताजीनगर) असे संबंधित एजंटचे नाव आहे. मा जगदंबा फ्रुट कंपनी ही पांडेची नोंदणीकृत फर्म असून ते कळमना बाजारात कमिशन एजंट म्हणून काम करतात. ते शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव करतात व खरेदी करणाऱ्यांकडून कमिशन घेतात. कळमन्यातील फळ व्यापारी मोहम्मद अमीर रजा (३५) व त्याचा भाऊ मोहम्मद फैजल (३०) यांची ताज मोहम्मद ॲंड सन्स नावाची फर्म आहे. २४ ऑगस्ट २०२० ते २० मार्च २०२१ या कालावधीत दोघांनी पांडेकडून ९७ लाख ६४ हजारांची मोसंबी खरेदी केली व त्याबदल्यात त्यांनी ८२.२८ लाख रुपये दिले. १५.३५ लाख रुपये शिल्लक होते. त्यांनी पांडेला १ मार्च रोजी दीड लाखांचे दोन धनादेश दिले होते. मात्र ते धनादेश वटलेच नाही. बॅंककडून ही बाब पांडेला कळाली. याबाबतीत दोघांनाही विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडे पैसे नाही व तुला जे करायचे आहे ते करून घे. जास्त हुशारी केलीस तर जीवे मारू अशी त्यांनी धमकी दिली. त्यानंतरही पांडेने ते पैसे देतील याची प्रतिक्षा केली. मात्र आरोपी पैसे देण्याचे नावच काढत नसल्याने अखेर पांडेने कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.

अनेक एजंट, शेतकऱ्यांचे कोट्यवधी अडकले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ या दोन भावांनीच नव्हे तर आणखी काही व्यापाऱ्यांनी अनेक शेतकरी व एजंट्सचे कोट्यवधी रुपये अडकवून ठेवले आहेत. हे व्यापारी समोरील व्यक्तीला धनादेश देतात व ज्या दिवशी धनादेश टाकायची वेळ येते तेव्हा बॅंकेला ‘स्टॉप पेमेंट’ची सूचना देतात. एका व्यापाऱ्याच्या मुलाने पांडेप्रमाणेच पैसे मागण्याचा प्रयत्न केला असता त्यालादेखील धमकविण्यात आले. व्यापाऱ्यात नुकसान होईल व माल खरेदी करणार नाही या भितीपोटी शेतकरी व एजंटदेखील गप्प बसतात.

Web Title: 97 lakhs was taken and a deposit of 15.35 lakhs was made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.