७० वर्षाने सुरू झालेल्या शाळेला आता शिक्षकाची प्रतीक्षा; मलकापूरच्या शाळेत शिक्षकच नाहीत

By निशांत वानखेडे | Published: July 19, 2023 06:53 PM2023-07-19T18:53:57+5:302023-07-19T18:54:14+5:30

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर २०१६ साली काटाेल तालुक्यातील आदिवासी बहुल मलकापुरात शिक्षणाची ज्ञानगंगा सुरू झाली.

70 year old school now waiting for a teacher There are no teachers in Malkapur school | ७० वर्षाने सुरू झालेल्या शाळेला आता शिक्षकाची प्रतीक्षा; मलकापूरच्या शाळेत शिक्षकच नाहीत

७० वर्षाने सुरू झालेल्या शाळेला आता शिक्षकाची प्रतीक्षा; मलकापूरच्या शाळेत शिक्षकच नाहीत

googlenewsNext

नागपूर : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर २०१६ साली काटाेल तालुक्यातील आदिवासी बहुल मलकापुरात शिक्षणाची ज्ञानगंगा सुरू झाली. मात्र आता या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकाची प्रतीक्षा आहे. सत्र सुरू झाल्यानंतरही या शाळेत शिक्षकाची नियुक्ती झाली नाही. शिक्षक मिळावा म्हणून ग्रामस्थांना आता अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

उपराजधानीपासून ५० किलाेमीटरवर मालकापूर हे गाव आहे. गावात आदिवासी व भटक्या विमुक्तांची संख्या अधिक आहे. ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर २०१६ साली येथे इमारत बांधून शाळा सुरू करण्यात आली. तेव्हापासून ती नियमित सुरू आहे. मात्र यावर्षी मे महिन्यात शाळेचे पूर्वीचे शिक्षक निवृत्त झाले. तेव्हापासून दुसऱ्याची नियुक्ती न झाल्याने शाळा व विद्यार्थी शिक्षकाविना पाेरके झाले आहेत. या शाळेत सध्या १५ विद्यार्थी आहेत. बहुसंख्य आदिवासी व भारवाड समाजाचे आहेत.
सामाजिक कार्यकर्ते रामदास काेडापे यांनी सांगितले, गावातील ५० पालकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन आधी खंड विकास अधिकारी व नंतर गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षकाच्या नियुक्तीसाठी निवेदन देण्यात आले. बुधवारी या पालकांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली व शिक्षक नियुक्तीची मागणी केली.

जंगल, डाेंगरातून कसा करावा चिमुकल्यांनी प्रवास?
गट शिक्षणाधिकारी यांनी जवळच्या मिनेवाडा गावातील शाळेत मुलांना पाठविण्याची सुचना करीत त्यासाठी प्रवास भत्ता देण्याची हमी दिली. मिनेवाडा हे गाव मलकापूरपासून ६ किमी अंतरावर आहे. हा रस्ता जंगल, डाेंगरातून जाताे. ओढे-नाले ओलांडावे लागतात व वन्यप्राण्यांचाही वावर असताे. अशा रस्त्याने पहिली ते पाचवीपर्यंतच्या चिमुकल्यांनी कसा प्रवास करावा, हा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

शाळा नाही की अद्याप गणवेश नाही
शिक्षक नसल्याने मलकापूरची शाळा बंद पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेशही मिळाले नाही. दरम्यान मिनेवाडा शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलांसह पालकांना त्यांच्या शाळेत बाेलावून पुस्तके वितरित केली पण गणवेश मिळाले नाही. दरराेज शाळेत जाण्यास अडचणी असल्याने या मुलांचे शैक्षणिक नुकसान हाेण्याची शक्यता आहे. माेलमजुरी करणाऱ्या पालकांची वाहन व्यवस्था करण्याचीही स्थिती नाही.

आम्ही माेठ्या कष्टाने ही शाळा सुरू केली हाेती. आता पुन्हा ती बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही लहान मुले दूरच्या शाळेत जंगलातून कसा प्रवास करतील? आदिवासी, भटक्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर करण्याचाच हा प्रकार आहे. शिक्षक नियुक्त करून मुलांचे शिक्षण सुरू करावे, ही विनंती. - रामदास काेडापे, सामाजिक कार्यकर्ता
 

Web Title: 70 year old school now waiting for a teacher There are no teachers in Malkapur school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.