उपराजधानीवर ५० टक्के पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 09:45 AM2018-08-10T09:45:17+5:302018-08-10T09:48:16+5:30

नागपूर जिल्ह्यातील पेंच जलाशयात सध्या फक्त २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्याची वेळ आली आहे.

50 percent water harvesting crisis | उपराजधानीवर ५० टक्के पाणी कपातीचे संकट

उपराजधानीवर ५० टक्के पाणी कपातीचे संकट

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे संकेतपाणी गळती १५ टक्क्यापर्यंत खाली आणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपुरा पाऊस, त्यातच पावसाने दिलेली ओढ आणि मध्य प्रदेशातील चौराई येथे झालेल्या धरणामुळे जिल्ह्यातील पेंच जलाशयात कमी पाणीसाठा आहे. सध्या फक्त २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. याचा विचार करता नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे तर पावसाळ्याच्या उर्वरित दिवसात प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला नाही तर शहराच्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात करावी लागेल, असा धोका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्तविला. यासाठी महापालिकेने वेळीच सावधा होऊन नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
पेंच-तोतलाडोह येथे पाण्याचा अत्यंत कमी साठा असल्याने शहराचे पाण्याचे आरक्षण कमी झाले तर अशा परिस्थितीत महापालिके ने करावयाच्या संभाव्य उपाययोजना संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुुरुवारी
महालातील नगर भवन येथे आढावा बैठक घेतली. यानंतर पालकमंत्री बावनकुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गेल्या पंधरा वर्षात आले नाही असे पाणीसंकट आले आहे. पाणीसाठा कमी असल्याने महापालिकेने पाणी संरक्षण, संवर्धन आणि बचतीचा आराखडा तयार करावा, तसेच शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के गळती असून ती १५ टक्केपर्यंत खाली आणण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. सध्या कन्हानमधून ६५.७१ दशलक्ष घनमीटर, पेंच नवेगावमधून ११२ दलघमी, तात्पुरत्या व्यवस्थेतून ७८ दलघमी पाणीपुरवठा शहराला केला जातो. जलशुद्धीकरण केंद्र कन्हान व पेंच १ ते ४ येथे ७८६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.
यातून ६६५ दशलक्ष लिटर पाण्याची उचल करण्यात येते. सद्यस्थितीत चालू असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये १९८ दशलक्ष लिटर पाणीसाठा होतो. परंतु पेंच-तोतलाडोह येथील पाणीसाठा कमी झाला तर त्याचा पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बैठकीत महापौर नंदा जिचकार,जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, आमदार सुधाकर देशमुख, अनिल सोले, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, कृष्णा खोपडे, डॉ. आशिष देशमुख, प्रा.जोगेंद्र कवाडे, उपमहापौर पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा आदी उपस्थित होते.

मध्य प्रदेश सरकारसोबत चर्चा करणार
पेंच, तोतलाडोहमध्ये कमी जलसाठा असल्यामुळे नागपूर शहरासोबतच कोराडी व खापरखेडा वीज निर्मिती केंद्रालाही पाण्याची टंचाई जाणवणार आहे. तीव्र टंचाई निर्माण झाली तर त्याचा वीजनिर्मितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. याचा विचार करता मध्यप्रदेश शासनाशी चर्चा सुरू आहे. चौराई प्रकल्पात ६५ टक्के जलसाठा आहे. तोतलाडोहमधील संपूर्ण वीज मध्यप्रदेशला देऊन त्याबदल्यात चौराईचे पाणी घेण्याची आपली तयारी आहे. या संदर्भात लवकरच मध्यप्रदेश शासनाशी चर्चा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण जाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितले.

पालकमंत्र्यांची मनपावर नाराजी
शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात गेल्या दीड वर्षापासून महापालिका प्रशासनाला वारंवार सूचना केल्या. त्यानंतरही प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. परंतु आता अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. दोषीवर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.

सतरंजीपुुरा व गांधीबागमध्ये सर्वाधिक गळती
शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के गळती आहे. यात सतरंजीपुरा व गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक ७०टक्के गळती आहे. लक्ष्मीनगरमध्ये २५ टक्के, धरमपेठ ३५ टक्के, हनुमाननगर २५ टक्के, नेहरूनगर ३० टक्के , धंतोली व मंगळवारी झोनमध्ये ५० टक्के , आशिनगर ६५ टक्के, म्हणजेच एकूण पाणीपुरवठ्यापैक ५० टक्के पाणी गळतीत वाया जाते. येत्या दोन महिन्यात १५ टक्के गळतीवर महापालिका आली नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.

पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई
पाऊस कमी होणार हे गृहित धरून व पाण्याची गळती कमी करून, अवैध कनेक्शन बंद करून पाण्याचे नियोजन केले तरच पाणीटंचाईचा सामना करता येईल. शहरात पाच हजार बोअरवेल आहेत. यातील तीन हजार नादुरुस्त आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. प्रत्येकाच्या घरोघरी जा, त्या नागरिकांशी चर्चा करा. त्यांच्या घरातील विहीर हातपंप व अन्य पाण्याचे स्रोत तपासून घ्या. बंद असतील तर सुरू करा, शक्य त्या सर्व उपाययोजना करा. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्यानुसार पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई व शिक्षेची तरतूद आहे. त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

Web Title: 50 percent water harvesting crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी