नागपूर मनपा परिवहन समितीचा २७८.५६ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 08:48 PM2019-06-18T20:48:26+5:302019-06-18T20:55:17+5:30

महापालिकेच्या ‘आपली बस’च्या ताफ्यातील स्टॅन्डर्ड व मिनी बस अशा एकूण ४३१ बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यात येतील. नवीन ५० मिडी बसेस, इलेक्ट्रीकवर धावणाऱ्या पाच तेजस्विनी बसेस, नवीन बस डेपो, दिव्यांगांना व शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत प्रवास सुविधा, बसची माहिती उपलब्ध करण्यासाठी ‘चलो अ‍ॅप’,कॉमन मोबिलिटी कार्ड अशा उपक्रमांचा संकल्प असलेला परिवहन समितीचा २०१९-२० या वर्षाचा २७८.५६ कोटी उत्पन्न व २७८.७१ कोटी खर्चाचा अर्थसंकल्प सभापती बंटी कुकडे यांनी मंगळवारी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांना सादर केला.

278.56 crores budget of Nagpur Municipal Corporation Transport Committee | नागपूर मनपा परिवहन समितीचा २७८.५६ कोटींचा अर्थसंकल्प

मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांना परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी परिवहन विभागाचा अर्थसंकल्प सादर केला. उपस्थितात समितीचे सदस्य.

googlenewsNext
ठळक मुद्देडिझेल बसेस सीएनजीत परिवर्तित करणारकोराडी येथे बस डेपोजीपीएस ट्रॅकवर आधारित ‘चलो अ‍ॅप’दिव्यांग व शहिदांच्या कुटुंबीयांना मोफत प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’च्या ताफ्यातील स्टॅन्डर्ड व मिनी बस अशा एकूण ४३१ बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यात येतील. नवीन ५० मिडी बसेस, इलेक्ट्रीकवर धावणाऱ्या पाच तेजस्विनी बसेस, नवीन बस डेपो, दिव्यांगांना व शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत प्रवास सुविधा, बसची माहिती उपलब्ध करण्यासाठी ‘चलो अ‍ॅप’,कॉमन मोबिलिटी कार्ड अशा उपक्रमांचा संकल्प असलेला परिवहन समितीचा २०१९-२० या वर्षाचा २७८.५६ कोटी उत्पन्न व २७८.७१ कोटी खर्चाचा अर्थसंकल्प सभापती बंटी कुकडे यांनी मंगळवारी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांना सादर केला.
अर्थसंकल्पात ७२ लाख शिल्लक गृहीत धरण्यात आली आहे. गेल्या वर्षात विभागाचे तिकिटापासून उत्पन्न ६५.५० कोटी असून खर्च १४२ कोटी आहे. शासनाकडून अपेक्षित १०८ कोटींचे अनुदान व महापालिकेकडून इस्त्रो खात्यासाठी अपेक्षित ६० कोटी मिळालेले नाही. अर्थसंकल्पात पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त हरित प्रवासाकडे वाटचाल करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात डिझेलवर धावणाऱ्या ४३१ बसेस सीएनजीबध्ये परिवर्तित करण्यात येतील. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार महिलांसाठी इलेक्ट्रीकवर धावणाऱ्या पाच तेजस्विनी बसेस सुरू करण्यात येतील.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त हरित प्रवासाकडे वाटचालीच्या धोरणाला सहकार्य मनपाच्या बसेस सीएनजीमधये परिवर्तिंत करण्याचा मानस कुकडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
वाठोडा येथे मनपाच्या १०.८० एकर जागेवर डिझेल बस ऑपरेटरकरिता जागा विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोराडी मंदिर देवस्थानाजवळ २० हजार वर्गमीटर जागेमध्ये नासुप्र व एनएमआरडीए यांच्यातर्फे नवीन बसडेपो विकसित केला जाणार आहे.
इलेक्ट्रीक बस प्रकल्पांतर्गत चार्जिंग स्टेशन निर्माण करून सौर ऊर्जेद्वारे विद्युत निर्मिती करण्यात येणार आहे व त्याद्वारे वीज निर्मितीचा वापर इलेक्ट्रीक बस चार्ज करण्याकरिता करण्यात येईल. सौर ऊर्जेद्वारे विद्युत निर्मितीसाठी अर्थसंकल्पात तीन कोटीची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘चलो अ‍ॅप’मुळे स्मार्ट प्रवास
शहरात सेवा देणाऱ्या शहर बसेस, त्यांचे वेळापत्रक, प्रत्येक बसची मार्गनिहाय, थांब्यानुसार, वेळेनुसार विशिष्ट माहिती, प्रत्येक थांब्याला लागणारे भाडे याची सविस्तर माहिती प्रवाशांना मिळावी यासाठी आधुनिक जी.पी.एस. ट्रॅकवर आधारित नि:शुल्क ‘चलो अ‍ॅप’ लवकरच कार्यान्वित होत आहे. मोबाईलवर ई-तिकीट सेवा सुरू केली जाणार आहे. लवकरच आपली बसचा प्रवास स्मार्ट होईल असा विश्वास कुक डे यांनी व्यक्त केला.
बसथांब्यावर शुद्धपाणी
शहरातील नागरिकांना माफक दरात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शहर बसथांब्याजवळ वॉटर एटीएमची उभारणी केली जाणार आहे. नंदनवन येथील के.डी.के. महाविद्यालयाजवळ अशा वॉटर एटीएमची उभारणी करण्यात आली आहे. असेच एटीएम शहरात गर्दीच्या व आवश्यक ठिकाणी उभारणीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात दोन कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
कॉमन मोबिलिटी कार्डची सुविधा
शहरात मेट्रो रेल्वेचे संचालन लवकरच विस्तृत प्रमाणात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना शहर बस आणि मेट्रो असे दोन्ही वाहतुकीचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. दोन्ही माध्यमाद्वारे प्रवास करणाºया प्रवाशांना कॉमन मोबिलिटी कार्ड उपलब्ध केले जाणार आहे. यामुळे शहरातील प्रवाशांचा शहर बस आणि मेट्रोचा प्रवास सुकर होईल.
ई-टॉयलेटची सुविधा
स्वच्छ भारत योजनेंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर शहरातील प्रमुख बसथांब्यालगत वापरात नसलेल्या भंगार बसेसच्या माध्यमातून ई-टॉयलेटची निर्मिती करण्यात येणार आहे. याद्वारे महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे ‘बायोबस टॉयलेट’ तयार करून उपलब्ध केले जाणार आहे.
शहीद कुटुंबातील महिलांसाठी ‘मी जिजाऊ’
शहरातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मनपातर्फे ‘मी जिजाऊ’ ही सन्मानजनक योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शहीद जवानांच्या कुटुंबीयांना कार्ड प्रदान करण्यात येणार आहे. या कार्डवर शहीद कुटुंबातील पत्नी, आई, बहीण यापैकी कुणाही एकाला मोफत प्रवास सेवा दिली जाणार आहे.

 

 

Web Title: 278.56 crores budget of Nagpur Municipal Corporation Transport Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.