ब्रेक

By admin | Published: April 19, 2017 03:16 PM2017-04-19T15:16:34+5:302017-04-19T15:42:19+5:30

हेल्मेट कशाला?जवळच तर जायचंय.चालवली गाडी जोरात,त्यानं काय होतंय.गाडीवर कण्ट्रोल आहे आपला!

Break | ब्रेक

ब्रेक

Next

- डॉ. रश्मी करंदीकर


हेल्मेट कशाला?
जवळच तर जायचंय.
चालवली गाडी जोरात,
त्यानं काय होतंय.
गाडीवर कण्ट्रोल आहे आपला!
थोडी स्टाइल मारली,
मान वाकडी करून
बोललं फोनवर गाडी चालवताना,
तर काय होतं,
चालतंय.
- असं वाटतं तुम्हाला?
मग तुम्ही धोक्यात आहात !

पूर्वी साधारणत: नोकरी लागल्यावर पहिल्या पगारामधून किंवा नोकरी लागल्यानंतर स्वत:च्या पगारातले पैसे साठवून वर्षभरात दुचाकी घेतली जाई. साधारणत: २२ व्या वर्षी मुलं आपली पहिली गाडी घेत. पण आता दहावी झाल्या झाल्या अकरावीमध्ये किंवा दहावीतच काही पालक आपल्या मुलांना दुचाकी घेऊन देतात. इतकंच नाही तर उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू लोकांमध्ये चारचाकीही घेऊन दिली जाते. त्यामुळे गाडी हातामध्ये येण्याचं वय साहजिकच कमी झालेलं आहे. चारचाकी शिकण्यासाठी आपल्याकडे खास ट्रेनिंग स्कूल्स तरी आहेत पण दुचाकीसाठी अशी कोणतीही व्यवस्था नाही. दुचाकी शिकण्यासाठी विशेष शिक्षण घेणं कोणालाही फारसं महत्त्वाचं किंवा आवश्यक वाटत नाही. सातवी-आठवीतली मुलं आपल्या एखाद्या मोठ्या भावाकडून किंवा मोठ्या मित्राकडून दुचाकी कशी चालवायची हे शिकतात. हे शिकणंसुद्धा सुरक्षा नियम, उत्तम ड्रायव्हिंग कौशल्य शिकवणारं नसतं तर केवळ बॅलन्स सांभाळणं इतपतच ते मर्यादित असतं. थोडक्यात ट्रायल अँड एरर अशा पद्धतीनं हे दुचाकी शिक्षण चालतं. हेल्मेट, सीटबेल्टचं महत्त्व असं काहीही यामध्ये शिकवलं जात नाही. मग हीच मुलं गाडी थोडी यायला लागली की सरळ रस्त्यावर चालवू लागतात आणि मग पुढचे अपघात होतात.
मुलांच्या गाडी शिकण्याबरोबर त्यांच्या सुरक्षिततेमध्ये महत्त्वाची भूमिका असते ती खरंतर त्यांच्या पालकांची. बहुतांश पालकांना आपला मुलगा गाडी कुठं व कधी घेऊन जातो हेसुद्धा माहिती नसतं. अपघात झाल्यावर किंवा नियम मोडल्यावर किती दंड झाला ते सांगा, आम्ही भरतो, त्याला (मुलाला) काहीही बोलू नका, असं पालक सर्रास सांगतात. आम्हाला काही फरक पडत नाही अशी भूमिका पालकांनीच घेतली तर नव्या पिढीतली मुलं नियमांचं पालन करायला कधी शिकणार हा मोठा प्रश्नच आहे. मध्यंतरी नियम मोडणाऱ्या एका मुलाला पकडल्यावर व्यवसायानं वकील असणारी त्याची आई त्याच्यासाठी दंड भरायला आली. किती दंड तो सांगा आणि लवकर मोकळं करा असा त्यांचा एकूण मूड होता. पण सुरक्षितततेच्या नियमांचं महत्त्व किंवा आपल्या मुलानं केलेल्या चुकीबद्दल पोलिसांशी बोलणं, त्याला समजावणं असं काहीही त्यांना महत्त्वाचं वाटलं नाही. शेवटी त्यांना थेट आणि स्पष्टच विचारलं की, तुमचा हा एकुलता एक मुलगा अपघातात गेला किंवा त्याला अपंगत्व आलं तर किती मोठं नुकसान होईल याचा तुम्ही कधी विचार केलाय का? 
हे ऐकून मग त्या वकीलबाई थोड्या विचारात पडल्या आणि त्यानंतर त्यांना त्यांची व मुलाची चूक उमगली. दंड भरून आपण तात्पुरत्या परिस्थितीतून पळवाट काढू शकतो; पण त्यामुळे अपघात कमी होतील असं नाही. आणि आपल्यासह दुसऱ्यांच्या जिवाचं मोल आपल्याला कळेल असंही नाही.
त्यात कॉलेजमध्ये शिकत असताना अनेक तरुण मुलांना मुलींसमोर आपली पत वाढवण्यासाठी, थोडक्यात भाव खाण्यासाठी, स्टाइल मारत गाडी चालवायची असते. त्यांच्या डोळ्यासमोर धूमसारख्या चित्रपटात भरधाव वेगाने गाड्या चालवणारे हिरो असतात. किंवा त्यांच्यातलाच कुणी भरधाव गाडी चालवणारा मित्र त्यांना आदर्श म्हणून असतो. त्यामुळे गाडी चालवण्याची क्रेझ वाढीस लागते. 
आम्ही तरुणांना सुरक्षिततेचे नियम शिकवण्यासाठी विशेष कार्यशाळा घ्यायचो. त्या कार्यशाळांत मुलींना विचारायचो की, सीटबेल्ट न लावणारा, हेल्मेट न घालणारा आणि स्वत:चीच काळजी न घेणारा मुलगा तुम्हाला आवडेल का? 
आणि मग समजावून सांगायचो की जर एखादा मुलगा स्वत:चंच संरक्षण करत नसेल तर त्यासोबत तुम्ही कशा सुरक्षित राहाल? तेव्हा या मुलींना विषयाचं गांभीर्य समजत असे. जवळच तर जायचंय, दूध आणायला तर जायचंय, त्यासाठी कशाला हेल्मेट, सकाळी कोण येणारेय अपघात करायला असा विचार बहुतेक तरुण करतात. तो अत्यंत धोकादायक आहे. अपघात कधीही आणि कोणत्याही स्वरूपात कोणाच्याही हातून होऊ शकतो.
कॉलेजमध्ये शिकतानाचं वय हे धुंदीचं असतं. काहीतरी नवं करून पाहण्याच्या विचारामध्ये नशेत गाड्या चालवल्या जातात. सुसाट गाडी चालवण्यात थ्रिल वाटू लागतं. तसं केल्यामुळे मुलं स्वत: माचोमॅन मानायला लागतात. ही मुलं मोबाइल गेम खेळणारी असतात. त्यामध्ये बटण दाबलं की वेग वाढतो. पुढच्या लेव्हलला जाता येतं. तसाच काहीसा विचार गाडी चालवतानाही केला जातो. अ‍ॅक्सीलेटर वाढवून वेग वाढवायचा असाच सोपा विचार ही मुलं करतात. गाड्या अशा धुंद चालवण्यामुळे स्वत:चा जीव धोक्यात जातोच, त्याहून दुसऱ्या व्यक्तीलाही अपघातामध्ये जीव गमवावा लागतो किंवा अपंगत्व येऊ शकतं. त्या व्यक्तीचं कुटुंब उघड्यावर पडू शकतं. असं करण्याचा कोणताही अधिकार आपल्याला नाही. 
आपल्या देशात दुचाकी आणि चारचाकी चालवणाऱ्यांबरोबर मोठी संख्या आहे ती ट्रक ड्रायव्हर्सची. ट्रक चालवणारे हे मुख्यत्वे अशिक्षित असतात. त्यांना नियमांचं शिक्षण देण्यासाठी विशेष स्कूल्स स्थापन करायला हवेत. त्यांच्या डोळ्यांची तपासणी, फिटनेस यांचीही चाचणी वेळोवेळी व्हायला हवी. त्यांनी दिवसभरात किती तास ट्रक चालवायचा याचेही नियम तयार करायला हवेत. ट्रक चालवणाऱ्यांना विश्रांतीचे थांबे ठिकठिकाणी देऊन तेथे नाममात्र शुल्कामध्ये विश्रांती आणि जेवणाची सोय केली तर त्यामुळेही अपघात कमी होतील. ट्रकच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची बाब म्हणजे सळईची वाहतूक करणारे ट्रक. या सळईच्या ट्रकमुळेही मोठे व भीषण अपघात होतात. त्यांच्यासाठी कडक नियम तयार करायला हवेत. नियमांचे गांभीर्य वाढवायचे असेल तर मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या अप्रायजलमध्ये याचा समावेश करावा. जर तुम्ही हेल्मेट, सीटबेल्ट वापरत असाल तर तुम्हाला इतके गुण असा कॉलमच करावा म्हणजे त्याला महत्त्व येईल व कर्मचाऱ्यांचे संरक्षणही होईल. 
शिस्त आणि नियमांचं महत्त्व हे वयाच्या १४ ते २० या वयोगटामध्येच चांगल्या प्रकारे समजू शकते. तिशीनंतर सवयी बदलणं फारच कठीण असतं. त्यामुळे याच वयामध्ये चांगल्या सवयी शिकवणं गरजेचं आहे. आपल्याकडे पर्यावरणाचा समावेश मूल्यशिक्षणामध्ये केल्यानंतर गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये जागरूकता निर्माण झाली. तसंच रस्ते सुरक्षेच्या शिक्षणाचंही करता येईल. वाहतुकीचे नियमही शाळेत चौथी किंवा पहिलीपासून थोडे थोडे शिकवायला हवेत. हेल्मेट न घालता गाडी चालवल्यावर काय होईल, दारू पिऊन चालवल्यावर काय होईल याचा त्यांना अंदाज येण्यासाठी शिक्षण द्यायला हवं. 
आम्ही यामध्ये मुलांकडून पालकांकडे अशीही शिकवण्याची पद्धती आणली होती. आपले पालक वाहन चालवताना कोणत्या चुका करतात याचं निरीक्षण मुलांना करायला सांगितलं होतं. त्यानंतर आलेला अनुभव खराच मजेशीर पण विचार करायला लावणारा होता. कित्येक मुलं अत्यंत निरागसपणे येऊन सांगत, आज माझे बाबा हेल्मेट न घालता आॅफिसमध्ये जात होते पण त्यांना मी हेल्मेट न्यायला सांगितलं, काल माझी आई रिक्षावाल्याला वेगानं चालवायला सांगत होती, शेजारचे काका गाडीतून हात बाहेर काढून चालवत होते अशी अनेक उदाहरणे मुले देऊ लागली. म्हणजेच मुलांना हे शिक्षण दिलं तर ते विचार करतात आणि त्याचा वापरही करतात. 
देशातील ७८ टक्के रस्ते अपघात हे चालवणाऱ्यांच्या चुकांमुळे होतात याची जाणीव मुलांना करून द्यायला हवी. जपानमध्ये अपघातांची संख्या वाढल्याचं लक्षात आल्यावर त्यांची संख्या कमी करण्यासाठी वीस वर्षांचा कार्यक्रम आखण्यात आला पण त्यांनी पाचच वर्षांमध्ये लक्ष्य पूर्ण केलं. आपल्यासाठीही हे फार अवघड नाही.
ठाण्याचा प्रयोग
ठाण्यामध्ये आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विशेष प्रयत्नांमुळे वाहतुकीचे नियम शिकवणारं विशेष केंद्र तयार होत आहे. या केंद्रामध्ये चार वर्षांपासून चाळिशीतल्या माणसापर्यंत सर्वांना प्रशिक्षण देण्यात येईल. केवळ वाहन चालवणं नाही, तर सुरक्षिततेच्या नियमांमध्ये शिकवले जातील. कार्टून, छोटा भीमचा वापर करून त्यांना नियम शिकवले जातील. १३ वर्षांच्या मुलांसाठी विशेष बाइकही आणण्यात येईल. ही बाइक चालवण्यासाठी त्यांना विशेष कोर्स पूर्ण करावा लागेल. अशा विविध आकर्षक गोष्टींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. कोर्सेस पूर्ण करणाऱ्या मुलांना विशेष प्रमाणपत्रेही दिली जातील.
इफ यू लव्ह मी, वेअर धिस !
मध्यतंरी एकदा माझ्या कार्यालयामध्ये अचानक एक पालक आले आणि एकदम रडायला लागले. आज मी आॅफिसला जाताना माझी मुलगी हेल्मेट घेऊन आली आणि ‘इफ यू लव मी, वेअर धिस’ असं म्हणाली. तिला हे सगळं कसं समजलं याची चौकशी केल्यावर तिच्या शाळेत तुम्ही चालवलेल्या मोहिमेमुळे हेल्मेटचं महत्त्व तिला समजल्याचं कळालं, असं ते म्हणाले. मुलीच्या एका वाक्यामुळे ते बाबा रोज हेल्मेट वापरायला लागले. अशा लहान लहान शिकवणीतून आपण शिस्त अंगी बाणवू शकू.

- पोलीस उपआयुक्त,
ठाणे शहर
(शब्दांकन- ओंकार करंबेळकर)

थ्रिल नेमकं कशात?
- शोधा !

वयात येणाऱ्या मुलांना थ्रिलचं आकर्षण असतंच. या वयात मेंदूत स्त्रवणारी संप्रेरकं थ्रिलमुळे अधिक उत्तेजित होतात. त्यामुळे एकदा थ्रिलची किक बसली की ती पुन:पुन्हा हवीशी वाटते. त्यांची तीव्रता वाढवावीशी वाटते.
काहीतरी नवं करुन पाहावं असं या वयात नेहमीच वाटत असतं. तसेच या वयात जे काही बरंवाईट होईल ते आपल्या बाबतीत होणार नाही, दुसऱ्याच्या बाबतीत होईल असं वाटतं. तरुण मुलांमध्ये टेस्टोस्टोरॉनही अधिक असतं. त्यामुळे स्वभाव आक्रमक असतो, उत्तेजक भावनांवर नियंत्रण मिळवणं अवघड असतं. त्यामुळे नवं काहीतरी म्हणजे वाहन चालवणं, वेगाने चालवणं, नशा करणं, दारू पिऊन पाहणं असे प्रयोग केले जातात. त्यांचं व्यसनही लागतं. याच वयात त्यांना या सर्वांचे परिणाम किती वाईट आहेत हे सांगण्याची गरज असते. अपघात हे केवळ गाड्यांच्या तांत्रिक मर्यादेवर अवलंबून नाहीत, तर ते सामाजिक, कौटुंबिक व मानसिक पातळीवरच्या प्रश्नांना सोडवून कमी करता येतील.
त्यासाठी तरुण मुलांनी आपलं थ्रिल कशात हे समजून घेतलं पाहिजे.
- डॉ. प्रथमेश कुलकर्णी, 
मानसोपचारतज्ज्ञ


नियम तोडाल,तर कडक शिक्षा


अलीकडेच लोकसभेत मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं. राजस्थानचे वाहतूकमंत्री युनूस खान यांच्या अध्यक्षतेखाली देशातील १८ राज्यांच्या वाहतूकमंत्र्यांचा मंत्रिगट स्थापन करण्यात आला होता. या गटानं विधेयकात दुरुस्ती सुचवली. या सूचनांचा या विधेयकामध्ये समावेश करण्यात आला आहे. या कायद्यात अनेक बदल करण्यात आले असून, कडक शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. 
गाडीला हात लावण्यापूर्वी जरा ही माहिती जवळ असू द्या.

१. पालकांच्या नावावर असलेले वाहन त्यांच्या अल्पवयीन अपत्याने चालवून अपघात केल्यास पालकांना जबाबदार धरून त्याबद्दल त्यांना तीन वर्षांची कैद व २५ हजार रु पये दंड, त्याशिवाय संबंधित वाहनाची नोंदणी कायमसाठी रद्द करण्याची नवी तरतूद.

२. सुधारित कायद्याच्या तरतुदींमध्ये हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात दोन लाख रु पये भरपाई देणं व अपघातात मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्याचा समावेश आहे. विविध प्रकारच्या वाहतूक गुन्ह्यांसाठी जे दंड सुचविलेले आहेत त्याच्या दसपट दंड आकारण्याची मुभाही राज्य सरकारांना देण्याची तरतूद आहे. 
३. परिवहन विभागाकडून अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी सुधारित कायद्यात ई-गव्हर्नन्सवर भर देण्यात आला आहे. त्यानुसार शिकाऊ वाहन परवाना आॅनलाइन मिळेल, वाहन परवान्यांची मुदत अधिक केली जाईल व परिवहन परवान्यासाठी शिक्षणाची कोणतीही किमान अट असणार नाही.
४. विनापरवाना वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड.
दारू पिऊन वाहन चालवल्यास दहा हजार रुपये दंड.
सीटबेल्ट न लावल्यास एक हजार रुपये दंड.
हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपये दंड. 

बेदरकार वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड.
विनाविमा गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड.
रु ग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब अशा आपत्कालीन वाहनांना रस्त्यात वाट करून न देणाऱ्या वाहनचालकास दहा हजार रु पयांचा दंड होईल. याशिवाय तीन महिने लायसन्स स्थगितही होऊ शकतं.

Web Title: Break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.