सत्यनारायण नुवाल चेअरमन, सोलर ग्रुप, नागपूर

शून्यातून उभी राहिली यशोगाथा
 
पैसे वाचविण्यासाठी बल्लारपूरच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनेक रात्री काढणारा तरुण देशातील सर्वात मोठा स्फोटक उत्पादक समूहाचा सर्वेसर्वा बनतो... सत्यनारायण नुवाल यांनी घेतलेली ही झेप थक्क करणारी आहे. गरिबीतून वर आलेल्या नुवाल यांनी स्वत:च्या कष्टाने सोलर समूहाला आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील प्रस्थापित केले. सुरक्षितता, गुणवत्ता आणि पर्यावरण रक्षण हा सत्यनारायण नुवाल यांचा मूलमंत्र आहे. एक काळ होता जेव्हा हातावर पोट घेऊन जगणारे सत्यनारायण नुवाल पडेल ते काम करण्यासाठी तयार होते. कधी त्यांनी विहिरी खणण्याचा व्यवसाय केला, तर कधी चक्क वेस्टर्न कोल फिल्ड्स येथे ठेकेदारांसाठी बांधकाम साहित्य वाहून नेण्याचे काम केले. पण जिद्द कधी हारली नाही. खाणउद्योग व पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना औद्योगिक स्फोटकांचा पुरवठा करणारा सोलर समूह देशातील सर्वात मोठा स्फोटक उत्पादक आहे. कंपनीची उलाढाल १५०० कोटींच्या घरात असून, त्यांनी एका वर्षात ३०० कोटींचा नफा मिळवलेला आहे. २० पेक्षा अधिक देशांना त्यांच्या समूहाकडून माल निर्यात करण्यात येतो. नायजेरिया, झांबिया व तुर्की या देशांत या समूहाने कारखानेदेखील टाकले आहेत. विस्फोटकांची गुणवत्ता सांभाळत असताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याबाबतदेखील नुवाल नेहमी दक्ष असतात.
 
 
संदीप पिसाळकर
देशविदेशी विख्यात शिल्पकार 
सामान्य कुटुंबातील मुलगा ते आंतरराष्ट्रीय चित्र-शिल्पकार अशी विलक्षण झेप. शिवाय उदयोन्मुख कलाकारांचा ‘युवा’ मार्गदर्शक, बहुआयामी कलाकार असा चित्र-शिल्पकलेतील ‘प्रेरणादायी’ प्रवास. संदीप पिसाळकर मूळचे यवतमाळचे. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथेच झाले. घरची परिस्थिती सर्वसामान्य. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड. या आवडीमुळेच त्यांनी चित्रकलेतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. बारावीनंतर अमरावती व नागपूर येथे त्यांनी चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील विख्यात सर जे. जे. स्कूल आॅफ आर्टमधून २००५ मध्ये व २००६ मध्ये गुलबर्गा येथील एम. एम. के. कॉलेजमधून बॅचलर आॅफ फाइन आर्ट ही पदवी घेतली. २००८ मध्ये वडोदरा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून त्यांनी मास्टर आॅफ व्हिज्युअल आर्ट ही पदवी घेतली. चित्रकलेबरोबर शिल्पकलेत त्यांनी मोठे काम केले आहे. चित्रकलेचे शिक्षण घेत असल्यापासून त्यांनी विविध प्रदर्शनांत भाग घेतला आहे. ३० पेक्षा अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये त्यांच्या कलाकृती गाजल्या आहेत. २००९ मध्ये अमेरिकेतील साराटोगा व २०१० मध्ये वधेरा आर्ट गॅलरी दिल्ली येथे त्यांच्या कलाकृतींची सोलो प्रदर्शने झाली आहेत. पिसाळकर यांच्या कलाकृतींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. देशातील अनेक नामांकित कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांंना ते मार्गदर्शन करतात.
 
सचिन कुर्वे
गतिमान प्रशासन
 
एखाद्या किरकोळ प्रमाणपत्रासाठीसुद्धा नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागतात. महिनोंमहिने कामे होत नाहीत. एकेक त्रुटी दाखवून काम लांबणीवर टाकले जाते. अशा कालहरणापायी त्रस्त व्हावे लागणे हा सर्वसामान्यांचा नेहमीचा अनुभव. पण सचिन कुर्वे यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नागपूरमधील हे चित्र बदलले. सचिन कुर्वे यांनी घेतलेला पुढाकार आणि राबविलेल्या अभियानामुळे जिल्हाधिकारी कार्यालय गतिशील बनले आहे. त्यांनी एसएमएस सेवेला सुरुवात केली. या सेवेअंतर्गत सेतू कार्यालयात विविध प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या नागरिकांकडून त्यांचा मोबाइल क्रमांक घेतला जातो. त्याने अर्ज सादर केल्यानंतर अर्जातील त्रुटींची माहिती एसएमएसद्वारे दिली जाते. त्यामुळे संबंधितांना लगेच त्रुटी पूर्ण करता येणे शक्य झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना एकेक दिवस निश्चित करून दिला असून, त्या-त्या दिवशी उपजिल्हाधिकारी सेतू कार्यालयात बसतात आणि प्रमाणपत्रांवर स्वाक्षऱ्या करतात. 
प्रमाणपत्र जास्तीत जास्त सात दिवसांत तयार व्हावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले, तरी एसएमएस सुविधेमुळे दोनच दिवसांत नागरिकांना प्रमाणपत्र मिळू लागले आहे. म्यूटेशनसाठी सिटी सर्व्हे कार्यालयात नागरिकांची होणारी लूट लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सेतू कार्यालयामध्ये म्यूटेशनची सुविधा उपलब्ध करून दिली. 
साठेबाजांवर त्यांनी बडगा उगारला. डाळ, डाळबिया, खाद्यतेल यांच्या भाववाढीवर आळा बसावा यादृष्टीने साठेबाजांवर नियंत्रण आणले.
 
डॉ. मुफ्फझल लकडावाला
रुग्णांचे आशास्थान
 
५०० किलो वजनाची जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमान अहमदवर उपचारासाठी पुढाकार घेतल्याने जगभर वेगळी ओळख. अतिस्थूलतेने ग्रासलेल्या जगभरातील रुग्णांचे आशास्थान बनलेले डॉक्टर. शांत, हसतमुख चेहऱ्याचे डॉ. मुफ्फझल लकडावाला अनेक लठ्ठ व्यक्तींसाठी देवदूत ठरतात. जगातील सर्वांत वजनदार असणाऱ्या इमान अहमदचे वजन कमी करण्यासाठी त्यांनी मुंबईतील सैफी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरूकेले. डॉ. लकडावाला यांचा जन्म मुंबईत झाला. मास्टर्सपर्यंतचे शिक्षण त्यांनी मुंबईतच पूर्ण केले आहे. गॅ्रण्ट मेडिकल महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नायर वैद्यकीय महाविद्यालयातून मास्टर्स इन सर्जरीचे (एमएस) शिक्षण पूर्ण केले. मुंबईतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर २००४ मध्ये त्यांनी कोरियात प्रो. सिआॅन हान कीम यांच्याकडून लेप्रोस्कोपिक कोलोरॅक्टल सर्जरीचे प्रशिक्षण घेतले. २००५ मध्ये बेल्जियम युनिव्हर्सिटी आॅफ घेंट हॉस्पिटलमध्ये डॉ. पीट पॅटयन यांच्याकडून गॅस्ट्रो सर्जरी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर २००६ मध्ये त्यांनी युनायटेड स्टेट्समधून बेरिअ‍ॅट्रिक सर्जरीचे शिक्षण घेतले. मुंबईत त्यांनी ‘सेंटर फॉर ओबेसिटी अ‍ॅण्ड डायजेस्टिव सर्जरी’ची सुरुवात केली. सैफी रुग्णालयात मिनिमल एक्सेस आणि बेरिअ‍ॅट्रिक सर्जरी विभागाचे ते अध्यक्ष आहेत. युनायटेड स्टेट्समधील सर्जिकल रिव्ह्यू कॉर्पोरेशन (एसआरसी) तर्फे जागतिक पातळीवर उत्तम सेंटर म्हणून डॉ. लकडावाला यांना गौरविण्यात आले. २००७ मध्ये त्यांना आॅल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनतर्फे ‘ह्युमिनिट्रीएन आॅफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १९९६ मध्ये त्यांना शिरीन मेहताजी आॅरशनतर्फे ‘आॅबस्ट्रक्टिव्ह जॉडिंस’साठी रौप्यपदक बहाल करण्यात आले होते.
 
 
 
रेश्मा अनिल माने
कोल्हापूरच्या मातीतली दंगल
 
‘दंगल’ चित्रपटाच्या वेळी कुस्तीचा बाज समजून घेण्यासाठी आमीर खान ज्या कोल्हापुरात गेला होता, तिथल्या लाल मातीनेही शेतकऱ्याची मुलगी ते आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असा एक लोकविलक्षण प्रवास जवळून अनुभवला आहे. तीच तर रेश्मा मानेची गोष्ट. सरावासाठी रेश्माने मुलांबरोबर दोन हात केले. गावातील जत्रेच्या फडात कुस्त्या जिंकणारी रेश्मा आज आंतरराष्ट्रीय मैदाने गाजवीत आहे. ऐपत नसतानाही रेश्माच्या सरावात खंड पडू नये यासाठी तिच्या कुटुंबीयांनी तिला घरातच आखाडा बांधून दिला. वडणगेसारख्या खेडेगावात एक कुटुंब मुलीला कुस्तीपटू बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. रेश्माचा जन्म शेतकरी कुटुंबातला. आई-वडील शेतकरी. वयाच्या सहाव्या वर्षापासून रेश्मा कुस्तीशी जोडली गेली. वयाच्या आठव्या वर्षी रेश्माने प्रत्यक्ष कुस्तीत पदार्पण केले. यानंतर पदके जिंकण्याचा तिने सपाटाच सुरू केला, तो आजतागायत सुरू आहे. तिने सिंगापूर येथे झालेल्या कॉमनवेल्थ वरिष्ठ महिलांच्या फ्री स्टाइलमध्ये ६३ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. अशी कामगिरी करणारी ती महाराष्ट्राची एकमेव महिला कुस्तीगीर ठरली. २०१६ मध्ये रेश्माने आॅल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेतील कांस्यपदकासह अनेक सन्मान जिंकले. आजपर्यंत रेश्माने २५ पेक्षा जास्त सुवर्णपदके मिळवली आहेत. ‘आॅलिम्पिक’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक पटकावणे हे रेश्माचे ‘लक्ष्य’ आहे.
 
 
अशोक हांडे
काळाच्या पटलावरची मंगलवाणी
 
अशोक हांडे, काळ जिवंत करणारा कलावंत. आॅर्केस्ट्राच्या जमान्यात स्वत:ची वेगळी छाप टाकत थीम बेस कार्यक्रमांची सुरुवात करणारा, देशभक्तीसारखा विषय मनोरंजक पद्धतीने मांडून तरुणांमध्ये देशाप्रती स्फुलिंग चेतविणारा, मराठी भाषेचा अभिमान मराठी बाण्याने सांगणारा अवलिया कलावंत. मु. पो. उंब्रज, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे अशोक हांडे यांचा जन्म झाला. अत्यंत गरीब कुटुंब, घरी कोरडवाहू शेती, पण वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यामुळे भजन, भारुड, जात्यावरच्या ओव्या याचे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यावर झाले. पुढे ते शालेय जीवनात मुंबईत आले. तेथे त्यांच्यातल्या लोककलेचा पिंड जोपासला गेला आणि निर्माता, लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, कलादिग्दर्शक, गायक आणि सूत्रसंचालक अशा विविधांगी रूपातून त्यांच्यातला खराखुरा परफॉर्मर विकसित झाला. 
ज्या काळात आॅर्केस्ट्राचे पेव फुटले होते त्याकाळी स्वत:ची वेगळी छाप टाकत मंगलगाणी-दंगलगाणी नावाचा कार्यक्रम त्यांनी सादर केला आणि त्यांना प्रेक्षकांची नस सापडली. या कार्यक्रमाचे १९९७ प्रयोग झाले. त्यानंतरच्या ‘आवाज की दुनिया’चे जगभरात १६०० प्रयोग झाले. ‘आजादी ५०’, ‘गाने सुहाने’, ‘माणिक मोती’, ‘आपली आवड’, ‘मनचाहे गीत’, लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित अमृतलता अशा अनेकविध सांगीतिक कार्यक्रमाचे जवळपास नऊ हजार प्रयोग अशोक हांडे यांनी केले आहेत. हा एक अनोखा विक्रम आहे.
 
 
 
सुकन्या कुलकर्णी-मोने
रसिकमनावर अधिराज्य
 
नाटक, चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकेतून आपल्या अभिनयकौशल्याने रसिकमने जिंकणारी सुकन्या कुलकर्णी-मोने म्हणजे कडक शिस्तीचे एक आगळेवेगळे रसायन. अशाच तिच्या स्वभावातील अंतरंगात डोकावणारं नाटक ‘सेल्फी’. या नाटकात तिने स्वाती कवठेकर ही भूमिका साकारली. वेगवेगळ्या स्वभावाच्या पाच मैत्रिणी रेल्वे स्टेशनवरील वेटिंगरूममध्ये भेटतात आणि तिथेच हे नाटक जन्माला येतं. त्या मैत्रिणींचं भावविश्व मांडणाऱ्यांपैकी नर्स असूनही शिक्षिकेची कडक शिस्त असणाऱ्या स्वाती कवठेकरनं रसिकांवर राज्य केलं. गुरू सुचेता भिडे-चापेकर यांच्याकडे भरतनाट्यम् शिकत असताना ‘दुर्गा झाली गौरी’ या ‘आविष्कार’च्या नाटकाद्वारे सुकन्या कुलकर्णी यांनी रंगमंचावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘झुलवा’ आलं. वामन केंद्रे यांचं दिग्दर्शन असलेलं हे नाटक बरंच गाजलं. या नाटकातल्या अप्रतिम अभिनयासाठी सुकन्याला अनेक पारितोषिकं मिळाली. ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकानंही पुढे इतिहास घडवला. कश्मकश, शांती, महानगर अशा मालिकांमधून आणि ईश्वर, एकापेक्षा एक, वारसा लक्ष्मीचा, सरकारनामा अशा चित्रपटांमधून त्यांचा सहजसुंदर अभिनय दिसून आला. सरकारनामा आणि वारसा लक्ष्मीचा या चित्रपटांसाठी सुकन्याला फिल्मफेअर पारितोषिकंही मिळाली. ‘फॅमिली ड्रामा’ या नाटकाद्वारे बऱ्याच काळानंतर सुकन्यानं व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन केलं. त्यातील सुमती करमरकर ही भूमिका खूपच गाजली. आता ‘सेल्फी’तूनही त्या स्वाती कवठेकरच्या रूपाने कडक शिस्तीचं महत्त्व सांगताहेत. 
त्यांची ही भूमिकाही रसिकांनी उचलून धरली आहे.
 
 
फिरोज खान
रंगमंचीय आविष्कार 
 
 
सिनेरसिकांना मोहित करणारी प्रेमकथा असलेला ‘मुगल ए आजम’ सिनेमा. १९६० च्या दशकात गाजलेल्या चित्रपटाची गाणी आजही अजरामर आहेत. याच कथेवर आधारित फिरोज खान यांनी ‘मुगल ए आजम’ हे नाटक धाडसाने रंगमंचावर आणले आणि नाट्यरसिकांना त्या प्रेमकथेच्या जिवंतपणाचा भव्य साक्षात्कार घडवला. अनेक चित्रपटांद्वारे दिग्दर्शकीय कौशल्याने फिरोज खान यांनी आपली वेगळी ओळख कमावली आहेच, पण रंगमंचावर पहिलं प्रेम असणाऱ्या दिग्दर्शकाने ‘तुम्हारी अमृता’, ‘सेल्समैन रामलाल’, ‘महात्मा वर्सेस गांधी’ ही नाटकं रंगमंचावर आणून नाट्यरसिकांना आपली वेगळी ओळख दिली आहे. आता त्यांचे ‘मुगल ए आजम’ नाटक रसिकाश्रय मिळवते आहे. चित्रपटाची निर्मिती ही चिरकाल टिकणारी असली तरी नाटकातल्या जिवंत अभिनयाची जादू काही वेगळीच असते. मराठी रंगभूमीवर अनेक गाजलेल्या नाटकांचे माध्यमांतर चित्रपटात होत असतानाच. हिंदी भाषक प्रसिद्ध सिने-नाट्यदिग्दर्शक फिरोज खान यांनी मात्र गाजलेल्या चित्रपटाचा आधार घेऊन त्यावर नाट्याविष्कार सादर करण्याचा नवा ट्रेंड रंगभमीवर आणला. १९६०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत एक अजरामर कलाकृती निर्मिली गेली. त्या कलाकृतीचे गारुड आज ५० वर्षांनंतर कायम आहे. त्याचे नाट्याविष्कारात रूपांतरित करण्याचे धाडस एखादा नाट्यवेडाच करू शकतो. चित्रपटात बघितलेली प्रेमकथा नाटकात बघताना रसिक त्याची तुलना करणारच, याची जाणीव फिरोज खान यांना आहेच; पण चित्रपट आणि रंगमंच या दोन्ही माध्यमांची बलस्थाने त्यांनी ओळखली. रंगमंचीय कलाकृतीचा प्रभाव रसिकांच्या मनावर कोरला जात असतो, याचाच साक्षात्कार त्यांनी ‘मुगल ए आजम’ या नाटकाद्वारे सिद्ध केला आहे.