देवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 08:15 AM2018-12-16T08:15:00+5:302018-12-16T08:15:03+5:30

हरवलेली माणसं  : ती शहरभरात भेटेल तिथं काम करून हल्ली कशीबशी पोटापुरते दोन पैसे गोळा करण्यासाठी सकाळी सात वाजताच घराबाहेर पडते. तिच्या लेकरांना साखरझोपेतच अलविदा करून कामाच्या शोधात शहरभर दहा-वीस रुपये घेऊन भेटेल त्या घरी धुणीभांडी, साफसफाईचे काम करते. तिचा एक मुलगा अवघा चार वर्षांचा.

why God created human in a beautiful world ? | देवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास?

देवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास?

googlenewsNext

- दादासाहेब थेटे

रोज सकाळी आपल्या आईचं तोंड न पाहताच डोळे चोळत आईसाठी रडत असतो. त्याच्या रडण्याने केविलवाण्या होणाऱ्या त्याच्या मोठ्या दोन्ही बहिणी चेहऱ्यावर नशिबाचा अंधार घेऊनच उठत असतात. या सगळ्या भावंडात मोठा असलेला भाऊ मात्र आपल्या आईच्या याच उघड्यावरच्या संसाराचा नकळत बाप होऊन जातो. बापाचं घर आणि बाप संपल्यावर निराश्रित झालेल्या या कुटुंबाचा दहा वर्षांचा अजाणता बाप आणि त्याची तीन चिमुकली भावंडे आपली माय येवोस्तोर बसतात तिच्या रस्त्यावर डोळे लावून. चोचीत पडेल ते गोळा करून आणणारी चिमणी जशी आपल्या पिलाला जगवते तशीच ही माय मिळेल त्या जमलेल्या शिधेला आपल्या पिल्लासाठी सोबत आणून भरवत असते.

या जगात गरिबीच्या सोबतीला नशिबाचा नेहमीचाच वानवा भासत असावा म्हणून की काय; तिची बहीण आणि तिच्या बहिणीच्या जळालेल्या नवऱ्याच्या कमनशिबी मुलीलाही आपल्या चार मुलांसोबत सांभाळताना दररोज अग्निदिव्यातून जगणारी अनिता (नाव बदलले आहे), या परिस्थितीलाही आपल्या नशिबाचे भोग म्हणून अबोलपणानं निमूटपणे आजवर सहन करत आलीय..! 
अनिताच्या बहिणीची दहा वर्षांची मुलगी, तिचं नाव अनुराधा. स्वत:च्या आई-बापाला स्वत:च्या डोळ्यासमक्ष जळताना पाहून त्यावेळी तिच्या काळजाचा झालेला कापूर तिच्या बोलक्या डोळ्यात आजही पेटलेला दिसतो. आमची तिच्याशी पहिल्यांदा भेट झाल्यापासूनच आम्हाला कधी घ्यायला येणार? म्हणून विचारणारी मला डॉक्टर होयचंय, मला शिकून मोठं व्हायचं..! असं निर्धारानं बोलणारी अनुराधा या सगळ्या दुर्दैवातून बाहेर पडण्यासाठी आशेचा एक धागा शोधण्याचाच जणू अट्टहास करीत होती. आई-बाप जिवंत होते तोपर्यंत औरंगाबादच्या कॉन्व्हेंटला जाणारी अनुराधा दुर्दैवाच्या फेऱ्यानं आज मात्र अचानक अगदीच बेघर आणि निराश्रित झाली होती. थकलेल्या आजी-आजोबांच्या कुडाच्या छपरात, शहरापासून तीन चार किलोमीटर अंतरावर राहणारे हे चिमुकले आणि त्यांची मनातून घायाळ झालेली एकाकी झुंज देणारी लढवय्यी आई!  

आपलं म्हणता येईल असं स्वत:चं घर नाही, हक्काचे म्हणवणारे नातेवाईक नाहीत. या अवस्थेतही पोरं उघड्यावर ठेवून जगण्याच्या वाटा शोधणारी माणसाच्या जगातली ती एक वनवासी अबला होती. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा जिथं पूर्ण करतानाच जिवाची तडफड होत आहे, तिथं ही पोरं शिक्षणासाठी कितीही आक्रोश करून काय साध्य होईल, असा प्रश्न तिच्या मनाला राजरोस खायला उठायचा. 

मदत म्हणून आम्ही तीन मुलींच्या निवासी शिक्षणाची जबाबदारी घेण्याचं कबूल केलं होतं. चार महिन्यांच्या प्रयत्नाअंती या मुलीची सोय लावण्यात आम्हाला यश आलं. आपण एकवेळ उपाशी राहू; पण आईला सोडून राहणार नाही अशा पवित्र्यात रडवेली झालेली तिची लेकरं आईच्या दुराव्याच्या कल्पनेनं कासावीस झाली होती. अनिताच्या चेहऱ्यावर नाईलाजास्तव स्वीकारलेलं समाधान दिसत असलं; तरी तिच्या लेकरांच्या चेहऱ्यावर मात्र आईच्या कुशीचा मायेचा खोपा सुटण्याची भीती स्पष्ट दिसत होती...!  अनुराधाला मात्र हवा तो धागा गवसल्याचा आनंद होत होता. सद्गुरू सेवाभावी संस्थेमध्ये या मुलींची सर्वसोयींनी व्यवस्था लागल्यामुळे आम्हालाही खूप मोठं समाधान वाटलं. जाताना गाडीच्या काचेतून आमच्याकडे टाटा करीत हात फिरवणाऱ्या या पोरींच्या डोळ्यात मला माझी मुलगी दिसत होती. एवढं सगळं अनुभवताना परत एकदा देवाला विचारवंसं वाटलं, देवा सुंदर जगामंदी कारं माणूस घडविलास? 
( Sweetdada11@gmail.com ) 

Web Title: why God created human in a beautiful world ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.