अफवा पसरवते कोण ? आणि त्या पसरतात कशा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 03:00 AM2018-07-08T03:00:00+5:302018-07-08T03:00:00+5:30

भारतासारख्या देशात मोठय़ा संख्येने असलेल्या ‘माध्यम-अशिक्षितां’च्या बाजारपेठेचा वापर विविध स्तरांवरून कळत आणि नकळतही किती अक्राळ-विक्राळपणे होतो आहे, याचं प्रत्यंतर अलीकडच्या अंदाधुंद हत्याकांडांवरून आलं. विचार न करता अफवांवर विश्वास ठेवणारी मानसिकता आणि प्रश्न न विचारण्याचा संस्कार या सगळ्यामुळे समाज म्हणून आपण ‘फॉरवर्ड-फॉरवर्ड’चा नवानवा खेळ चवीचवीने रंगवतो आहोत आणि त्यापोटी जन्मणार्‍या अफवांचे बळी ठरतो आहोत.

Who spreads the rumors... why and how? | अफवा पसरवते कोण ? आणि त्या पसरतात कशा ?

अफवा पसरवते कोण ? आणि त्या पसरतात कशा ?

Next
ठळक मुद्देस्वस्त स्मार्टफोन, फुकट डेटा आणि अविचारी वापरकर्ते यांनी पोसलेला नवा राक्षस !

मुक्ता चैतन्य

राईनपाडय़ातली क्रूर घटना होण्याआधी काही दिवसांपूर्वीचा एक व्यक्तिगत अनुभव - 
एका मैत्रिणीने व्हॉटस्अ‍ॅपवरून एक पर्सनल मेसेज केला. पुण्याच्या कुठल्यातरी कॉलनीच्या गेटवरून एका लहान मुलीला पळवण्यात आलं होतं, तिच्या पालकांनी लिहिलेला तो मेसेज आहे, असं मैत्नीण सांगत होती. शिवाय त्यात पालकांचे नंबर होते, हरवलेल्या/पळवून नेलेल्या मुलीचे पालक माझ्या ओळखीचे आहेत, असंही मेसेजमध्ये लिहिलेलं होतं. शंका आली म्हणून मैत्रिणीला फोन केला.  ‘पळवल्या गेलेल्या मुलीच्या आईवडिलांना तू ओळखतेस का?’ ती म्हणाली, ‘नाही, पण माझी एक जवळची मैत्रीण ओळखते त्यांना. तिनेच पाठवला होता हा मेसेज. मी फक्त फॉरवर्ड केला.’
मग तिच्या त्या मैत्रिणीला फोन केला. तर तीही त्या हरवल्या मुलीच्या आईबाबांना ओळखत नव्हती. तिला जिथून मेसेज आला होता, त्या ग्रुपमधल्या कुणाच्या तरी ओळखीचे असावेत असं तिला वाटलं होतं. तिने तिच्या  ‘त्या’ ग्रुपवर मेसेज टाकला; पण तिथेही कुणीही या पालकांना ओळखत नव्हतं.
कसलाही विचार न करता, स्वतर्‍ला एकही प्रश्न न विचारता माझ्या मैत्रिणीने, तिच्या मैत्रिणीने आणि मैत्रिणीच्या मैत्रिणींनी तो मेसेज फॉरवर्ड केला होता.
हे लक्षात आल्यावर मैत्रीण खजील झाली खरी; पण मग लगेच म्हणाली, ‘आम्ही विचार न करता फॉरवर्ड केला मेसेज हे खरं आहे; पण काळजी घेतलेली काय वाईट? अशा मेसेजेसमध्ये कोण शहानिशा करत बसेल? चुकून खरा मेसेज असेल तर? आणि ही समाजोपयोगीच माहिती आहे ना, मग पुढे पाठवली तर बिघडलं कुठे?’
याच समाजोपयोगी जागरूकतेच्या अविचारी अतिरेकातून, ‘बिघडलं कुठे’ असा साधा विचार करून धडाधड मेसेजेस फॉरवर्ड केले जातात.
त्यातून काय प्रकार ओढवू शकतो याचा क्रूर अनुभव नुकताच धुळ्याजवळच्या राईनपाडा गावात घडलेल्या हत्याकांडावरून आला आहे. ‘मुलांना पळवणारी टोळी आपल्या गावात/शहरात आली आहे. सावध राहा’ - अशा मेसेजेसमधून वावटळीसारख्या पसरलेल्या अफवांनी गेल्या काही दिवसात अख्ख्या देशाला हादरवून सोडलं आहे. या अफवांनी भांबावलेल्या, चिडलेल्या आणि संतापाने विवेक गमावून बसलेल्या जमावाने ‘मुलं पळवणारी टोळी’ असावी अशा संशयातून भारतभरात विविध ठिकाणी सुमारे 30 लोकांचे खून पाडले आहेत. मुलं पळवणारी टोळी समजून झारखंडमध्ये संतप्त जमावाने सात निरपराध लोकांना ठेचून मारलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती राईनपाडय़ाला झाली. गावात भीक मागून उदरनिर्वाहासाठी आलेले भटक्या जमातीतले पाच लोक सामूहिक रोषाला बळी पडले.
कारण?
- समाजमाध्यमांवरून वार्‍यासारखी ‘व्हायरल’ झालेली अफवा !
अशा घटना तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसह तब्बल 20 राज्यांतून नोंदवल्या गेल्या आहेत. सोशल मीडिया जागरूकतेने वापरला नाही तर काय होऊ शकतं याचं विदारक चित्न या प्रत्येक घटनेतून समोर येतं.
 हा संपूर्ण विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे. 
सोशल मीडिया विशेषतर्‍ व्हॉट्सअ‍ॅपचं डिझाइन, त्याचं खासगी-वैयक्तिक स्वरूप, ते चालवण्यासाठी लागणारे स्मार्टफोन आणि इंटरनेट डाटा यांची स्वस्तातली उपलब्धता ही त्यामागची प्राथमिक कारणं.
भारतीय समाजमनाला एकंदरीतच असलेली चटपटीत धक्कातंत्राची, थरारक अद्भुताची विचित्र ओढ आणि समूह-मानसिकतेच्या मुळाशी असलेला आंधळा अविवेक हे स्वस्त, सोप्या तांत्रिक उपलब्धतेला अजून डिवचणारे मुद्दे !
फारसा विचार न करता अफवांवर विश्वास ठेवणारी मानसिकता, जे काही छापून येतं, हातातल्या अगर भिंतीवरल्या स्क्रीनवर दिसतं ते खरं असतं हे मानण्याची वृत्ती आणि प्रश्न न विचारण्याचा कुटुंबांपासून शाळेर्पयत केला जाणारा संस्कार या सगळ्यामुळे समाज म्हणून आपण  ‘फॉरवर्ड-फॉरवर्ड’चा नवानवा खेळ चवीचवीने रंगवतो आहोत आणि त्यापोटी जन्मणार्‍या अफवांचे बळी ठरतो आहोत.
एखादी  ‘बातमी’ मलाच कशी पहिल्यांदा समजली, सगळ्यांना जागं करण्यासाठी मीच कसा पहिल्यांदा तो मेसेज पाठवला, मला कसं इतरांपेक्षा जास्त माहीत आहे अशा निरनिराळ्या मानसिक गरजांच्या पूर्तीसाठीदेखील फॉरवर्ड मेसेजेसचा खेळ जोरात खेळला जातो. आपल्यार्पयत येऊन पोहचलेल्या मेसेजमधील तथ्य शोधण्याचा प्रयत्न कुणीही करत नाही.
हा मेसेज खरा आहे का? ही माहिती योग्य/उचित/वास्तव आहे का?  हा मेसेज पुढे पाठवला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतील? - हे तीन अगदी मूलभूत प्रश्नही स्वतर्‍ला कुणीही विचारत नाही आणि सोशल मीडियावर अफवांचं पेव फुटतं. त्यातून व्हॉट्सअ‍ॅप हे जलद संवादाचं साधन असलं तरी ते वैयक्तिक आणि खासगी स्वरूपाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. तिथे कोण कुणाशी काय बोलतंय यावर लक्ष ठेवणं कठीण असतं. त्यावरच्या असंख्य ग्रुप्समध्ये काय प्रकारची चर्चा होते आहे, अफवा कुठून आणि कशा पसरत जात आहेत यावर लक्ष ठेवणही तांत्रिकदृष्टय़ा गुंतागुंतीचं आणि खरं तर अजूनही तसं अतक्र्यच आहे.
फेब्रुवारी महिन्यात मार्क झूकरबर्गने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात आजच्या घडीला व्हॉट्स अ‍ॅपचे  200 दशलक्ष अ‍ॅक्टिव्ह वापरकर्ते आहेत.. म्हणजे 20 कोटी! शहरी भागात जरी लोकांचे डोळे फेसबुक आणि ट्विटरकडे लागलेले असले तरी भारताच्या ग्रामीण भागातलं सगळ्यात प्रसिद्ध अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअ‍ॅप आहे हे विसरून चालणार नाही. भारतातले हे 20 कोटी लोक दररोज शेकडोने मेसेजेस पाठवत असतात. यात किती मेसेजेस खरे आणि किती खोटे याचा हिशेब लावणं कठीण आहे. 
 मुलं पळवणारी टोळी आल्याच्या अफवा आणि त्यानंतर देशभरात घडलेल्या क्रूर हत्यांनंतर केंद्र सरकारनेही या अफवांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. केंद्रीय माहिती आणि  तंत्नज्ञान मंत्रालयाने नोटीस पाठवल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने अफवांना रोखण्यासाठी नवीन फीचर निर्माण करण्याची घोषणा केली आहे. तसं झालं तर उत्तमच आहे. 
पण टोकाच्या खासगी व्यासपीठावर अफवांवर नियंत्नण आणणं वाटतं तितकं सोपं नाही. स्वनियंत्नण, माध्यम शिक्षण हे खरं तर अधिक प्रभावशाली मार्ग असू शकतात. 
पण अजून आपल्याकडे या विषयासंबंधी प्रारंभिक उत्सुकता आणि त्यामागोमागच्या काळजीपलीकडची अभ्यासाची संस्कृती रुजलेली नाही. घरोघरी टीव्ही आल्यानंतरही माध्यम शिक्षणाची गरज आपल्याला वाटली नाही. गेल्या दहा वर्षात सोशल मीडिया झपाटय़ाने पसरल्यानंतरही माध्यम शिक्षणाची चर्चाही अजून आपल्याकडे जोर धरत नाही. 
त्यामुळे सरसकट अर्थाने बोलायचं तर आपला देश तसा ‘माध्यम-अशिक्षित’! या सर्वव्यापी माध्यम-अशिक्षिततेचा वापर करून घेणार्‍या टोळ्या देशात सक्रिय झालेल्या दिसतात. समाजमन घडवणं, ते विशिष्ट विचाराच्या/व्यक्तीच्या दिशेने अगर विरोधात वळवणं, त्यासाठी व्यावसायिकरीतीने सोशल मीडियाचा वापर करणं, या माध्यमातून राजकीय, सामाजिक, व्यावसायिक हेतू साध्य करून घेण्यासाठी  पैसा ओतणं हे आता जगभरात होतं. त्याविषयी चर्चाही होतात.
मात्र भारतासारख्या देशात मोठय़ा संख्येने असलेल्या  ‘माध्यम-अशिक्षितां’च्या बाजारपेठेचा वापर विविध स्तरांवरून किती अक्राळ-विक्राळपणे होतो आहे, याचं प्रत्यंतर अलीकडच्या अंदाधुंद हत्याकांडांवरून आलं. माध्यम अशिक्षित लोकांचा हा अशा प्रकारचा वापर हे एक प्रकारचं आधुनिक शोषण आहे.
सोशल मीडियाचा ‘स्टट्रेजी’ म्हणून वापर करणारे उच्चशिक्षित तज्ज्ञ असोत, धार्मिक/जातीय तेढ वाढवून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ‘पोस्ट’चं तेल ओतणारे  ‘कार्यकर्ते’ असोत की तात्कालिक खळबळ माजवून आपण नामानिराळे होण्याची चश्की असलेले समाजकंटक, यातल्या प्रत्येकालाच हे ठाऊक असतं की ‘माध्यम-अशिक्षित’ लोक किंचितही विचार न करता, कसलीही शहानिशा न करता, खरे खोटेपणा न तपासता मेसेजेस फॉरवर्ड करतात. या माध्यम असाक्षरतेमुळे एरवीची शिकलेली, सुसंस्कृत माणसंही ‘माध्यम-गुलाम’ म्हणून वापरली जातात.
- आणि आपला ‘असा वापर’ होतो आहे, याचीही त्यापैकी बहुतेकांना जाणीव नसते.  आपण सारे  या शोषणाचे बळी आहोत. 
अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ ऑलपोर्ट आणि पोस्टमन यांनी 1947 मध्ये संशोधनांती तपशिलाने अफवांमागची मानसिकता मंडळी होती. हाच‘द बेसिक लॉ ऑफ रूमर्स’. त्यानुसार कशाची अफवा तयार होईल हे तो विषय त्या समुदायासाठी किती महत्त्वाचा आहे यावर अवलंबून असतं. आपल्याकडेही अशाच विषयांबद्दलच्या अफवा पसरतात, जे विषय सामाजिक स्तरावर असुरक्षितता निर्माण करणारे आहेत, मनात भीतीची भावना जागृत करणारे आहेत ! अशाच विषयांची माहिती चटकन मोठय़ा प्रमाणावर प्रसारित होते आणि त्यातून अफवेचा अक्राळ-विक्राळ राक्षस उभा राहतो.  ज्या त्या समाज गटांना संबंधित विषयाचं गांभीर्य किती वाटतं आहे, त्यानुसार अफवा किती गंभीर स्वरूप घेते हे अवलंबून असतं.
आपल्याकडे व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पसरणार्‍या अफवांमुळे सामुदायिक तणाव आणि हिंसेचं प्रमाण झपाटय़ाने वाढतं आहे, म्हणूनच सजग होण्याची गरज आहे. गॉसिप करणं आणि अफवा पसरवणं हा जरी मानवी स्वभाव असला तरी त्या गॉसिप आणि अफवांच्या आधारे प्रत्यक्षात हिंसा, दंगे, दंगली होतात तेव्हा आपल्यार्पयत पोहचणार्‍या माहितीकडे जागतेपणे कसं पाहावं, हे शिकावंच लागेल. अफवांमधून गैरसमज पसरून, तणाव वाढून त्यातून दंगली उफाळण्याचे प्रकार व्हॉट्सअ‍ॅपपूर्व काळातही घडत होतेच. पण व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य समाजमाध्यमांच्या अतिवेगवान संपर्क-शक्तीमुळे या गोष्टी सहज आणि विलक्षण वेगाने पसरतात, त्यातून होणारं नुकसान टाळता येऊ शकतं, असा विचार करायला, विवेकाला संधीही उरत/मिळत नाही, हे अधिक गंभीर आहे.
- अजून किती काळ आपण ‘माध्यम-अशिक्षित’ राहणार आणि या आधुनिक शोषणाचे बळी ठरणार, याचा विचार करायची - आणि त्याविषयी ठोस कृती करण्याची - वेळ आता टळून चालली आहे. 

**
 

अफवांचे राक्षस 
आणि हतबल तंत्रज्ञान


1 खोटय़ा बातम्या, अफवा पसरवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात सुलभ आणि गतिमान माध्यम आहे. समाजकंटक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठय़ा प्रमाणावर करतात हे आता उघडच आहे. त्यातून उदभवणार्‍या समर-प्रसंगांची दखल घेऊन व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन फीचर आणणार आहे.
2कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आपल्यार्पयत येणार्‍या मेसेजेसना एक लेबल म्हणजेच खूण असेल. या खुणेचा अर्थ आपल्यार्पयत आलेला मेसेज ‘फॉरवर्डेड’ आहे.
3 एखादा मेसेज पुढे पाठवण्याआधी तो मेसेज फॉर्वर्डेड आहे हे माहीत असेल तर पुढे पाठवताना आपण चार वेळा विचार करू असं यामागचं गृहीतक आणि अपेक्षा आहे. निदान वापरकत्र्याला तशी संधी तरी मिळेल.
4त्याखेरीज ‘अनवॉण्टेड ऑटोमेटेड मेसेजेस’ना आळा घालण्याचाही प्रयत्न व्हॉट्सअ‍ॅप करणार आहे. त्यामध्ये वापरकत्र्यानी ‘रिपोर्ट’ केलेले मेसेजेस शिवाय ते संशयास्पद रीतीने पाठवले जात असतील तर अशा ‘ट्रेल्स’वर व्हॉट्सअ‍ॅप लक्ष ठेवणार आहे.
5 म्हणजे एकाच वापरकत्र्याकडून एकाचवेळी एकाच प्रकारचे असंख्य मेसेजेस वेगाने पाठवले जात असतील तर तिथे व्हॉट्सअ‍ॅप हस्तक्षेप करणार आहे.
6 अर्थात, व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेसच्या ‘संख्ये’वर लक्ष ठेवू शकेल, त्यातल्या मजकुरावर नाही. म्हणजे मग एखादा मेसेज चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे, हे कसं ओळखायचं? - या प्रश्नाला आजतरी उत्तर नाही.
7 माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला दिलेल्या उत्तरात खुद्द व्हॉट्सअ‍ॅपनेही (हतबल) तंत्रज्ञानाखेरीजच्या अन्य मार्गानीच अफवांना आळा घालणं शक्य होईल असं म्हटलं आहे. समाजातल्या जाणत्या लोकांनी प्रबोधन करणं, पोलीस आणि  ‘सत्यशोधना’साठी प्रयत्नशील असलेल्या स्वयंसेवी सामाजिक संस्थांनी एकत्रितरीत्या आघाडी उघडणं, सामान्य वापरकत्र्याचं प्रबोधन असे(च) मार्ग व्हॉट्सअ‍ॅपने सुचवले आहेत.

(लेखिका समाज माध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: Who spreads the rumors... why and how?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.